पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला सश्रम जन्मठेप

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th April, 08:35 pm
पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला सश्रम जन्मठेप

मडगाव : पत्नीचा खून केल्याप्रकरणी संशयित अशोक कुमार यांना दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून खूनप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले असून सश्रम कारावासासह जन्मठेप व ५० हजारांचा दंड सुनावण्यात आलेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ मार्च २०१९ रोजी रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास झुआरीनगर येथील अशोक कुमार याने शारीरिक सुख देण्यास नकार दिल्याचा राग आल्याने पत्नी बिंदू (३९) हिचा गळा दाबून खून केला. यानंतर संशयित सांकवाळ पोलीस आऊट पोस्टवर जात पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. न्यायालयाकडून सुनावणीवेळी १५ साक्षीदारांच्या साक्ष नोंद करण्यात आल्या. यात संशयिताच्या पाच वर्षीय मुलीचाही समावेश होता. तिने न्यायालयासमोर वडिलांना आईचा गळा दाबताना पाहिल्याचे सांगितले.
या खूनप्रकरणी वेर्णाचे तत्कालिन पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी तपास अधिकारी म्हणून काम पाहिले. सरकारी वकील म्हणून उत्कर्ष आवडे यांनी काम पाहिले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पूजा कवळेकर यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. न्यायालयासमोरील पुराव्यांच्या आधारे अशोक कुमार याला दोषी ठरवण्यात आलेले होते. न्यायालयाकडून संशयित संतोष कुमार याला सश्रम कारावासासह जन्मठेप सुनावली. याशिवाय ५० हजारांचा दंड सुनावला आहे. ही रक्कम दोन्ही मुलांच्या नावावर फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवावेत व दोघांनाही समान वाटा द्यावा. दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा न्यायालयाकडून सुनावण्यात आलेली आहे.

हेही वाचा