गोव्यातील १४ पालिका क्षेत्रांत दररोज तयार हाेतो २०० टन कचरा

पणजी मनपा, मडगाव पालिका आघाडीवर : पेडणे, सांगे पालिकांच्या क्षेत्रात १ टनाहून कमी कचरा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th June, 11:44 pm
गोव्यातील १४ पालिका क्षेत्रांत दररोज तयार हाेतो २०० टन कचरा

पणजी : गोव्यातील १४ नगरपालिका क्षेत्रांमध्ये आर्थिक वर्ष २०२५-२६ दरम्यान दररोज सरासरी २०२ टन कचऱ्याची निर्मिती होत असल्याची माहिती नगरपालिका प्रशासन संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामध्ये सुमारे १२८.८३ टन ओला कचरा, तर ७३.९८ टन सुका कचरा असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
राज्यात सर्वाधिक कचऱ्याची निर्मिती पणजी महापालिका क्षेत्रात होत असून येथे दररोज ५४.८६ टन कचरा गोळा केला जातो. त्यापाठोपाठ मडगाव नगरपालिका क्षेत्रात दररोज ५० टन कचऱ्याची नोंद झाली आहे. या दोन्ही शहरी भागांमध्ये राज्यातील सर्वाधिक कचरा निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. कचरा निर्मितीच्या बाबतीत पेडणे आणि सांगे नगरपालिका क्षेत्रे सर्वात कमी प्रमाणात आहेत. पेडणे येथे दररोज केवळ ०.७५ टन, तर सांगे येथे ०.७८ टन कचरा निर्माण होत असल्याची नोंद आहे.
उत्तर गोव्यात म्हापसा येथे दररोज २२ टन, साखळी येथे ७ टन, डिचोली येथे ६.५ टन आणि वाळपई येथे ४.८ टन कचरा गोळा केला जातो. पणजी महापालिकेत ३४ टन ओला आणि २०.८६ टन सुका कचरा निर्माण होतो.
दक्षिण गोव्यात मुरगाव नगरपालिका क्षेत्रात दररोज २८ टन कचऱ्याची निर्मिती होत असून, ते राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. फोंडा येथे ९ टन, कुडचडे-काकोडा येथे ७.३ टन, काणकोण येथे ५ टन, कुंकळ्ळी येथे ३.५ टन आणि केपे येथे २.६ टन कचरा निर्माण होत आहे.
ओल्या कचऱ्याचे प्रमाण अधिक
आकडेवारीनुसार राज्यातील एकूण कचऱ्यामध्ये ओल्या कचऱ्याचे प्रमाण सुमारे ६३ टक्के असून, सुका कचरा ३७ टक्के आहे. वाढत्या कचरा निर्मितीमुळे प्रभावी कचरा व्यवस्थापन आणि प्रक्रिया प्रकल्पांची गरज अधिक अधोरेखित होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.


हेही वाचा