रानभाजी महोत्सव रानभाज्यांचे पुनरुत्थान

रानभाजी महोत्सवासारख्या उपक्रमामुळे विस्मृतीत चाललेल्या अनेक रानभाज्यांना नव्याने ओळख मिळते. खऱ्या अर्थाने निरोगी समाज घडवायचा असेल तर आधुनिक आहारपद्धतीतील चांगल्या बाबी स्वीकारतानाच आपल्या मातीत रुजलेल्या पारंपरिक अन्नसंस्कृतीचे जतन करणे आवश्यक आहे.

Story: साद निसर्गाची |
08th August, 11:22 pm
रानभाजी महोत्सव  रानभाज्यांचे पुनरुत्थान

पावसाळ्याची चाहूल लागताच गोव्याच्या डोंगरदऱ्या, माळराने, शेतबांध आणि वनक्षेत्रे हिरव्यागार वनस्पतींनी बहरून जातात. निसर्गाच्या या समृद्ध कुशीत अनेक प्रकारच्या रानभाज्या आपोआप उगवतात. स्थानिक लोकजीवन, पारंपरिक आहारसंस्कृती आणि जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग असलेल्या या रानभाज्या पूर्वीच्या पिढ्यांच्या दैनंदिन आहारातील अविभाज्य घटक होत्या. मात्र, बदलती जीवनशैली, शहरीकरण आणि आधुनिक खाद्यसंस्कृतीच्या प्रभावामुळे या अमूल्य खाद्यवारशाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत रानभाज्यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित करणे ही काळाची गरज बनली आहे.

संस्कृत भाषेत आरोग्य विषयक एक सुभाषित प्रचलित आहे, ‘आरोग्यं धनसंपदा’. शाळेत असताना बाई आम्हाला सतत सांगायच्या, आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारात पालेभाज्यांचा समावेश करणे आवश्यक आहे. लहानपणी ताट वाढताना आजी आवर्जून पालेभाजी वाढायची आणि ताटात वाढलेली भाजी खाऊन संपेपर्यंत समोर बसून राहायची.

आज आहाराची व्याख्याच बदलली आहे. दाळ-भात, भाकरी-लोणी-भाजी, कोशिंबीर यासारख्या पौष्टिक आहाराचा त्याग करत समाज फास्ट फूड पदार्थ, जसे पिझ्झा, बर्गर, पास्ता, पेस्ट्री, चीजकेक, डोनट, वॅफल यांसारखे अतिगोड, चमचमीत आणि तिखट जिन्नस खाण्याकडे वळत आहे. आहाराच्या बदलणाऱ्या सवयींमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पालक, शेपू, सुरण, तेरो, अळू, शेवगा, मुळा, तोंडली, तांबडी भाजी यांसारख्या पालेभाज्या हळूहळू आहारातून हरवत चालल्या आहेत. त्यांची जागा आज बटाटा, कांदा, ढोबळी मिरची, टोमॅटो, वांगे, भेंडी, कोबी, गवार, फुलकोबी यांनी घेतली आहे. टाकळा, कुड्डूक, कोंब क्वचितच खायला मिळतात; तेनिया भाजी, एकपाना भाजी, हर्फुले भाजी, गुंडुरे, शतमूली, शिदोडी, सुरळी, रानटाकळा, काथने, चंदीण, शेवळा, हस्तीपात, कोष्ट, भारंगी, कपाळफोडी, पांढरा कुडा, फोडशी, भारंगी यांसारख्या रानभाज्या आहारात समाविष्ट करणे तर दूरच, कितीतरी जणांना या रानभाज्यांची नावेही माहीत नाहीत.

एकेकाळी पावसाळा आला की गावोगावी रानभाज्यांचा शोध घेण्यासाठी लोक रानावनात फिरायचे. कोणत्या रानभाजीचा कोणता भाग खायचा, ती कशी शिजवायची, तिचे औषधी गुणधर्म काय आहेत, याचे ज्ञान घरातील ज्येष्ठ मंडळी पुढील पिढीपर्यंत पोहोचवत असत. दुर्दैवाने, आधुनिकतेच्या ओघात ही परंपरा लोप पावत चालली आहे. आहारातील असंतुलनामुळे कित्येक मुलांना लठ्ठपणा, दृष्टिदौर्बल्य, हाडेदुखी यांसारखे त्रास सहन करावे लागतात. 

गोव्यातील जैवविविधतेने समृद्ध वनक्षेत्रांमध्ये आजही अनेक दुर्मिळ रानभाज्या आढळतात. परंतु वाढते शहरीकरण, बदलती जीवनशैली आणि पारंपरिक ज्ञानाचा अभाव यामुळे या वनसंपदेविषयीची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे रानभाज्यांचे संवर्धन, त्यांची ओळख आणि त्यांचे पोषणमूल्य समाजापर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज बनली आहे.

कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आरोग्य चांगले राहावे यासाठी घरातील वडीलधारी मंडळी सातत्याने प्रयत्नशील असतात. त्याचप्रमाणे समाज आणि राज्य निरोगी राहावे यासाठीही दूरदृष्टीने उपक्रम राबविण्याची गरज असते. गोवा राज्याचे माननीय मंत्री डॉ. रमेश तवडकर यांनी रानभाज्यांचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी घेतलेला पुढाकार याच भूमिकेचा भाग आहे. यंदा हा महोत्सव गोव्याच्या सांस्कृतिक राजधानीत आयोजित करण्यात आला होता. 

"महोत्सवाच्या माध्यमातून रानभाज्यांच्या प्रदर्शनासोबत लोकांना त्यांच्या पौष्टिक मूल्यांची, औषधी गुणधर्मांची आणि स्थानिक जैवविविधतेच्या जतनाची जाणीव होते," अशी प्रतिक्रिया संयोजक सौ. सविता तवडकर यांनी दिली. डॉ. तवडकर यांच्या नेतृत्वाखाली रानभाज्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठीही काणकोणवासी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. रानभाजी महोत्सवासारख्या उपक्रमामुळे विस्मृतीत चाललेल्या अनेक रानभाज्यांना नव्याने ओळख मिळते. खऱ्या अर्थाने निरोगी समाज घडवायचा असेल तर आधुनिक आहारपद्धतीतील चांगल्या बाबी स्वीकारतानाच आपल्या मातीत रुजलेल्या पारंपरिक अन्नसंस्कृतीचे जतन करणे आवश्यक आहे. रानभाज्यांना आपल्या ताटात पुन्हा मानाचे स्थान मिळेल, तेव्हाच ‘आरोग्यं धनसंपदा’ या उक्तीचा खरा अर्थ साकार होईल असेही त्या म्हणाल्या.


- स्त्रिग्धरा नाईक, (लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)