चहलच्या फिरकीत आफ्रिकन संघ

Story: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ९ � |
04th February 2018, 06:54 pm
चहलच्या फिरकीत आफ्रिकन संघ
Pic By: ©BCCI

सेंच्युरियन :

युजवेंद्र चहलची कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट (२२ धावांत ५ बळी) गोलंदाजी व नंतर शिखर धवनच्या अर्धशतकाच्या (नाबाद ५१) जोरावर भारताने रविवारी दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ९ गड्यांनी पराभव केला. आफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी केवळ ११८ धावांचे लक्ष्य दिले होते.

दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ३२.२ षटकांत सर्व गडी गमावून ११८ धावा केल्या तर भारताने केवळ २०.३ षटकांत १ गडी गमावून मिळालेले लक्ष्य सहज गाठले. या विजयाबरोबर भारताने सहा सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेत २-०ने आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेत कोणत्याही एकदिवसीय सामन्यामध्ये ५ गडी बाद करणारा चहल पहिला भारतीय गोलंदाज बनला आहे.

लहान लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारताची सुरुवात खराब झाली व रोहित शर्मा केवळ १५ धावा काढून रबाडाच्या गोलंदाजीत मोर्ने मॉर्कलकडे झेल देऊन बाद झाला. यानंतर धवन व विराट कोहलीने यजमान संघाला आणखी आनंद साजरा करू दिला नाही. भारत विजयापासून केवळ २ धावा दूर असताना पंचांनी ‘लंच ब्रेक’ घेतला. यानंतर भारताने पुन्हा डावाला सुरुवात करत सामना आपल्या नावावर केला. शिखर धवन ५१ व कोहली ४६ धावा करून नाबाद राहिले. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ९३ धावांची अभेद्य भागीदारी केली.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हाशिम आमलाने दक्षिण आफ्रिकेला चांगली सुरुवात करून देत काही चांगले चौकार लगावले. मात्र तो २३ धावांवर भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीत यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीकडे झेल देऊन बाद  झाला. 

यानंतर क्विंटन डीकॉक (२०) चहलच्या गोलंदाजीत खराब फटका मारून पांड्याकडे झेल देत बाद झाला. कुलदीपच्या शॉर्ट पिच चेंडूवर आफ्रिकेचा हंगामी कर्णधार मार्करमने खराब शॉट लगावत मिडविकेटवर भुवनेश्वरकडे झेल दिला. यानंतर आफ्रिकेचा संघ आणखी अडचणीत आला. त्यांचा धमाकेदार फलंदाज डेव्हिड मिलर शून्य धावांवर तंबूत परतला. आफ्रिकेने ५१ धावांवर आपले महत्त्वाचे ४ गडी गमावले होते. यानंतर मात्र जेपी ड्युमिनी व झोंडोने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला.

ड्युमिनीसोबत झोंडोने डाव सांभाळण्याचा चांगला प्रयत्न केला. चहलने झोंडोला (२५) हार्दिक पांड्याकरवी झेलबाद करत यजमान संघाला पुन्हा धक्का दिला. दोघांनी पाचव्या गड्यासाठी ४८ धावांची एक महत्त्वपूर्ण भागीदारी केली. आता आफ्रिकेच्या सर्व आशा ड्युमिनीकडून होत्या, मात्र ड्युमिनीही २५ धावा करत बाद झाला.

रबाडा एक धाव काढून कुलदीपच्या गोलंदाजीत बाद  झाला तर चहलने मॉर्कलला बाद केले. बुमराहने ताहीरला खातेही उघडू दिले नाही. यानंतर चहलने ख्रिस मॉरिसला (१४) डीप कवरवर भुवनेश्वरकडे झेल देण्यास भाग पाडले. ही चहलची या डावातील पाचवी विकेट होती व त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत प्रथमच एखाद्या सामन्यात ५ गडी बाद केले. याशिवाय दक्षिण आफ्रिकेत एखाद्या एकदिवसीय सामन्यात पाच बळी बाद करणारा तो पहिला भारतीय गोलंदाजही बनला.

मार्करमकडे आफ्रिकेची कमान

दक्षिण आफ्रिकेची कमान युवा एडन मार्करमकडे सोपवण्यात आली होती व दक्षिण आफ्रिकेने हा निर्णय २०१९ चा विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून घेतला होता. मार्करमने २२ ऑक्टोबर २०१७ मध्ये बांगलादेश विरोधात पदार्पण केले होते. मार्करम दक्षिण आफ्रिकेचा दुसरा सर्वात तरुण कर्णधार असून जगातील ११ वा सर्वात तरुण एकदिवसीय कर्णधार आहे. त्याने आफ्रिकेकडून २ एकदिवसीय, ६ कसोटी सामने खेळले असून एकदिवसीयमध्ये ७५ तर कसोटीत ५२० धावा केल्या आहेत. एडन मार्करम दक्षिण आफ्रिकेचा एकदिवसीयतील १९९१ पासूनचा १३ वा कर्णधार ठरला आहे.