CBT (Computer Based Test) १ आणि २ या दोन्ही परीक्षांमध्ये इंग्रजी भाषा आणि व्याकरण या घटकावर २० गुणांचे महत्त्वपूर्ण प्रश्न विचारले जातात. या २० गुणांमध्ये 'कॉम्प्रिहेन्शन' म्हणजेच पॅसेजवर आधारित प्रश्नांचा समावेश हा हमखास असतो. अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजी पॅसेज सोडवणे कठीण किंवा वेळखाऊ वाटते; परंतु योग्य नियोजन, योग्य रणनीती आणि सरावाचा अवलंब केल्यास या विभागात पैकीच्या पैकी गुण मिळवणे सहज शक्य आहे. इंग्रजी पॅसेजची तयारी कशी करावी, परीक्षेत वेळ कसा वाचवावा आणि अचूक उत्तरे कशी शोधावीत, याविषयीचे सविस्तर व सखोल मार्गदर्शन खालीलप्रमाणे आहे.
१. प्रश्न सोडवण्याची शास्त्रीय आणि योग्य पद्धत
परीक्षा गृहात अनेक विद्यार्थी एक सामान्य चूक करतात. ते आधी संपूर्ण पॅसेज वाचायला सुरुवात करतात, त्यानंतर प्रश्न वाचतात आणि पुन्हा उत्तरे शोधण्यासाठी पॅसेजकडे वळतात. ही पद्धत अत्यंत चुकीची आणि वेळखाऊ आहे. यामुळे परीक्षेमध्ये गोंधळ निर्माण होतो आणि वेळ अपुरा पडतो. त्याऐवजी खालील त्रिस्तरीय पद्धतीचा वापर करावा:
सर्वप्रथम प्रश्न आणि पर्याय वाचा: पॅसेज वाचण्यास सुरुवात करण्यापूर्वी त्याखाली दिलेले सर्व प्रश्न आणि त्यांचे पर्याय लक्षपूर्वक वाचून घ्यावेत.
वाचनाचे उद्दिष्ट निश्चित करा: प्रश्न आधी वाचल्यामुळे पॅसेजमध्ये कोणती माहिती महत्त्वाची आहे, हे आधीच स्पष्ट होते. तसेच थेट प्रश्नांव्यतिरिक्त 'निष्कर्षात्मक' (Inferential) प्रश्नांचा मुख्य रोख काय आहे, याची पूर्वकल्पना येते.
उत्तरे शोधत पॅसेज वाचा: मनात प्रश्न ठेवून जेव्हा तुम्ही पॅसेज वाचता, तेव्हा महत्त्वाच्या ओळी आणि उत्तरे लगेच हायलाइट होतात. यामुळे थेट उत्तर सापडून वेळेची मोठी बचत होते.
२. पॅसेजचे स्वरूप आणि संभाव्य विषयांची व्याप्ती
परीक्षांमध्ये दिला जाणारा पॅसेज हा बहुधा एखाद्या विषयावरील अहवाल, लेख किंवा तज्ज्ञांचे मत या स्वरूपाचा असतो. CBT आणि CBAT परीक्षांमध्ये बऱ्याचदा क्लिष्ट, जड, तांत्रिक किंवा कधीही न ऐकलेले कठीण शब्दसमूह असणारे इंग्रजी पॅसेज दिले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिक तयारी असणे आवश्यक आहे. सामान्यतः खालील विविध विषयांवर आधारित पॅसेज विचारले जाण्याची दाट शक्यता असते:
औद्योगिक धोरण, व्यापार आणि देशाची वाढती अर्थव्यवस्था
पर्यावरणीय समस्या, हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ
राष्ट्रीय अणुधोरण आणि आंतरराष्ट्रीय परराष्ट्रनीती
शेती क्षेत्रातील आव्हाने, ग्रामीण विकास आणि आर्थिक व्यवस्था
वाढती महागाई, बेरोजगारी आणि विविध सामाजिक-आर्थिक मुद्दे
३. इंग्रजी व्याकरण, इडियम्स आणि शब्दसंग्रहाचे महत्त्व
पॅसेजमधील प्रश्नांचे अचूक आकलन होण्यासाठी अवांतर इंग्रजी वाचन अत्यंत महत्त्वाचे ठरते. केवळ भाषेचे वरवरचे ज्ञान पुरेसे नसून, खालील घटकांवर विशेष भर देणे गरजेचे आहे:
इडियम्स आणि फ्रेजेस (Idioms & Phrases): बऱ्याचदा पॅसेजमधील एखाद्या विशिष्ट प्रसंगाला अनुरूप असणारी योग्य 'Phrase' किंवा 'Idiom' कोणती, असा थेट प्रश्न विचारला जातो.
समानार्थी व विरुद्धार्थी शब्द (Synonyms & Antonyms): प्रसंगाच्या संदर्भावरून एखाद्या विशिष्ट शब्दाचा समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द विचारला जातो. यासाठी शब्दसंग्रह (Vocabulary) मजबूत असणे आवश्यक आहे.
संदर्भानुसार भावार्थ समजणे (Contextual Meaning): जर एखाद्या कठीण शब्दाचा थेट अर्थ माहिती नसेल, तर घाबरून न जाता संपूर्ण वाक्याचा आणि प्रसंगाचा संदर्भ लक्षात घेऊन त्याचा भावार्थ काढण्याचा प्रयत्न करावा. यामुळे उत्तर देणे सोपे जाते.
४. वेळेचे नियोजन आणि परीक्षेतील मानसिक एकाग्रता
कॉम्प्रिहेन्शनचे प्रश्न सोडवताना मानसिक एकाग्रता आणि शांत चित्त असणे अत्यंत आवश्यक आहे. घाईगडबडीत किंवा ताणाखाली चुका होण्याची शक्यता जास्त असते. यासाठी वेळेचे नियोजन खालीलप्रमाणे ठेवावे:
पॅसेजचे प्रश्न शेवटी सोडवावेत: जसे मुख्य जेवण झाल्यावर शेवटी ताक पिण्याची पद्धत असते, अगदी तसेच CBT परीक्षेतील इतर सर्व वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवून झाल्यावरच शेवटी पॅसेजच्या प्रश्नांकडे वळावे. आधी पॅसेज सोडवायला घेतल्यास, पुढील न बघितलेल्या प्रश्नांची उत्सुकता आणि ताण यामुळे मनात एकाग्रता राहत नाही.
अनावश्यक ताण घेऊ नका: कॉम्प्रिहेन्शनचा अजिबात ताण घेऊ नये; कारण या प्रश्नांची उत्तरे ही तुमच्या डोळ्यांसमोरच पॅसेजमध्ये दडलेली असतात. फक्त शांत डोक्याने, नीट शोधून आणि विचारपूर्वक योग्य पर्यायाची निवड करायची असते.
इंग्रजी विषयाला कधीही हलक्यात न घेता गांभीर्याने आणि नियोजित पद्धतीने अभ्यास केल्यास कोणत्याही स्पर्धा परीक्षेत उत्तम गुण मिळवून यश संपादन करता येते.

- अॅड. शैलेश कुलकर्णी, कुर्टी - फोंडा, (लेखक नामांकित वकील आणि करिअर समुपदेशक आहेत.)


