पणजी : गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील संशयित इस्त्रायली नागरिक यानिव्ह बेनाईम ऊर्फ अटाला याला न्यायालयात शरण येण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार तो आज आपल्या वकिलासह मेरशी येथील सत्र न्यायालयात दाखल झाला. आणि न्यायालयात शरण आला.
पोलिसांच्या माहितीनुसार याप्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, ५ एप्रिल २०२५ रोजी शिवोली येथील त्याच्या निवासस्थानावरून कोकेन आणि चरस जप्त करण्यात आला होता. याप्रकरणात या वर्षाच्या १४ ऑगस्टला उत्तर गोवा विशेष एनडीपीएस न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तो फरार झाला होता. त्यामुळे सत्र न्यायालयाने त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. न्यायालयात शरण आल्यानंतर आता अटाला याची रवानगी कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
२१ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी
दरम्यान, अटालाने कनिष्ठ न्यायालयाच्या जामीन फेटाळण्याच्या निर्णयाला गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर आता २१ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना अटालाचा वकील ॲड. मांगिरीश उसगावकर यांनी सांगितले की, त्याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयात आहे. जामीन अर्ज २१ सप्टेंबर रोजी सुनावणीस येणार असून, त्यावर युक्तीवाद होण्याची शक्यता आहे.


