मुंबई - जमशेदपूर आज लढत


01st February 2018, 04:04 am

मुंबई : मुंबई सिटी एफसी आणि जमशेदपूर एफसी यांच्यात हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) गुरुवारी लढत होत आहे. मुंबई फुटबॉल एरिनावरील ही लढत बाद फेरी गाठण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी महत्त्वाची असेल.

गुणतक्त्यात जमशेदपूर पाचव्या, तर मुंबई सहाव्या स्थानावर आहे. जिंकणाऱ्याची आगेकूच करण्याची संधी वाढेल, तर हरणाऱ्याची कमी होईल, याची दोन्ही संघांना जाणीव आहे. त्यामुळे दोन्ही संघ प्रयत्नांत कोणतीही कमतरता पडू देणार नाहीत.

जमशेदपूरचे १३ सामन्यांतून १९ गुण झाले आहेत. जिंकल्यास ते एफसी गोवा संघाला मागे टाकून चौथा क्रमांक मिळवू शकतील. गोव्याचे दोन सामने कमी आहेत.  ही लढत म्हणजे जीवन-मरणाचा प्रश्न नसल्याचे जमशेदपूरचे प्रशिक्षक स्टीव कॉप्पेल यांनी स्पष्ट केले, पण जिंकल्यास बराच फायदा होईल हे त्यांनी मान्य केले. ते म्हणाले की, दोन्ही संघांसाठी हा जीवन-मरणाचा प्रश्न नाही. आमचे पाच सामने बाकी आहेत. हा सामना हरलो तरी आम्ही बाद फेरी गाठू शकतो का, या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे, पण तसे झाल्यास मार्ग जास्त अवघड असेल. आता खुप काही पणास लागले आहे. ही परिस्थिती जीवन-मरणाचा प्रश्न नसली तरी जवळपास तशीच आहे.

मुंबईने गोव्यावर गोव्यात ४-३ असा अप्रतिम विजय मिळविला. बलवंत सिंगने अंतिम टप्यात निर्णायक गोल केला. या विजयामुळे मुंबईला संजीवनी मिळाली असून १२ सामन्यांतून त्यांचे १७ गुण झाले आहेत. बाद फेरीसाठी मुंबईचे आव्हान अजूनही कायम  आहे.

मुंबईला घरच्या मैदानावर मागील दोन सामने गमवावे लागले. केरळा ब्लास्टर्सविरुद्ध ते ०-१, तर बेंगळुरू एफसीविरुद्ध १-३ असे हरले.

मुंबईसाठी कर्णधार ल्युचीयन गोएन आणि ब्राझीलचा मध्यरक्षक लीओ कॉस्टा यांना आधीच्या सामन्यात दुखापतींमुळे खेळता आले नाही. आता हे दोघे खेळू शकणार आहेत.