गोव्यातील अभियांत्रिकी उत्पादनांच्या निर्यातीत ३६ टक्क्यांची वाढ : मुख्यमंत्री

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
49 mins ago
गोव्यातील अभियांत्रिकी उत्पादनांच्या निर्यातीत ३६ टक्क्यांची वाढ : मुख्यमंत्री

पणजी : जागतिक आव्हाने असताना देखील मागील एका वर्षात गोव्यातून झालेल्या अभियांत्रिकी उत्पादनांच्या निर्यातीत ३६ टक्क्यांची वाढ झाली आहे. लहान राज्य असले तरी औषध, रसायने, शिपिंग, अभियांत्रिकी उत्पादन निर्यातीत गोव्याचे योगदान मोठे असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr.Pramod Sawant) यांनी सांगितले.


सोमवारी पणजी येथे केंद्रीय वाणिज्य खात्यातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, खात्याचे सहसचिव विमल आनंद, पंकज चड्डा, अश्विन गोलपकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, गोवा (Goa) केवळ सन सॅन्ड आणि सी पुरते मर्यादित राहिलेले नाही. पर्यटनासोबत अन्य उद्योग क्षेत्रात देखील गोवा आघाडीवर येत आहे. आर्थिक वर्ष २०२४- २५ मध्ये गोव्यातून ४०८ दशलक्ष युएस डॉलर किमतीचे अभियांत्रिकी उत्पादने निर्यात झाली होती. २०२५- २६ मध्ये त्यात वाढ होऊन त्याचे मूल्य ५५० दशलक्ष डॉलर झाले आहे.

गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास, कुशल मनुष्यबळ आणि गोव्यातील सुधारत असलेले औद्योगिक क्षेत्र यामुळे हे शक्य झाले आहे. शिपिंग, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या निर्यातीमध्ये देखील गोवा पश्चिम विभागात आघाडी घेत आहे. 

मुख्यमंत्री म्हणाले, राज्य सरकारने उद्योग क्षेत्रासाठी विविध योजना आणल्या आहेत. समुद्रामार्गे निर्यातीला प्रोत्साहन मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. गोव्यात हरित आणि शाश्वत उद्योगांना प्राधान्य देण्यात येत आहे. भाजप सरकारच्या काळात सुरू झालेल्या ‘मेक इन इंडिया’, ‘ग्रो इन इंडिया’, ‘स्टार्ट अप’, मुद्रा कर्ज योजना अशा विविध उपक्रमांमुळे उद्योग क्षेत्राला चालना मिळाली आहे.

यामुळेच मागील बारा वर्षांत देशातील निर्यातीचे प्रमाण देखील वाढले आहे. मागील एका आर्थिक वर्षात देशातील अभियांत्रिकी उत्पादनांची निर्यात ४ टक्क्यांनी वाढली आहे. भारताच्या एकूण निर्यातीमध्ये एमएसएमइ क्षेत्राचा वाटा १६ टक्के आहे.

नवीन बाजारपेठा शोधाव्यात

सुरेश प्रभू म्हणाले की, देशातील निर्यातदारांनी पारंपारिक बाजारपेठांसह नवीन बाजारपेठा शोधणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. ऑक्टोबर महिन्यात गोव्यामध्ये व्हायब्रंट गोवाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील उद्योजकांनी यामध्ये सहभागी व्हावे. 

हेही वाचा