सौदी अरेबियातील तेलावर ‘हुती’ संकट!

Story: विश्वरंग - सौदी अरेबिया |
18th September, 11:01 pm
सौदी अरेबियातील तेलावर ‘हुती’ संकट!

ये मेनमधील इराणसमर्थित हुती बंडखोरांनी दक्षिण लाल समुद्रातील ग्रेटर हनीश आणि लेसर हनीश या दोन महत्त्वाच्या बेटांवर ताबा मिळवल्याने सौदी अरेबियासमोरील सुरक्षा आणि तेल वाहतुकीचे संकट अधिक गंभीर झाले आहे. या बेटांवरील नियंत्रणामुळे बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीतील सागरी वाहतुकीवर हुतींचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. जागतिक व्यापार आणि तेल वाहतुकीसाठी हा महत्त्वाचा समुद्री मार्ग असल्याने या घडामोडीमुळे प्रादेशिक तणाव आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

एपीच्या वृत्तानुसार, सौदीसमर्थित येमेन सरकारशी संबंधित शेकडो लढवय्यांनी हनीश बेटांवरून माघार घेतल्यानंतर हुतींनी तेथे ताबा मिळवला. बाब-अल-मंदेबजवळ हुतींची वाढती आगेकूच रोखण्यासाठी येमेन सरकारच्या सैन्याकडून प्रयत्न सुरू असतानाच ही घडामोड झाली.

इराणकडून होर्मुज सामुद्रधुनीवरील वाहतुकीत अडथळे निर्माण झाल्यानंतर सौदी अरेबियाने आपली पूर्व-पश्चिम तेलवाहिनी अधिक वापरण्यास सुरुवात केली होती. मात्र, या पाइपलाइनवरील ड्रोन हल्ल्यानंतर तिचे कामकाज मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले असून ती काही आठवडे बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाल समुद्रमार्गाचे महत्त्व आणखी वाढले आहे.

हुतींच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर सौदीने आपल्या पारंपरिक मित्रदेशांकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. पाकिस्तानने सौदीच्या भूमीच्या संरक्षणासाठी मदत करण्याची तयारी दर्शवली असली, तरी येमेनच्या भूमीवर थेट युद्ध मोहिमेत सहभागी होण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. अमेरिका आणि ब्रिटनकडूनही थेट लष्करी कारवाईऐवजी गुप्तचर मदत आणि संरक्षणात्मक सहकार्यावर भर दिला जात असल्याचे सांगण्यात येते.

‘द जेरूसलेम पोस्ट’ आणि ‘इस्रायल हयोम’च्या वृत्तानुसार, सौदी अरेबिया आणि इस्रायल यांच्यात अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या माध्यमातून चर्चा सुरू आहे. हुतींच्या हल्ल्यांपासून सौदीच्या पायाभूत सुविधा आणि महत्त्वाच्या लक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी इस्रायलकडून गुप्तचर मदत मिळविण्यावर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. सध्या ही मदत प्रामुख्याने गुप्तचर आणि संरक्षणात्मक स्वरूपाची असल्याचे संबंधित वृत्तांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

‘इस्रायल हयोम’च्या वृत्तानुसार, सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी हुतींच्या विरोधातील कारवाईसाठी अन्य खाडी देश तसेच इजिप्तकडेही मदत मागितली आहे. बाब-अल-मंदेबवरील वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलशी अप्रत्यक्ष संपर्क साधून गुप्तचर मदतीची मागणी करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे येमेनमधील संघर्षाचा प्रभाव आता लाल समुद्रातील व्यापारी आणि तेल वाहतुकीवर अधिक स्पष्टपणे जाणवण्याची शक्यता आहे.