कृषी खात्याची माहिती : खरीप हंगामाच्या मशागतीसाठी तयारी पूर्ण

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : यंदाच्या खरीप पावसाळी हंगामात पावसाळी शेतीला चालना देण्यासाठी कृषी खात्याने तयारी पूर्ण केली आहे. अर्थसंकल्प कृषी खात्याला मंजूर झालेला २९५ कोटी रुपयांचा निधी कार्यान्वित झाला असून बियाणे व अनुदान वाटप सुरू झाले आहे. राज्यभरात शेत नांगरणीची कामे सुरू आहेत. यंदा भात पिकाला पोषक वातावरण आहे. सरासरीपेक्षा कमी पडणारा पाऊसही शेतीसाठी अनुकूल ठरण्याची शक्यता आहे, असे कृषी खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यातील २३,८७८ हेक्टर क्षेत्रात भाताचे पीक घेतले जाते. त्यासाठी शेतजमिनीची मशागत सुरू झाली आहे. कृषी खात्याने सर्व नोंदणीकृत सहकारी संस्थांमध्ये भात बियाण्यांची विक्री सुरू केली असून शेतकऱ्यांना या बियाण्यांवर ५० टक्के अनुदान दिले जाते. विभागीय कृषी कार्यालयांमध्येही ५० टक्के अनुदानासह भाजीपाला बियाण्यांची विक्री सुरू आहे. याशिवाय आमदारांकडून त्यांच्या मतदारसंघांत फळझाडांची रोपे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले.
शेत नांगरणीसाठी कृषी खाते शेतकऱ्यांना ट्रॅक्टर भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देते. यासाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर भाड्याच्या केवळ ५० टक्के रक्कम भरावी लागते. यांत्रिकी लागवड अधिकारी, विभागीय कृषी अधिकारी आणि नोंदणीकृत मशागत संस्थांमार्फत ट्रॅक्टर सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पात कृषी खात्यासाठी २९५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीचा वापर मशागत, कुंपण, सिंचन, यंत्रसामग्री आदी योजनांच्या अनुदानासाठी केला जाणार आहे. या योजनांचा सर्वाधिक लाभ अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) समाजाला मिळतो. इतरांसाठी ५० टक्के अनुदान असताना एससी आणि एसटी लाभार्थ्यांना ९० टक्के अनुदान दिले जाते.
सेंद्रिय, सामुदायिक शेतीला प्रोत्साहन
राज्यातील १७ हजार हेक्टर खाजन शेती पुनरुज्जीवित करण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात मोठ्या प्रमाणावर सामुदायिक शेतीला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी सेंद्रिय उपकरणांवर ५० टक्के अनुदान दिले जाते. तरुणांना शेतीकडे आकर्षित करण्यासाठीही सरकार विविध प्रोत्साहनपर योजना राबवत आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले.