इराण-अमेरिका तणाव शिगेला!

इराणवर अमेरिकेचे हवाई हल्ले; अपाचे हेलिकॉप्टर पाडल्याचा आरोप

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
10 hours ago
इराण-अमेरिका तणाव शिगेला!

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या लष्कराचे एएच-६४ अपाचे (AH-64 Apache) हेलिकॉप्टर होर्मुझ सामुद्रधुनीत पाडल्याच्या घटनेनंतर अमेरिकेने इराणविरोधात लष्करी कारवाई सुरू केली आहे. अमेरिकेच्या केंद्रीय कमांडने (CENTCOM) दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकन सैन्याने इराणवर "स्वसंरक्षणात्मक हल्ले" (Self-Defense Strikes) केले आहेत.


सेंटकॉमने सोशल मीडियावरील निवेदनात म्हटले आहे की, "अमेरिकन सैन्याचे अपाचे हेलिकॉप्टर पाडण्यात आल्याच्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.  हा अन्यायकारक इराणी आक्रमणाला दिलेला समप्रमाणातील प्रतिसाद आहे."

मात्र, या हल्ल्यांमध्ये नेमकी कोणती ठिकाणे लक्ष्य करण्यात आली, किती नुकसान झाले किंवा कारवाईची व्याप्ती किती होती, याबाबत अमेरिकेने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

सोमवारी होर्मुझ सामुद्रधुनीत गस्त घालत असताना अमेरिकन अपाचे हेलिकॉप्टर कोसळले होते. हे हेलिकॉप्टर इराणने पाडल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.  त्यानंतर अमेरिकेकडून कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशाराही देण्यात आला होता. हेलिकॉप्टर ओमानच्या किनाऱ्याजवळ समुद्रात कोसळले होते; मात्र दोन्ही वैमानिकांची यशस्वी सुटका करण्यात आली.

दरम्यान, अमेरिकेच्या कारवाईमुळे पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी राजनैतिक प्रयत्न सुरू असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते.

इराणकडून अद्याप अमेरिकेच्या हल्ल्यांबाबत अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी यापूर्वीच इराणच्या सीमेजवळ परकीय लष्करी उपस्थितीमुळे धोका निर्माण होत असल्याचे सांगत, तणाव कमी करण्यासाठी विदेशी सैन्याने हा परिसर सोडावा, असे मत व्यक्त केले होते.

होर्मुझ सामुद्रधुनी संघर्षाच्या केंद्रस्थानी 

जागतिक तेलवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या केंद्रस्थानी आली असून, या घडामोडींवर जगभरातील देशांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा