राजाने आपल्या मुलीशीच लग्न करण्याचा हट्ट धरल्यावर बिचारी राणी काय करणार? तिने मुलीला खोडकात घातले आणि वेशीच्या बाहेर ढकलले. राणीने राजकन्येला वेशीबाहेर ढकलल्यानंतर राजकन्येने खोडकाचा चाप ओढला. चाप ओढताच ते खोडूक चालू लागले. खोडकाच्या आतून राजकन्येला समोरच्या सगळ्या गोष्टी अगदी साफ दिसत होत्या. काळोख असल्यामुळे राजकन्या वेशीच्या जवळच थांबली आणि पहाट होण्याची वाट पाहू लागली.
झुंजूमुंजू झाले. सूर्याची कोवळी किरणे आभाळात पसरत होती. आभाळात जर्द केशरी रंग पसरला होता. त्याचा लालीमा आजूबाजूच्या वातावरणात पसरला होता. राजकन्येने पाहिले, तिचे खोडूक राजपथावर होते. व्यवस्थित दाब दिलेला तो मातीचा राजपथ दोहोबाजूंनी रंगीबेरंगी सुशोभित झाला होता. राजपथावरूनच राज्याची समृद्धी कोणाच्याही लक्षात आली असती. राजकन्या खोडकाचा चाप ओढत ओढत पुढे जाऊ लागली. आईने राजतळ्याकडे जाईपर्यंतच्या खाणाखुणा सांगितल्या होत्या. त्या खाणाखुणांचा अंदाज घेत घेत राजकन्या तळ्याचा शोध घेत होती. खोडूक बरेच अंतर पुढे गेल्यावर राजकन्येला तो भला मोठा तलाव दिसला.
पूर्ण गोलाकार असलेला तो तलाव अतिशय सुंदर होता. तलावाच्या भोवती सुंदर फुलझाडांची बाग होती. तलावामध्ये तऱ्हेतऱ्हेचे राजहंस डौलात विहार करत होते. रंगीबेरंगी पक्षांचे थवे बागेतील झाडाझाडांवर कुंजन करीत बसले होते. अतिसुंदर असा राजतळ्यावरचा देखावा पाहून राजकन्येचे देहभान हरपले. रात्रभर प्रवास केल्यामुळे तिला शीण आला होता. तळ्याच्या नुसत्या दर्शनानेच तिचा थकवा नाहीसा झाला. या थंडगार पाण्यामध्ये मनसोक्त आंघोळ करायची तिची इच्छा झाली. राजकन्येने हळूच खोडकाचे दार उघडले. ती बाहेर आली. बाह्यवस्त्रे काढून स्वच्छ धुतली. तिथेच एका झाडावर ती वाळायला ठेवली. आता तिच्या अंगावर फक्त रेशमी अंतर्वस्त्रे होती. त्या अंतर्वस्त्रांमध्ये राजकन्या अधिकच सुंदर दिसत होती. तिचे स्त्रीत्व खुलून दिसत होते. पाण्यात उतरताच राजकन्या एखाद्या अप्सरेपेक्षा कमी भासत नव्हती. आपल्याच धुंदीत राजकन्या मनसोक्त आंघोळ करत असताना तिला राजपथावर धुळीचा लोट उठताना दिसला. धुळीचा लोट बघताच राजकन्या दचकली. पटकन झाडावर वाळत घातलेली आपली वस्त्रे अंगभर लपेटली आणि पटकन खोडकाच्या आत गेली. दार बंद करून शांत उभी राहिली.
खोडकाच्या आतून तिने पाहिले, धुळीच्या लोटासोबत एक रथ तळ्याकाठी येऊन थांबला. त्यातून एक सुंदर तरुण तळ्याकाठी येऊन शोधाशोध करत होता. त्याने नेसलेल्या तलम रेशमी कपड्यांवरून आणि त्याने आणलेल्या रथावरून तो नक्कीच राजकुमार असावा असे वाटत होते. त्याच्यासोबत त्याचा सारथी होता. राजकुमाराची बेचैन नजर चोहोबाजूंनी भिरभिरत होती.
“युवराज, माझे ऐकावे. आपल्याला भास झाला असावा.”
“छे छे! सारथी, हे शक्य नाही. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले. एक सुंदर युवती या तळ्यातून बाहेर आली आणि इथेच नाहीशी झाली.”
“पण युवराज, आपण दुसऱ्या क्षणी या ठिकाणी पोहोचलो. एका क्षणात ती युवती कुठे जाणार? ती असती तर इथे जवळपास दिसली असती. पण इथे पाखरांशिवाय अजून कोणीच नाही.”
राजकुमाराला काय बोलावे ते काहीच सुचेना. त्याने एक युवती पाहिली होती नक्की, पण ती आता दिसत नाही हेही तितकेच खरे. नाईलाजाने युवराज तळ्यात आंघोळ करून माघारी परतला.
दुसऱ्या दिवशी युवराज पुन्हा तळ्याकाठी आला. या वेळेला राजकन्येने अगदी भल्या पहाटे आपली आंघोळ उरकली होती. पण गंमत अशी झाली, घाईगडबडीत आपली बाह्यवस्त्रे नेसताना कमरेचा शेला ती झाडावरच विसरली. सकाळी जेव्हा युवराज तळ्यात आंघोळ करत होता, त्यावेळी त्याची नजर त्या शेल्यावर गेली. या शेल्यामुळे युवराजाची पक्की खात्री झाली की काल आपण जी युवती पाहिली होती, ती भास नसून इथे नक्कीच कोणीतरी स्त्री रोज येत असावी. पण आता त्या युवतीला शोधावे कसे?
तिच्या ओझरत्या दर्शनाने युवराजाला मदनाचा बाण बसला होता. तो राजकन्येच्या पाठमोऱ्या सौंदर्यावर भाळला होता. जी युवती पाठमोरी एवढी सुंदर दिसत असेल, ती प्रत्यक्ष किती सुंदर असेल? या निर्जन तळ्याकाठी ती काय करत असेल? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात येत होते. या प्रश्नांचे नेमके उत्तर शोधण्यासाठी राजकुमाराने एक युक्ती शोधून काढली.
त्या रात्री युवराज एकटाच तळ्याकाठी आला. तिथे असलेल्या एका पानांनी भरगच्च असलेल्या झाडावर चढला आणि पहाट होण्याची वाट पाहू लागला. अगदी ब्रह्ममुहूर्तावर युवराजाने पाहिले, ‘बागेच्या शेजारी एक खोडूक आहे. त्या खोडकामधून एक सुंदर युवती बाहेर आली. तिने आपली बाह्यवस्त्रे धुतली. झाडावर वाळत घातली. तळ्यात आंघोळ केली. पुन्हा खोडकाजवळ गेली. खोडकाचे दरवाजा उघडून आत गेली.’
“अरे, हा कोणता खेळ आहे? ही कोण युवती आपल्या राज्यामध्ये अशी चोरून राहत आहे? कोणी का असेना, आहे मात्र अप्सरेपेक्षाही सुंदर. लग्न करीन तर हिच्याशीच.” राजकुमाराने विचार केला.
राजकुमार झाडावरून खाली उतरला. सरळ खोडकाकडे आला. त्याने पाहिले, या खोडकाला दार जरी असले तरी ते बाहेरून दिसत नव्हते. खोडकाचे दार बाहेरून उघडण्याची कोणतीच सोय नव्हती. त्याने खूप प्रयत्न केला. कित्येक वेळ खोडकाभोवती गिरट्या घातल्या, पण व्यर्थ. शेवटी नाईलाजाने तो घरी परतला.
घरी परतल्यावर युवराज राणीपाशी गेला. म्हणाला, “माते, तुम्ही माझ्या लग्नाचा विचार करत होता, त्यावेळी मला लग्न करावेसे वाटत नव्हते. पण आता माझी तयारी आहे. मी लग्नासाठी तयार आहे.” हे ऐकताच राणी अतिशय खूश झाली. “युवराज, कोणी राजकन्या तुमच्या नजरेत आहे का? तुम्ही सांगाल तिच्याशी तुमचा विवाह करून देऊ.”
“हो माते, तुम्ही लग्नाची तयारी करा. मी नवरी मुलगी घेऊन येईन. पण माझी एक अट आहे. तुम्ही उद्याच माझे लग्न केले पाहिजे.”
शेवटी बोलून चालून राजघराणे! लग्नाच्या तयारीसाठी त्यांना किती वेळ लागणार? दुसऱ्या दिवसापर्यंत लग्नाची सगळी तयारी झाली होती. मंडप सजला होता. संपूर्ण नगर सुशोभित झाले होते. राजनगरातील प्रजा नटूनथटून युवराजाच्या लग्नाचे साक्षीदार होण्यासाठी मंडपात जमली होती. सनई-चौघडे वाजत होते. राजकुमाराने भरजरी वस्त्रे धारण केली. लग्नघटिका जवळ येत होती, पण नवरी मुलीचा कुठेही पत्ता नव्हता.
राजाराणी युवराजाला नवरी मुलीबद्दल विचारून विचारून थकले होते, पण त्याच्याकडून कोणतेही ठोस उत्तर मिळत नव्हते.
त्याने फक्त एवढेच म्हटले, “मंगलाष्टका म्हणायला सुरुवात करा, मंगलाष्टका संपण्याच्या आत नवरी मुलगी इथे उभी राहील.”
राजकुमार जयमाला घेऊन उभा होता. लग्नघटिका भरताच राजकुमाराच्या खास सेवकांनी तळ्याकाठचे ते खोडूक आणले आणि राजकुमाराच्या समोर ठेवले. 'शुभमंगल सावधान' या गजरात राजकुमाराने त्या खोडकाच्या गळ्यात जयमाला घातली. हे पाहून सगळे लोक अचंबित झाले. अरे, हे काय? राजकुमाराने एका खोडकाशी लग्न केले? जो तो कुजबुजू लागला. राजाराणीला तर धक्काच बसला. राजा तडाखात पावले मारत आपल्या महालाकडे परतला. बघता बघता मंडपातील लोक पांगले. काही क्षणातच मंडप खाली झाला.
“युवराज, हा कसला बालखेळ आहे?” राणीने जाब विचारला.
“माते, माझ्यावर विश्वास ठेवा. उद्या सकाळपर्यंत तुम्हाला सत्य परिस्थिती समजेल.” राणीही नाईलाजाने महालाकडे परतली.
युवराजाने ते खोडूक उचलले आणि आपल्या महालात घेऊन आला. राजकन्या खोडकाच्या आतून दिवसभर घडणारे ते नाट्यमय दृश्य पाहत होती. तिला हे आपल्याशी काय होतंय हे समजत नव्हते. अशा परिस्थितीत काय करावे हेही तिला उमजत नव्हते. त्यामुळे ती शांतपणे आलेल्या परिस्थितीला तोंड देत खोडकाच्या आत उभी होती. मध्यरात्र झाली. खोडकाच्या आत असलेल्या राजकन्येने पाहिले, तिच्याशी विवाह केलेला तो युवराज आता शांतपणे झोपला होता. दिवसभराचा शीण दूर करावा, बाहेर येऊन मोकळा श्वास घ्यावा म्हणून राजकन्येने हळूच खोडकाचे दार उघडले. हळुवार पावलांनी ती बाहेर आली. गच्चीत उभी राहून थंडगार वारा अंगावर घेत असतानाच तिला मागून अग्नीच्या ज्वाला जाणवू लागल्या. घाबरून राजकन्येने पाठीमागे पाहिले तर तिचे खोडूक अग्नीच्या ज्वालांनी वेढले होते. बाजूला राजकुमार तिच्याकडे पाहून मिश्किल हसत होता.
युवराजाच्या महालातून धूर येत असलेला पाहून राजाराणीही लगबगीने महालात आले. त्यांनी पाहिले, सकाळी ज्याच्याबरोबर युवराजाने लग्न केले होते ते खोडूक जळत होते. समोर अप्सरेलाही लाजवेल असे सौंदर्य लाभलेली युवती सलज्ज उभी होती. खोडकाच्या बाजूला असलेला आपला युवराज त्या युवतीकडे पाहून मिश्किल हसत होता. राजाराणीला हे दृश्य पाहूनच परिस्थितीचा अंदाज आला होता. तरीही त्यांनी सत्यस्थिती युवकाच्या तोंडून ऐकून घेतली. राजकन्येनेही ती कोण आणि इथवर कशी पोहोचली ही कहाणी ऐकवली. राजाराणीने आपल्या सुनेचा मोठ्या मनाने स्वीकार केला. दुसऱ्या दिवशी धुमधडाक्यात राजकन्या आणि राजपुत्राचा विवाह झाला.
देवावर विश्वास ठेवून राजकन्येच्या मातेने तिला नशिबाच्या स्वाधीन केले आणि नशिबाने राजकन्येला तिच्या अपेक्षेपेक्षाही मोठे सौभाग्य मिळवून दिले.(समाप्त)



