चांदेल-हसापूर संपर्क मार्ग पाण्याखाली गेल्याने नागरिकांची गैरसोय

संध्याकाळी पर्यंत नव्या पुलावरून हलकी वाहने सोडणार : आमदार आर्लेकर

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
6 hours ago
चांदेल-हसापूर संपर्क मार्ग पाण्याखाली गेल्याने नागरिकांची गैरसोय

चांदेल : चांदेल-हसापूर मुख्य रस्त्यावरील नवीन पुलाचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले असले तरी तो अद्याप वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. पुलाच्या कमानीवर स्लॅब काँक्रीटचे काम झाल्याने काही काळ विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ताही अलीकडील मुसळधार पावसामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांना आता मिळेल त्या वाटा-रस्त्यांचा वापर करत ढोपरभर पाण्यातून वाहने चालवत प्रवास करावा लागत आहे. नागरिकांनी प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था करून नवीन पूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी केली आहे. काल रात्री काही प्रमाणात पाऊस पडल्याने चांदेल येथील नवीन पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी रस्त्यावर पाणी तुंबले.

आज संध्याकाळी पर्यंत हलकी वाहने सोडणार : आमदार आर्लेकर

 पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी पर्यायी रस्ता व नव्या पुलाची पाहणी केली.  लोकांची गैरसोय दूर करण्यासाठी संध्याकाळपर्यंत नवीन पुलावरून हलकी वाहने, दुचाकी सोडण्यात येणार असल्याचे सांगितले. सध्या तरी या पुलावरून अवजड वाहने सोडण्यात येणार नसल्याचे आमदार आर्लेकर यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा