नवा विचार, दिशा आणि नवी आशा

भन्नाट

Story: डाॅ. प्राजक्ता मं. कोळपकर |
30th March 2019, 11:10 am
नवा विचार, दिशा आणि नवी आशा


केळकर काकांची आणि माझी भेट जरा चमत्कारीकच आहे. दुसऱ्या कुणाच्यातरी कामासाठी आम्ही सहज भेटलो आणि आमच्याच हक्काच्या, विश्वासाच्या गाठी नकळत घट्ट मारून गेलो. खरंतर पहिल्याच भेटीत कुणावर इतका विश्वास टाकावा हे स्वतःला न पटवून घेणारी मी; मी मात्र माझेच निकष मोडीत काढले. पहिल्या दिवशीच्या अघळपघळ गप्पांमध्ये कुठेतरी विचारांची नाळ जुळतेय, हे लक्षात आले.
एकदा कधीतरी त्यांच्या घरी जाण्याचा चुकून योग्य आला; म्हणजे मी त्यांच्या सोसायटीत कुणा दुसरीकडे जायचे म्हणून यांचेच दार ठोठावले. दारात मला बघून आणि दाराच्या आत त्यांना बघून आम्ही दोघेही आश्चर्यजनक मुद्रेत उभे होतो. शेवटी त्यांनीच मला आत बोलावले आणि म्हणाले, ‘दोन मिनिटे बस. मी आलोच यशराजशी बोलून. चांगली पंधरा मिनिटे घेतली त्यांनी. तोपर्यंत मी त्यांच्या बैठकीच्या खोलीचे निरीक्षण करत होते. प्रत्येक कोपऱ्यात एक पाण्याची बाटली ठेवली होती. काका ज्या दिवाणावर बसले होते, तेथे वेगवेगळ्या आकाराच्या कागदाचे तुकडे व्यवस्थित रायटिंग पॅडला लावून ठेवले होते.
एका पेनस्टॅण्डमध्ये कात्री, कटर, पेन्सिल आणि त्यातच लाल, निळा, आणि हिरव्या रंगाचे पेन. काका बसतात त्याच्या अगदी समोरच्या भिंतीवर एक व्हाइट बोर्ड होता, त्यावर एक श्लोक लिहिला होता. काचेचे कपाट गाण्याच्या कॅसेट्सनी गच्च भरले होते. अगदी नोंदीसहित. बाजूला आणखी एक शेल्फ; त्यात ढीगभर पुस्तक, तीही अतिशय क्रमवार. समोर श्रीकृष्णाची सुबक सुंदर मूर्ती. जणू जिवंत कृष्ण.
मी ती कृष्णाची मूर्ती बघण्यात तल्लीन झाले होते, तोच काकांचा मागून आवाज आला, ‘कंटाळलीस का?? जरा उशिरच झाला मला.’ मी कंटाळले नव्हतेच मुळी. अनेक गोष्टींचे कुतूहलच निर्माण झाला होते आणि ते सारे माझ्या चेहऱ्यावर झळकत होते. काका म्हणाले, ‘मूर्ती आवडली का कृष्णाची?’
मी पटकन म्हणाले, ‘सगळंच आवडलं पण सगळं प्रश्नार्थक’.
काकांनी माझ्या मनातल्या त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. म्हणाले, ‘मी असा वॉकर घेऊन चालतो, फार भरभर चालू शकत नाही, पटकन उठूही शकत नाही म्हणून हाताशी ही दोरी. न उठता मला दाराच्या कडीला जरासा हिसका देऊन दार उघडता येते. या पाण्याच्या बाटल्या मुद्दाम काकू ठेवून जाते. कारण आलेल्यांना मी उठून पाणी देऊ शकत नाही. पटकन म्हणून हे प्रयोजन; शिवाय बाटली दिली की उष्टं पाणी फेकण्यात जात नाही. आलेले लिफाफे मी फाडतो आणि त्यावर लिखाण करतो; कागद वाया जाऊ नये म्हणून. निळ्या रंगाचे बायकोसाठी, लाल रंगाने यशराजसाठी आणि हिरव्या रंगाचे जयराजसाठी काही निरोप लिहून ठेवतो. समोर व्हाइट बोर्ड आहे, त्यावर रोज एक गीतेचा श्लोक लिहितो आणि पाठ करतो; दुपारी झोप येऊ नये म्हणून.
गाण्याचे प्रचंड वेड, पण या सगळ्या गाण्याच्या कॅसेटस नाहीत; तर मला आवडणाऱ्या पुस्तकातल्या चांगल्या मजकुराचं रेकॉर्डिंग मी करून ठेवलेय, पुढच्या पिढीला वाचायला वेळ मिळाला नाही तर त्यांनी किमान ऐकावे हा हेतू. ही कृष्णाची मूर्ती माझे आदरस्थान आणि आधारस्थान. कृष्णाचे मी रोज आभार मानतो; त्याने ही गीता माझ्या आयुष्यात आणली आणि मी वाल्याचा वाल्मिकी झालो. म्हणून त्या कृष्णाची मूर्ती डोळ्यांसमोर. आता अंध मुलांसाठी ब्रेल लिपीत गीता लिहण्याचा प्रयत्न करतोय..’
मी आता अती भारावलेली म्हणजे नतमस्तकच झाले होते. काही बोलण्याच्या आत दारावरची बेल वाजली. मी दार उघडणार तोच काकांनी आपल्या हातातल्या दोरीला झटका मारला आणि दाराची कडी निघाली. ही ऐकीव गंमत आता प्रत्यक्ष पाहिली होती. काकूंशी फोनवर बोलणे झाले होते. आज अगदी सहजच अनपेक्षित भेटीचा योग्य जुळून आला होता. काकूंनी काकांना आठवण करून दिली. ‘चहा करते, चहा पिऊ, एक पेनकिलर घ्या आणि निघू’. काकांचा लगेच होकार होता.
काकू चहा करायला गेल्या आणि काका सांगायला लागले, ‘परवा पेपरला बातमी होती. कुणा अमक्याच्या घरी वीस वर्षांचा मुलगा गेला. त्याला सांगायला चाललोय की तो मृत्यू किती बरोबर होता. जन्म आणि मृत्यूत एका श्वासाचे अंतर आहे, तरी ते आपल्या हातात नाही’.
‘म्हणजे?’ माझा गोंधळलेला प्रश्न.
काका म्हणाले, ‘प्राजक्ता, यशराज गेल्यापासून आम्ही हे काम करतोय. त्याचे विसाव्या वर्षी असे अाकस्मिक जाणे बुद्धीला न पटण्यासारखे होते. आम्ही दोघेही थोडे सावरल्यावर यशराजच्या मृत्यूची कारणे शोधायची ठरवली. मग अध्यात्मापासून, सामाजिक, पारंपरिक, वैज्ञानिक साहित्याचा अभ्यास मृत्यू समजण्यासाठी केला, तेव्हा गीता आम्हाला गवसली, समजली. खऱ्या अर्थाने मृत्यूचा अर्थ सापडला. काकूंनी तेवढ्यासाठी जोतिष्याचा अभ्यास केला आणि मृत्यूच्या कारणांच्या तळाशी जाऊ शकलो. आता लोकांची पत्रिका बघतो. त्याचा अभ्यास करतो आणि योग्य तो सामंजस्याचा सल्ला देण्याचा प्रयत्न करतो. त्यातच ज्यांच्या घरी कुणी मृत्यू पावतो, त्याच्या घरी समजावून द्यायला जातो, ‘हे आपल्या हातात नाही. प्रारब्धाच्या पुढे कुणीच नाही’. त्या लोकांना दुःखातून निघण्यासाठी आम्ही दोघंही प्रयत्न करतो. सांगतो त्यांना, एका मृत्यूसाठी सगळ्या कुटुंबाने मृतवत जगणे किती मोठे पाप आहे.’
बापरे! भन्नाटच होतं सगळं. (लेखिका समाजसेवक, उद्योजक आहेत.)
पण एक प्रश्न अनुत्तरीतच होता, ‘काका, मी आल्याआल्या तुम्ही यशराजशी बोलायला गेलात. मग ते काय?’. काका हसले आणि म्हणाले, ‘मी नुकताच माझ्या मित्राच्या घरून आलो होतो. त्याची बायको वारली होती आणि आता तो मित्र त्या दुःखातून पूर्णपणे बाहेर आलाय. आज त्याने मला मिठीच मारली. तेव्हा यशराजला हे सगळे सांगायला गेलो होतो’.
‘म्हणजे?....’
‘अगं, कार्य सिद्धीस गेले ना की मी यशराजच्या फोटो समोर जाऊन हे सगळे सांगतो आणि तो आनंदाने हसल्याचा मला भास होतो. नव्हे तोच मला हे काम करण्याची शक्ती देतो’. काका बोलत होते. काकूंनी चहा आणला. काकांनी पेनकिलर घेतली. वाॅकर घेऊन काका आणि काकू निघाले. मी अजूनही गोंधळलेल्या अवस्थेत होते. ‘काका, यशराज नाही. मग हिरव्या पेनाने त्याच्यासाठी काय लिहिता?’
काकू म्हणाल्या, ‘काका रोज त्याच्यासाठी आभाराचं पत्र लिहितात. म्हणतात, तू गेलास, पण जाताना नवा विचार, नवी दिशा आणि नवी आशा देऊन गेलास.’ मी साष्टांग दंडवतच घातला आणि त्यांच्या त्या भन्नाट पाठमोऱ्या आकृतीकडे डोळे भरून बघत राहिले..... कितीतरी वेळ.