गोव्यात दोन महिन्यांत तब्बल १,८३६ वेळा वीज गुल

ग्रामीण भागात सर्वाधिक फटका : दिवसाला सरासरी ३० वेळा बत्ती गुल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th August, 09:02 pm
गोव्यात दोन महिन्यांत तब्बल १,८३६ वेळा वीज गुल

राज्यात उन्हाळ्यात विजेच्या वाढत्या मागणीसोबतच वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. एप्रिल आणि मे २०२६ या दोन महिन्यांत राज्यभरात वीजपुरवठा खंडित होण्याच्या तब्बल १,८३६ घटना नोंदवण्यात आल्या. म्हणजेच या काळात दिवसाला सरासरी ३० वेळा वीजपुरवठा खंडित झाला असून, लाखो ग्राहकांना त्याचा फटका बसला.

मे महिन्यात सर्वाधिक वीजपुरवठा खंडित

उपलब्ध माहितीनुसार, एप्रिल महिन्यात ५७५, तर मे महिन्यात तब्बल १,२६१ वेळा वीजपुरवठा खंडित झाला. तिसवाडी, बार्देश, फोंडा आणि सत्तरी तालुक्यांतील शहरी तसेच ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक होते. त्याउलट सासष्टी तालुक्यात तुलनेने कमी घटना नोंदल्या गेल्या.

कालावधीच्या दृष्टीने पाहता, या दोन महिन्यांत मिळून तब्बल १,२७१.३३ तास वीजपुरवठा विस्कळीत राहिला. यामध्ये एप्रिल महिन्यात १६६ तास १३ मिनिटे, तर मे महिन्यात सुमारे १,१०५ तासांचा कालावधी समाविष्ट आहे.

४.२२ लाख ग्राहकांवर परिणामएप्रिल महिन्यात १.८६ लाख ग्राहकांना एक किंवा अधिक वेळा वीजपुरवठा खंडित होण्याचा फटका बसला. मे महिन्यात ही संख्या वाढून २.३६ लाखांवर पोहोचली. अशाप्रकारे दोन महिन्यांत एकूण ४.२२ लाख ग्राहक प्रभावित झाले. दोन्ही महिन्यांत ग्रामीण भागातील ग्राहकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागला.
वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न

वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना वाढल्या असल्या तरी एप्रिल महिन्यात बहुतांश भागांमध्ये दररोज सरासरी २१ ते २४ तास वीजपुरवठा सुरळीत राहिल्याची नोंद आहे. उन्हाळ्यातील वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर वीज विभागाकडून पुरवठा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

तांत्रिक बिघाड आणि नैसर्गिक कारणांचा परिणाम

फिडर ट्रिप होणे, अर्थ फॉल्ट, जंपर कट होणे तसेच झाडे पडणे यांसारख्या तांत्रिक आणि नैसर्गिक कारणांमुळे या दोन्ही महिन्यांत अनेक ठिकाणी वीजपुरवठा वारंवार खंडित झाला. वाढत्या विजेच्या मागणीमुळे वितरण यंत्रणेवर आलेला अतिरिक्त ताणही या घटनांसाठी कारणीभूत ठरल्याचे दिसून येते.

हेही वाचा
सर्व पहा