शॅक व्यावसायिकांना देणार एका वर्षाची मुदतवाढ : खंवटे

समुद्रकिनाऱ्यावरील बेकायदेशीर गोष्टींवर ड्रोन ठेवणार पाळत

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
5 mins ago
शॅक व्यावसायिकांना देणार एका वर्षाची मुदतवाढ : खंवटे

पणजीः गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवरील कचरा,  दलाल (टावट्स) आणि इतर बेकायदेशीर गोष्टींवर पाळत ठेवण्यासाठी पुढील पर्यटन हंगामात ड्रोन यंत्रणा कार्यान्वयीत करणार. ही यंत्रणा अस्तित्वात असलेल्या गोवा बीच व्हिजील अॅपला जोडणार. या यंत्रणेमुळे नियमांचे योग्य पालन सुनिश्चित होणार, अशी घोषणा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केली. शॅक व्यावसायिकांना एका वर्षाची मुदतवाढ देणार असल्याचेही खंवटे यांनी सांगितले. 



गोव्यातील विविध शॅक मालक संघटनांनी पर्यटन भवन पणजी येथे पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि पर्यटन खात्याचे संचालक केदार नाईक यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. त्यानंतर माहिती देताना खंवटे बोलत होते. 

गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवरील कचरा, विक्रेते आणि दलाल (टावट्स) यांचा विषय येत असतो. त्यासाठी या वर्षी आम्ही ड्रोन यंत्रणा कार्यान्वयीत करण्याचा प्रस्ताव ठेवला असल्याचे खंवटे यांनी सांगितले. सध्या खात्याकडे बीच व्ह‌िजील अॅप अस्तित्वात आहे. या अॅपच्या माध्यमातून फोटो पाठवून बेकायदेशीर गोष्टी नोंद करण्यास मिळतात.

पण यावर्षी या अॅपला ड्रोन सर्वेलन्स यंत्रणेची जोड देऊन समुद्रकिनाऱ्यांवरील कचरा, टावट्स यांच्यावर नजर ठेवणे शक्य होणार. तसेच अतिक्रमण आणि इतर बेकायदेशीर गोष्टींवर कारवाई करून पर्यटकांना येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी ही यंत्रणा आम्ही सुनिश्च‌ित करणार, अशी माहिती खंवटे यांनी दिली. 

समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षा, स्वच्छता आणि इतर गोष्टी सुरळीत करण्यासाठी ड्रोन यंत्रणेची अंमलबजावणी उत्तर तसेच दक्षिण गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर करणार, ड्रोन सर्वेलन्स यंत्रणा बीच व्हिजील अॅपला जोडणार. बीच व्हिजील अॅप ड्रोनमधील सर्व डेटा एकत्र करणार आणि संबंधित  अधिकाऱ्याला कारवाई करण्याचा निर्देश जाणार. जर समुद्रकिनाऱ्यांवर कचरा असला तर स्वच्छता कंत्राटदाराला आणि टावट्स दिसल्यास पोलिसांना याची माहिती पोहोचणार, असे खंवटे यांनी सांगितले. 

शॅक व्यावसायिकांना एका वर्षाची मुदतवाढ : खंवटे 

अस्तित्वात असलेल्या शॅक धोरणाअंतर्गत समुद्रकिनाऱ्यावरील शॅक व्यावसायिकांना तीन वर्षांसाठी दिलेली लीज यावर्षी संपते. पण शॅक मालकांची मागणी लक्षात घेऊन नवे धोरण अंमलात न आणता अस्तित्वात असलेल्या धोरणाअंतर्गत एका वर्षाची मुदतवाढ पर्यटन खात्याने देण्याचा निर्णय घेतला असल्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले. 

हेही वाचा