चालकाला लागली डुलकी; कार उलटल्याने चालक गंभीर जखमी

अन्य चार प्रवासी किरकोळ जखमी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16 mins ago
चालकाला लागली डुलकी; कार उलटल्याने चालक गंभीर जखमी

फोंडा : पेटके-धारबांदोडा येथे सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. चालकाला अचानक डुलकी लागल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली. या अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला असून, त्याला अधिक उपचारासाठी मडगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, कारमधील अन्य चार प्रवासी किरकोळ जखमी झाले असून ते सुखरूप आहेत. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा पंचनामा केला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जीए-०८-एबी-७४१८ या क्रमांकाची कार कर्नाटक राज्यातून मडगावच्या दिशेने परतत होती. पहाटे ३ वा. च्या सुमारास कार पेटके-धारबांदोडा येथे पोहोचली असता, राष्ट्रीय महामार्गावर चालकाचा डोळा लागला. त्यामुळे भरधाव कार रस्त्यावरून खाली उतरून थेट उलटली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. कारमध्ये असलेल्या ३ महिला आणि १ पुरुष प्रवासी या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, चालक गंभीर जखमी झाल्याने त्याला सर्वप्रथम पिळये येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील वैद्यकीय उपचारासाठी तातडीने मडगाव येथील इस्पितळात हलवण्यात आले आहे. फोंडा पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
   

हेही वाचा