बेतकी खांडोळा येथील प्रकार : ‘एमआरएफ’ उभारण्याची मागणी

खांडोळा मार्केट काॅम्प्लेक्सजवळ कचरा गोळा करण्याचे वाहन व तिथेच अस्ताव्यस्त पसरलेला कचरा. (रामानंद तारी)
माशेल : बेतकी-खांडोळा पंचायत क्षेत्रात कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने स्थानिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. मजुरांनी संपूर्ण गावातून गोळा केलेला कचरा पंचायतीच्या मार्केट कॉम्प्लेक्समधील एका दुकान गाळ्यात तसेच रेशन दुकानाच्या मागील खोलीत साठवला जातो. मात्र, हा कचरा योग्य रीतीने साठवून न ठेवल्यामुळे अर्ध्याहून अधिक कचरा दुकानाबाहेर मोकळ्या जागेत अस्ताव्यस्त पसरलेला असतो. परिणामी, या भागात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून, पंचायतीच्या या हलगर्जीपणाविरोधात ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सध्या पावसाळा सुरू झाल्याने उघड्यावरील कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधीचे प्रमाण अधिक वाढले आहे. यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जागेच्या अभावामुळे पंचायतीने अद्याप एम.आर.एफ. कचरा प्रकल्प उभारलेला नाही. त्यामुळे गावातील कचरा अशा प्रकारे थेट बाजारपेठ परिसरात साठवून ठेवण्याची वेळ पंचायतीवर आली आहे. पंचायतीने आता युद्धपातळीवर कचरा प्रकल्पाचे काम हाती घ्यावे आणि पावसाळ्यातील संभाव्य आजारांपासून ग्रामस्थांचे रक्षण करावे, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.
मार्केट कॉम्प्लेक्सचे शौचालय १५ वर्षांपासून बंद
नमूद करण्यासाठी गोष्ट म्हणजे येथील मार्केट कॉम्प्लेक्सचे सार्वजनिक शौचालय गेली १५ वर्षे नादुरुस्त अवस्थेत बंदच आहे. एवढी वर्षे उलटूनही पंचायतीने हे शौचालय दुरुस्त करण्यासाठी कोणतीही पावले उचललेली नाहीत. त्यामुळे बाजारातील दुकानदार, व्यावसायिक आणि येथे येणाऱ्या ग्राहकांना शौचासाठी नाइलाजाने उघड्यावर, मोकळ्या जागेचा आडोसा घ्यावा लागत आहे. यामुळे बाजारपेठ परिसरात आणखीनच अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरत आहे.
दरम्यान, अशा दुहेरी संकटाचा सामना पंचायत क्षेत्रातील नागरिकांना रोज करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या गंभीर समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पंचायतीने आतातरी या प्रकरणात तत्काळ लक्ष घालून दोन्ही समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी आग्रही मागणी खांडोळा परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.