सत्तरीचे धबधबे निसर्गाचा आशीर्वाद की निष्काळजीपणामुळे वाढणारे मृत्यूचे सापळे?

राहुल बिंदचा मृत्यू हा व्यवस्थेला गंभीर इशारा आहे. सत्तरीतील धबधब्यांवर निष्पाप जीव वाचवण्यासाठी प्रशासन, शिक्षक आणि स्थानिक समाजाने एकत्र येत जबाबदार व सुरक्षित पर्यटनाची कठोर अंमलबजावणी करणे काळाची गरज आहे.

Story: विशेष |
08th August, 11:36 pm
सत्तरीचे धबधबे निसर्गाचा आशीर्वाद की निष्काळजीपणामुळे वाढणारे मृत्यूचे सापळे?

पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेल्या सत्तरी तालुक्याला निसर्गाने नयनरम्य धबधबे आणि घनदाट जंगलांचे भरभरून दान दिले आहे. अलीकडच्या काळात गोव्यात समुद्रकिनाऱ्यांसोबतच निसर्गपर्यटनाला (इको-टुरिझम) मोठी पसंती मिळत असून, शांतता आणि हिरवाईच्या शोधात हजारो पर्यटक सत्तरीकडे वळत आहेत. मात्र, या वाढत्या पर्यटनासोबतच दारू पिऊन धिंगाणा घालणे, अनधिकृत ट्रेकिंग, धोकादायक ठिकाणी सेल्फी घेणे आणि सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवणे या प्रवृत्ती वाढल्या आहेत, ज्या सत्तरीच्या पर्यटन प्रतिमेवर काळे ढग आणत आहेत.

सत्तरीतील अनेक धबधबे दिसायला जितके आकर्षक आहेत, तितकेच ते अत्यंत धोकादायकही आहेत. विशेषतः पावसाळ्यात वेगवान प्रवाह, निसरडे दगड, खोल डोह आणि अनपेक्षितपणे वाढणारी पाणीपातळी यामुळे मोठा धोका निर्माण होतो. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा अंदाज नसतो; त्यामुळे पाण्यात उतरल्याने जीवघेणे अपघात घडतात. तोणीर येथील दुर्घटनेने या गंभीर समस्येकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले असून, पर्यटनाच्या नावाखाली होणारा निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो हेच यातून स्पष्ट होते.

दुसरीकडे, योग्य नियोजन केल्यास पर्यटन सुरक्षित होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाणीवली, सरवणे आणि पाली धबधब्यांवर राबवलेले मॉडेल. येथे प्रवेश नियंत्रण, सुरक्षा व्यवस्था आणि मूलभूत सुविधा पुरवल्याने अपघात टळले असून पर्यटकांचा प्रतिसादही वाढला आहे. सुरक्षितता आणि पर्यटन विकास हे एकमेकांच्या विरोधात नसून परस्परपूरक आहेत. त्यामुळे दुर्घटनांना आळा घालण्यासाठी कठोर धोरण, जबाबदार ट्रेकिंग आणि शैक्षणिक सहलींसाठी स्पष्ट नियमावली लागू करण्याची अत्यंत गरज आहे.

तोणीर दुर्घटना : संपूर्ण गोव्याला हादरवणारी घटना

सावर्डे ग्रामपंचायत क्षेत्रातील तोणीर-काजरेघाट धबधब्यावर घडलेली दुर्घटना ही अत्यंत वेदनादायक आणि धक्कादायक घटना ठरली आहे. दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालय, वास्को येथील २३ विद्यार्थ्यांचा गट शिक्षकांसह ट्रेकिंगसाठी या परिसरात आला होता. वन विभागाने हा धबधबा ‘हाय-रिस्क झोन’ म्हणून घोषित करून पर्यटकांसाठी प्रवेशबंदी लागू केली असतानाही हा गट चोरट्या मार्गाने प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्याचे समोर आले.

या सहलीदरम्यान राहुल बिंद (वय १७) या अकरावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्याने पाण्यात प्रवेश केला आणि तो बुडाला. शिक्षकांसमक्ष घडलेल्या या घटनेने संपूर्ण गोवा हादरला. अनेक तासांच्या शोधमोहिमेनंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

धोकादायक धबधब्यावर विद्यार्थ्यांना नेणे हा अत्यंत गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार आहे. तोणीर धबधब्यावर यापूर्वीही अनेक दुर्घटना घडल्यामुळे आणि एका पर्यटकाचा मृत्यू झाल्यामुळे वन विभागाने तेथे प्रवेशबंदी लागू केली होती. असे असतानाही विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून प्रतिबंधित क्षेत्रात ट्रेक आयोजित केल्याने वन विभागाने चार शिक्षक आणि दोन टूर ऑपरेटरवर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

शिक्षणासाठी निसर्ग भ्रमंती किंवा ट्रेकिंग आयोजित करणे नक्कीच कौतुकास्पद आहे, परंतु विनापरवानगी धोकादायक आणि प्रतिबंधित ठिकाणी विद्यार्थ्यांना नेणे पूर्णपणे चुकीचे आहे. शिक्षक हे समाजाचे मार्गदर्शक असतात, त्यामुळे पर्यटनाला जाताना मुलांच्या सुरक्षेचे भान राखणे ही त्यांची सर्वात मोठी जबाबदारी असते. पावसाळ्यात बुडण्याच्या घटना वाढत असल्याचे माहित असूनही नियमांचे उल्लंघन करणे हे अक्षम्य दुर्लक्ष असून, अशा प्रकारांवर वेळीच आवर घालण्याची गरज आहे.

शैक्षणिक सहलींसाठी खालील बाबी अनिवार्य असायला हव्यात:

संबंधित विभागांची पूर्वपरवानगी

वन विभाग, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय

जोखीम मूल्यांकन (Risk Assessment)

प्रशिक्षित मार्गदर्शक

विद्यार्थ्यांवर सतत देखरेख

आपत्कालीन बचाव साधने

हवामानाचा अंदाज

धोकादायक ठिकाणांची स्पष्ट माहिती

पालकांची लेखी संमती

या बाबींचे पालन न केल्यास भविष्यात अशा दुर्घटना पुन्हा घडू शकतात.


केवळ शिक्षक आणि टूर ऑपरेटरवर गुन्हे दाखल करून किंवा न्यायालयीन कारवाई करून असा प्रश्न सुटणार नाही. प्रत्येक दुर्घटनेनंतर काही दिवस चर्चा होते आणि नंतर हा विषय मागे पडतो. एका विद्यार्थ्याचा जीव जाणे अत्यंत दुर्दैवी आहे; परंतु या घटनेतून बोध घेऊन भविष्यात विद्यार्थ्यांचे जीव वाचवण्यासाठी प्रशासन, शिक्षण व्यवस्था आणि समाजाने एकत्र येऊन दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे.

यासाठी शिक्षण खात्याने सर्व शाळा व महाविद्यालयांसाठी स्वतंत्र आणि कठोर सुरक्षा प्रोटोकॉल लागू करणे अत्यावश्यक आहे. यामध्ये पावसाळ्यात धोकादायक धबधब्यांवरील सहलींवर पूर्ण बंदी घालणे, सहलीपूर्वी प्रशासनाची परवानगी अनिवार्य करणे, शिक्षकांना सुरक्षा प्रशिक्षण देणे आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी स्पष्ट आराखडा तयार असणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या सूचना देणे, केवळ अधिकृत ट्रेकिंग मार्गांचाच वापर करणे आणि बंदी असलेल्या ठिकाणांची स्पष्ट माहिती शाळांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. यापूर्वी मार्गदर्शक तत्त्वे जारी झाली असली, तरी आता त्यांची काटेकोर अंमलबजावणी आणि कठोर कारवाईची पुन्हा एकदा गरज आहे.

धोकादायक धबधब्यांवर:

कायमस्वरूपी सुरक्षा कर्मचारी

सीसीटीव्ही यंत्रणा

चेतावणी फलक

प्रवेशद्वार नियंत्रण

दंडात्मक कारवाई

स्थानिक स्वयंसेवक

आपत्कालीन बचाव केंद्र

या उपाययोजना तातडीने राबविणे आवश्यक आहे.

स्थानिक नागरिकांना सत्तरीतील नद्या आणि धबधब्यांच्या धोक्यांची पूर्ण जाणीव असते. गेल्या पाच वर्षांत बुडून मृत्यू झालेल्यांमध्ये बहुतांश शहरी पर्यटक असल्याने, स्थानिक समाजाने पुढे येऊन पर्यटकांना धोक्याची पूर्वकल्पना देणे, प्रशासनाला सहकार्य करणे आणि जनजागृती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण प्रत्येक दुर्घटनेमुळे एका कुटुंबासोबतच गाव, तालुका आणि सत्तरीच्या पर्यटन प्रतिमेला मोठा धक्का बसतो.

राहुल बिंद या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा झालेला मृत्यू ही केवळ अपघात नसून संपूर्ण व्यवस्थेला मिळालेला गंभीर इशारा आहे. सत्तरीचे धबधबे बदनामीपासून वाचवण्यासाठी, पर्यटन सुरक्षित करण्यासाठी आणि भविष्यात एकाही निष्पाप विद्यार्थ्याचा वा पर्यटकाचा जीव जाऊ नये यासाठी प्रशासन, शिक्षक आणि स्थानिक समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे. सत्तरीचे सौंदर्य हे तिचे वरदान आहे; पण जर आपण जबाबदार पर्यटन, नियमांचे पालन आणि सुरक्षिततेला प्राधान्य दिले नाही, तर हेच सौंदर्य निष्काळजीपणामुळे मृत्यूचा सापळा ठरत राहील.


- उदय सावंत, वाळपई