कोकण रेल्वे पोलिसांनी केली अनैसर्गिक मृत्यूची नोंद, तपास सुरू.

मडगाव : धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने एका अज्ञात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी घडली. पेडणे रेल्वे स्थानकाजवळ सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
कोकण रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील असावी. थिवी रेल्वे स्टेशन मास्तरांनी (स्थानक प्रमुख) पोलिसांना रेल्वे रुळांच्या कडेला एक मृतदेह पडला असल्याची माहिती दिली होती. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. रेल्वेतून खाली पडल्यामुळे मृताच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. मृतदेह सापडलेल्या घटनास्थळापासून काही अंतरावर पोलिसांना एक मोबाईल फोन सापडला असून, त्याद्वारे मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कोकण रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी सध्या अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. प्राथमिक तपासानुसार पोलिसांनी या घटनेत घातपाताचा संशय फेटाळून लावला आहे. कोकण रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश वेळीप या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सध्या मृतदेह ओळखीसाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (जीएमसी) शवागारात ठेवण्यात आला आहे.