निष्काळजीपणामुळेच शॉक लागून मृत्यू होण्याच्या प्रकारांत वाढ!

अधीक्षक अभियंता शैलेश बुर्ये : योग्य उपकरणांसह काळजी घेण्याचे आवाहन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th June, 10:33 pm
निष्काळजीपणामुळेच शॉक लागून मृत्यू होण्याच्या प्रकारांत वाढ!

पणजी : घरात वॉटर हीटर वापरताना, एमसीबी (एमसीबी) तपासताना किंवा विजेची इतर कामे करताना विजेचा धक्का (शॉक) लागून मृत्यू येण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. चालू वर्षात फेब्रुवारी महिन्यापासून आतापर्यंत, म्हणजेच गेल्या अवघ्या चार महिन्यांत वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये १५ जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. कोणीही स्वतःहून जाऊन पुरेशी काळजी न घेता वीजवाहिन्यांचे किंवा विजेचे काम करत असेल, तर त्याला वीज खाते कसे जबाबदार धरणार? असा थेट सवाल उपस्थित करत, नागरिकांनी विजेची कामे करताना योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन वीज खात्याचे अधीक्षक अभियंते शैलेश बुर्ये यांनी केले आहे.
विजेचा धक्का लागून मृत्यू होण्याच्या वाढत्या घटनांवर स्पष्टीकरण देताना अधीक्षक अभियंते बुर्ये म्हणाले की, राज्यात गेल्या काही दिवसांत घडलेल्या या दुर्घटनांमध्ये वीज खाते किंवा खात्याच्या कर्मचाऱ्यांची कोणतीही चूक नाही. यामध्ये एकाही लाईनमनचा किंवा तांत्रिक कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला नाही. जर कोणी स्टीलची मोठी काठी घेऊन झाडावरून आंबे काढायला जात असेल आणि ती काठी थेट वीजवाहिनीला स्पर्श करत असेल, तर यात दोष कोणाचा? वीज पुरवठा करणाऱ्या तारांजवळ स्टीलची काठी वापरण्याची काय गरज होती? त्याऐवजी बांबू किंवा लाकडाची काठी वापरली असती, तर शॉक लागला नसता. तसेच, लाईनमन किंवा तांत्रिक कर्मचाऱ्यांशिवाय इतर बिगर-तांत्रिक व्यक्तींनी एमसीबीला हात लावणे चुकीचे आहे. तसे करताना दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?
अलीकडच्या काही गंभीर दुर्घटना
एप्रिल महिन्यात टिळामळ येथे सुकोरीन फारीया या महिलेचा आंबे काढताना मृत्यू झाला. आंबे काढताना त्यांनी वापरलेली स्टीलची काठी थेट विजेच्या तारेला घासल्याने त्यांना तीव्र शॉक लागला. एप्रिल महिन्यातच पर्रा येथे सचिन राजपूत या तरुणाचा स्वतः ‘एमसीबी’ तपासताना शॉक लागून मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वीच हडफडे येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या इलेक्ट्रिशियनचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. हॉटेल असो वा घर, वैयक्तिक जागेत निष्काळजीपणामुळे शॉक लागल्यास त्याला वीज खाते जबाबदार राहू शकत नाही. वीज खाते प्रत्येक खासगी जागेतील गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकत नाही, असे अभियंत्यांनी स्पष्ट केले.
विजेची कामे करताना पुढील गोष्टी पाळा
वीज खात्याच्या वतीने नागरिकांना आणि खासगी कंत्राटदारांना पुढील सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सुरक्षा उपकरणांचा वापर: विजेचे काम करताना टेस्टर, स्पॅनर तसेच इन्सुलेटेड ग्लोव्हज (हातमोजे) वापरणे बंधनकारक आहे.
अल्पज्ञानापोटी धोका पत्करू नका: विजेच्या कामाची पूर्ण माहिती नसल्यास मीटर, मुख्य वाहिनी किंवा इतर उपकरणांशी छेडछाड करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते.
ओल्या हातांनी स्पर्श टाळा: ओल्या हातांनी केबल, स्वीच किंवा वायरींना स्पर्श केल्यास वीजप्रवाह शरीरात उतरण्याची दाट शक्यता असते.
तज्ज्ञांची मदत घ्या: वीज पुरवठा खंडित झाल्यास किंवा दोष निर्माण झाल्यास स्वतः दुरुस्ती न करता, अधिकृत इलेक्ट्रिशियन किंवा वीज खात्याच्या लाईनहेल्परला त्वरित कळवावे.
हीटर वापरताना सावधानता: हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात घरात वॉटर हीटर वापरताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.      

हेही वाचा