‘आर्वी इलेव्हन’ ला अजिंक्यपद

अर्बन डेव्हलपर्स संघाचा ७८ धावांनी पराभव; अनिकेत देसाई मालिकावीर


05th February 2018, 03:44 am

वार्ताहर | गोवन वार्ता

कोरगाव : पेडणे - कोरगाव येथील आर्वी इलेव्हन क्रिकेट संघाने नागेशी फोंडा येथील टी-२० लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. आर्वी इलेव्हन संघाने अर्बन डेव्हलपर्स संघावर ७८ धावांनी मात करीत एक लाख रुपये आणि आकर्षक नागेशी यूथ चषकाचा  मानकरी ठरला. 

आर्वीचा अष्टपैलू खेळाडू अनिकेत देसाईला मालिकावीर, महेश भाईडकरला उत्कृष्ट गोलंदाज आणि सूरज डोंगरे याला उत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरवण्यात आले. मडकई नागेशी यूथ क्लबने आयोजित केलेल्या अखिल गोवा लेदर बॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात कोरगाव आर्वी आणि अर्बन डेव्हलपर्स यांच्यात अटीतटीचा सामना झाला. 

नाणेफेक जिंकून आर्वी इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात २०३ धावा केल्या. अनिकेत देसाई आणि सूरज डोंगरे यांनी अर्धशतकी खेळी केली. अनिकेतने ६३ चेंडूत ८२ धावा चोपल्या तर त्याच्या साथीने सूरज डोंगरे याने ४३ चेंडूत ताबडतोब ६० धावा आणि स्वप्नील मलिकने २२ धावा केल्या.      

प्रत्त्युत्तरादाखल महेश भाईडकरने केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे अर्बन डेव्हलपर्स संघ अवघ्या १२५ धावात गारद झाला. महेशने अर्बनचे तीन गडी बाद केले. संपूर्ण मालिकेत महेशने १३ बळी घेतले. त्याला रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देत उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरविण्यात आले. सूरज डोंगरेने मालिकेत  चार सामन्यात १७० धावा केल्या. त्याला उत्कृष्ट फलंदाज म्हणून रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देण्यात आले. तर संपूर्ण मालिकेत  १८२ धावा   आणि   ११    बळी घेणाऱ्या अष्टपैलू अनिकेत देसाईला मालिकावीर म्हणून सुझुकी असेस दुचाकी बक्षीस म्हणून देण्यात आली. 

स्पर्धेतील उपविजेता अर्बन डेव्हलपर्स संघाला ५० हजार रुपये आणि चषक देण्यात आले. अर्बनचा तेक बहादूर याला फिटेस्ट प्लेयर म्हणून पारितोषिक दिले. सर्व बक्षिसे सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर व इतर मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात 

आली.