गोमेकॉचा रस्ता चुकला; यू-टर्न घेतलेल्या वृद्ध दांपत्याचा अपघातात बळी

बांबोळी महामार्गावर कारची स्कूटरला धडक


08th June, 11:29 pm
गोमेकॉचा रस्ता चुकला; यू-टर्न घेतलेल्या वृद्ध दांपत्याचा अपघातात बळी

बांबोळी अपघातातील अपघातग्रस्त कार.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : बांबोळी येथील अॅथलेटिक स्टेडियमजवळ राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी पहाटे इनोव्हा कार आणि दुचाकी अॅक्टिवा यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीचालक साल्वादोर द मूंद-पर्वरी येथील रेमेजिओ फर्नांडिस (७९) आणि त्यांच्या मागे बसलेल्या पाऊलिना फर्नांडिस (६५) या दाम्पत्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आगशी पोलिसांनी अपघाती मृत्यू दाखल करून कारवाई सुरू केली आहे.
साल्वादोर द मूंद-पर्वरी येथील रेमेजिओ फर्नांडिस आणि पाऊलिना फर्नांडिस हे पती-पत्नी अॅक्टिवा दुचाकीवरून गोमेकॉत चालले होते. गोमेकॉत जाण्यासाठी महामार्गावरून जात असताना नियाझ हॉटेल जवळ सर्व्हिस रोडवर येणे आवश्यक होते; मात्र त्यांच्या ते लक्षात न आल्यामुळे महामार्गावरून ते पुढे गेले. अॅथलेटिक स्टेडियमजवळ गेल्यानंतर ‘आपण गोमेकॉच्या पुढे आलो आहोत’ हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी यू-टर्न घेतला आणि आलेल्या मार्गावरूनच गोमेकॉकडे यायला निघाले. याचवेळी इनोव्हा कार पणजीहून आगशीकडे वेगाने जात होती. अचानक समोरून दुचाकी आल्यामुळे कारचालक जगदीश राठोड (२३, बिजापूर कर्नाटक) याला कारवर नियंत्रण मिळवायलाही वेळ मिळाला नाही. कार आणि दुचाकीची समोरासमोर टक्कर झाली.
आगशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सोमवारी पहाटे ४.४६ वा. झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक उपनिरीक्षक उल्हास गावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या रेमेजिओ आणि पाऊलिना फर्नांडिस यांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना दोघांचाही मृत्यू झाला.
या प्रकरणी आगशी पोलिसांनी प्रथमदर्शनी माहितीच्या आधारे अपघाताची नोंद करून तपास सुरू केला आहे. महिला उपनिरीक्षक दीपिका परमार यांनी शवचिकित्सेनंतर दोघांचाही मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केला. या प्रकरणी पुढील तपास आगशी पोलीस करत आहेत.

हेही वाचा