पणजी :समाज कल्याण खात्याच्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेत (डीएसएसएस) लवकरच महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार आहेत. या योजनेंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक लाभात वाढ करण्यासोबतच प्रथमच तृतीयपंथी व्यक्ती आणि दुचाकी पायलट यांचा लाभार्थ्यांमध्ये समावेश करण्याची तयारी सुरू झाली आहे. सुधारित प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, अर्थ खात्याच्या मंजुरीनंतर नवीन योजना अधिसूचित केली जाणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर हालचालींना वेग
यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा फेरआढावा घेऊन लाभाच्या रकमेत वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार समाज कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत तृतीयपंथी आणि दुचाकी पायलट यांचा योजनेत समावेश करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर सुधारित योजनेचा मसुदा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
नवीन योजना अधिसूचित झाल्यानंतर राज्यातील सुमारे ३०० तृतीयपंथीयांना प्रथमच या योजनेचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सूचनेनुसार हे बदल प्रस्तावित करण्यात आले असून, योजनेचा लाभ अधिक व्यापक करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती समाज कल्याण खात्याचे संचालक दीपक देसाई यांनी दिली.
सुधारित योजनेत ५० ते ६० वर्षे वयोगटातील तसेच ६० वर्षांवरील दुचाकी पायलट यांचाही समावेश करण्यात येणार आहे. अर्थ खात्याची मंजुरी मिळाल्यानंतर अंतिम अधिसूचना जारी केली जाईल. सध्या राज्यातील १.२९ लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत.
दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सुमारे २५ वर्षांपूर्वी दयानंद सामाजिक सुरक्षा योजना सुरू केली होती. कालानुरूप या योजनेत विविध बदल करण्यात आले असून, ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांग आणि महिलांनाही या योजनेचा लाभ मिळतो. वाढत्या महागाईचा विचार करून लाभाच्या रकमेत वाढ करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्पीय भाषणात दिले होते. चालू आर्थिक वर्षात वाढीव लाभ देण्याचे सरकारचे नियोजन असून, योजनेसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ४७९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


