तातडीने दुरुस्तीची मागणी : मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता

पेडणे : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील मालपे येथील राष्ट्रीय महामार्गाची संरक्षक भिंत पुन्हा एकदा अत्यंत धोकादायक स्थितीत आली आहे. आगामी पावसाळ्यात ही भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची भीती स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, पेडणे विकास मंचाचे संस्थापक डॉ. संजय कोरगावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकतीच या परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. महामार्गावरील हा धोका लक्षात घेता, सरकारने आणि संबंधित विभागाने येथे तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी मंचाच्या वतीने करण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या बायपास मार्गाच्या बांधकामावेळी मालपे येथे ही संरक्षक भिंत उभारण्यात आली होती. मात्र, मागील दोन वर्षांपासून ती धोकादायक अवस्थेत आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात या भिंतीचा काही भाग कोसळून मोठी दरड महामार्गावर आली होती. परिणामी, सुरक्षेच्या कारणास्तव हा महामार्ग काही काळ सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवावा लागला होता. यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा अशीच परिस्थिती उद्भवून वाहनधारकांचा जीव धोक्यात येऊ नये, अशी चिंता यावेळी व्यक्त करण्यात आली.
या पाहणीदरम्यान संरक्षक भिंतीच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. भिंतीचे फाउंडेशन (पाया) अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा दावा डॉ. कोरगावकर यांनी केला आहे. तसेच हे बांधकाम सुरू असताना संबंधित सरकारी अभियंत्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून देखरेख केली होती का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
ही संरक्षक भिंत पुन्हा कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ज्या कंत्राटदाराने हे निकृष्ट दर्जाचे काम केले आहे, त्याची आणि त्या काळात कार्यरत असलेल्या संबंधित अभियंत्यांची सरकारने सखोल चौकशी करावी. तसेच संबंधित कंत्राटदाराकडून स्वखर्चाने नव्या आणि सुरक्षित पद्धतीने ही संरक्षण भिंत पुन्हा उभारून घ्यावी, अशी मागणी वजरीचे माजी सरपंच अनिल शेट्ये यांनी केली.
...तर जबाबदारी कोण घेणार?
डॉ. संजय कोरगावकर यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्गावरील या धोकादायक संरक्षक भिंतीकडे सरकार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा वाहतुकीचा खोळंबा होण्यापूर्वीच प्रशासनाने तातडीने येथे युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत.