भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा मोठा खुलासा

पणजी : केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा प्रसार अन् प्रचाराच्या माध्यमातून संघटना मजबूत करण्यावर आमचा मुख्य भर असेल. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत काही निश्चित निकष लावूनच उमेदवार ठरवले जातील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.
रविवारी दामू नाईक यांनी दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेऊन त्यांना 'कृती आराखडा २०२७' सादर केला. २०२७ ची विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून संघटनेचे कार्य पुढे नेण्यासोबतच ती अधिक बळकट करण्यासाठीच्या विविध उपक्रमांचा या कृती आराखड्यात समावेश आहे. मात्र, पक्षाने हा आराखडा सध्या गोपनीय ठेवला असून लवकरच त्याची अंमलबजावणी सुरू होईल, असे या आराखड्याविषयी बोलताना त्यांनी स्पष्ट केले.
सध्या सर्व मतदारसंघांमध्ये पक्षाचे काम जोमाने सुरू आहे. आता पुन्हा एकदा प्रत्येक मतदारसंघात मेळावे आणि बैठकांचे आयोजन केले जाईल. यानंतर, त्या-त्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून राजकीय स्थितीचा आढावा घेतला जाईल. मतदारसंघात पूर्ण झालेली आणि प्रलंबित असलेली विकासकामे यांचा यात प्रामुख्याने समावेश असेल. कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि त्यांचा प्रसार मोठ्या प्रमाणावर केला जाईल. तसेच विकासकामे आणि मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा नियमित आढावा घेतला जाईल.
विधानसभेच्या उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय राज्य पातळीवरील नेते आणि पक्षाचे केंद्रीय संसदीय मंडळ घेईल. उमेदवारीसाठी काही कडक निकष तयार केले जातील; ज्यामध्ये संबंधित नेत्याची कामगिरी, पक्षाप्रती असलेली निष्ठा आणि प्रामुख्याने निवडून येण्याची क्षमता (इलेक्टॅबिलिटी) यांचा विचार करूनच उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही दामू नाईक यांनी शेवटी सांगितले.