‘साबांखा’ हाताळण्यात ढवळीकरांना अपयश : काँग्रेस


12th July 2018, 03:11 am
‘साबांखा’ हाताळण्यात ढवळीकरांना अपयश : काँग्रेस

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : विद्यमान आघाडी सरकारातील आमदार आणि मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या कामगिरीवर समाधानी नाहीत, हे मंत्री गोविंद गावडे व जयेश साळगावकर यांच्या आरोपांवरून स्पष्ट झाले आहे. राज्यातील रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. हे खड्डे बुजविण्यात मंत्री सुदिन ढवळीकर यांना अपयश आले आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते उर्फान मुल्ला यांनी बुधवारी केली. 

पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत संकल्प आमोणकर, विठू मोरजकर, संजय खोर्जुवेकर आदी उपस्थित होते. सध्या आजारी असलेल्या मंत्री सुदिन ढवळीकर यांनी बरे होऊन गोव्यात परतावे आणि खाते सांभाळण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही मुल्ला यांनी केली. 

संकल्प आमोणकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात रुपयाचे मूल्य घसरत आहे. काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांच्याविरुद्ध केल्या जाणाऱ्या तक्रारी चुकीच्या आहेत. कुतिन्हो यांच्याविरोधात तक्रार करण्यापेक्षा पीडित तरुणीला न्याय कसा मिळेल, याचा विचार करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मोदींच्या विदेश दौऱ्यांची गिनीज बुकात नोंद करा !

संकल्प आमोणकर म्हणाले, जगात कोणत्याच देशाच्या पंतप्रधानांनी जेवढे विदेश दौरे केलेले नाहीत, तेवढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहेत. गेल्या ४ वर्षांत मोदींनी ४१ विदेश दौरे करून ५२ देशांना भेटी दिल्या आहेत. त्यांच्या या विक्रमाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने नोंद करावी, अशी मागणीही आपण गिनीज बुककडे लेखी पत्राद्वारे केली असल्याचे त्यांनी सांगितले. मोदींच्या विदेश दौऱ्यांसाठी आतापर्यंत ३५५ कोटी ३० लाख ३८ हजार ४६५ रुपये इतका खर्च झाल्याची माहिती काँग्रेसच्या बंगळुरु येथील कार्यकर्त्याने माहिती हक्क कायद्याद्वारे मिळविली आहे. त्याचाही उल्लेख आपण पत्रात केला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा