बेंगळुरूविरुद्ध स्वयंगोलसह एटीकेची निराशाजनक हार


04th February 2018, 03:03 am


कोलकता :  इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) चौथ्या मोसमात गतविजेत्या एटीकेची अधोगती कायम राहिली आहे. शनिवारी बेंगळुरू एफसीविरुद्ध त्यांचा दोन गोलांनी पराभव झाला. यात तिसऱ्याच मिनिटाला जॉर्डी माँटेलकडून झालेला स्वयंगोल निराशाजनक ठरला. या निकालामुळे एटीकेच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आल्या आहेत. 

भेकेचा बूट ६३व्या  मिनिटाला किगन परेराला लागला. त्यामुळे त्याला पहिले पिवळे कार्ड दाखविण्यात आले. त्यानंतर सहा मिनिटांनी त्याने जयेश राणेच्या मार्गातील चेंडू पायाने अडविला होता, पण तरिही पंचांनी त्याला दुसऱ्यांदा पिवळे कार्ड दाखविले. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले.      

त्यावेळी २१ मिनिटांचा खेळ बाकी होता. घरच्या मैदानावर एटीके प्रतिस्पर्ध्याचा एक खेळाडू कमी झाल्याचा फायदा उठविण्याची अपेक्षा होती, पण सात मिनिटे बाकी असताना मिकूने बेंगळुरुचा दुसरा गोल नोंदविला. एरीक पार्टालू याने रचलेल्या चालीनंतर जवळपास मध्य क्षेत्रातून धावत येत त्याने पायाने चेंडू जाळ्यात घालविला.      

बेंगळुरूने १३ सामन्यांत नववा विजय मिळविला. इतर चार सामने त्यांनी गमावले आहेत. त्यांचे सर्वाधिक २७ गुण झाले. दुसऱ्या क्रमांकावरील चेन्नईयीन एफसीचे १२ सामन्यांतून २३ गुण आहेत. एफसी पुणे सिटी १३ सामन्यांतून २२ गुणांसह तिसऱ्या, तर जमशेदपूर एफसी १४ सामन्यांतून २२ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. एटीकेला १३ सामन्यांत सातवा पराभव पत्करावा लागला. तीन विजय व तीन बरोबरीसह १२ गुण मिळवून त्यांचे आठवे स्थान कायम राहिले.      

 तिसऱ्याच मिनिटाला महत्त्वाची घटना घडली. बेंगळुरूच्या एदू गार्सियाने उदांता सिंगला अप्रतिम पास दिला. उदांताने पेनल्टी क्षेत्रात चेंडू मारला. तो रोखण्याच्या प्रयत्नात एटीकेच्या जॉर्डी माँटेलचा अंदाज चुकला. अखेर चेंडू त्याच्या पायाला लागून नेटमध्ये गेला.      

सातव्या मिनिटाला बेंगळुरुला फ्री-किक मिळाली होती, पण त्यावर गार्सीयाने मारलेला फटका अडविला गेला. १५व्या मिनिटाला एटीकेच्या बिपीन सिंगने डावीकडून आगेकूच करीत बॉक्समध्ये असलेल्या रुपर्ट नाँगरुमला पास दिला, पण रुपर्टचा फटका हुकला. १८व्या मिनिटाला एटीकेला फ्री-किक मिळाली होती, पण रायन टेलरने मारलेला चेंडू बेंगळुरुचा गोलरक्षक गुरप्रीत सिंगने अडविला.