काँग्रेस, भाजप सोडून गोव्याला तिसऱ्या पर्यायाची गरज

विजय सरदेसाई : ‘किंगमेकर’ नव्हे ‘किंग’ होण्यासाठी माझे प्रयत्न !

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th June, 11:51 pm
काँग्रेस, भाजप सोडून गोव्याला तिसऱ्या पर्यायाची गरज

पणजी : गोव्यातील प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांच्या पलीकडे तिसऱ्या राजकीय पर्यायाची गरज असल्याचे मत गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले. सध्या काँग्रेससोबत युती असली तरी २०२७ नंतरही ती कायम राहील, असे गृहीत धरू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सरदेसाई म्हणाले की, गोव्यात विरोधी पक्षांची ‘इंडी’ आघाडी अस्तित्वात नाही आणि त्यासाठी प्रयत्नही होताना दिसत नाहीत. काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष २१ जागा जिंकून पक्ष सत्तेत येईल, असे सांगतात; मात्र त्यामध्ये इतर विरोधी पक्षांचा विचार केला जात नाही. गोव्याच्या जनतेला नवीन पर्याय हवा असून, तो देण्याचा आपला प्रयत्न असेल. मला केवळ ‘किंगमेकर’ व्हायचे नाही, तर नेतृत्वाची भूमिका निभावायची आहे, असे त्यांनी सांगितले.
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या कराराचा सन्मान राखत गोवा फॉरवर्डने काँग्रेससोबत लोकसभा आणि जिल्हा पंचायत निवडणुका लढवल्या. मात्र, २०२७ नंतरही ही आघाडी कायम राहील का, याबाबत निश्चित भूमिका घेणे सध्या शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
फातोर्डा मतदारसंघातील प्रश्न सातत्याने मांडल्यामुळे आपले नेतृत्व आता संपूर्ण गोव्यात पोहोचल्याचा दावा सरदेसाई यांनी केला. काँग्रेसचे अनेक आमदार भाजपमध्ये गेल्यानंतरही आपण पक्षांतर केले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
भाजपविरोधात ठोस रणनीतीची गरज
आमदार सरदेसाई यांनी भाजप सरकारविरोधात जनतेत नाराजी असल्याचा दावा करत विरोधी पक्षांकडे मात्र ठोस रणनीती नसल्याची टीका केली. भाजपला पराभूत करण्यासाठी आणि राज्याला नवा राजकीय पर्याय देण्यासाठी तिसऱ्या आघाडीची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.      

हेही वाचा