जिंकण्याची क्षमता, तरुणांना भाजपचे उमेदवारीसाठी प्राधान्य

कृती आराखड्यातील सूत्रे : विधानसभा निवडणूक तयारीला वेग


08th June, 11:31 pm
जिंकण्याची क्षमता, तरुणांना भाजपचे उमेदवारीसाठी प्राधान्य

विधानसभा निवडणूक तयारीचा कृती आराखडा रविवारी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांना सादर करताना प्रदेशाध्यक्ष दामू नाईक.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष उमेदवारी देताना ज्येष्ठांपेक्षा तरुण नेतृत्वाला अधिक प्राधान्य देणार आहे. सुमारे २० ते २५ टक्के नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यास पक्षाला फायदा होईल, असा विचार पक्षाच्या कृती आराखड्यात करण्यात आला आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.
विधानसभा निवडणूक जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी रविवारी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्याकडे ‘कृती आराखडा २०२७’ सादर केला. याशिवाय पक्षाच्या आगामी वाटचालीबाबतही दोघांमध्ये चर्चा झाली. सध्या पक्षात अनुभवी ज्येष्ठ आणि नव्या पिढीचे तरुण नेते आहेत. अनेक मंत्री, आमदारांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक आहे. काही ज्येष्ठांना बाजूला ठेवून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे धोरण पक्षाने आखले आहे. उमेदवारीसाठी उमेदवाराची कार्यपद्धती, पक्षावरील निष्ठा आणि निवडून येण्याची क्षमता हे प्रमुख निकष असतील. एखाद्या मंत्री किंवा आमदाराची कामगिरी समाधानकारक नसल्याचे अथवा त्याच्या विजयाची शक्यता कमी असल्याचे पक्षाला वाटल्यास त्याला उमेदवारी दिली जाणार नाही.
सर्व मतदारसंघांत पक्षाचे कार्य सुरू असून पुढील काळात बैठका आणि मेळावे आयोजित केले जातील. स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून राजकीय परिस्थिती, पूर्ण झालेली व प्रलंबित विकासकामे, तसेच कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी यांचा आढावा घेतला जाईल. विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय राज्यस्तरीय नेते आणि पक्षाचे संसदीय मंडळ घेणार आहे. उमेदवाराची कामगिरी, पक्षनिष्ठा आणि निवडून येण्याची क्षमता या निकषांच्या आधारे उमेदवारी निश्चित केली जाईल.
प्रत्येक मतदारसंघासाठी उमेदवार तयार ठेवणार : दामू
सध्या भाजपकडे असलेल्या मतदारसंघांतील राजकीय परिस्थितीचा अभ्यास केला जाणार आहे. तसेच विरोधकांच्या ताब्यातील मतदारसंघांचाही वेगळ्या पद्धतीने आढावा घेतला जाणार आहे. सध्या भाजपची मगोशी युती असून काही अपक्षांचाही सरकारला पाठिंबा आहे. तरीही सर्व मतदारसंघांत बैठका व मेळावे घेतले जाणार आहेत. प्रत्येक मतदारसंघासाठी पक्ष उमेदवार तयार ठेवणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा प्रचार-प्रसार करून संघटना मजबूत करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी निकष निश्चित केले जातील, त्यानुसार उमेदवारांची निवड केली जाईल, असे दामू नाईक यांनी स्पष्ट केले.
मंत्री, आमदारांच्या कामगिरीचे होणार मूल्यांकन
येणाऱ्या काळात पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील नेते राज्याचा दौरा करणार आहेत. ते विविध मतदारसंघांना भेट देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. मतदारसंघांतील विकासकामे, आमदारांनी केलेले कार्य आणि जनतेसाठी त्यांनी दिलेला वेळ यांचा आढावा घेतला जाणार आहे. अंतर्गत आणि गोपनीय पद्धतीने मंत्री व आमदारांच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जाणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत ३० मतदारसंघ जिंकण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. ते लक्षात घेऊन कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा सार्वजनिक केला जाणार नाही; मात्र पक्षामार्फत त्याची अंमलबजावणी सुरू होईल.
_ दामू नाईक, प्रदेशाध्यक्ष, भाजप

हेही वाचा