पेडणे गट काँग्रेसची वीज कार्यालयावर धडक

पेडणे : पेडणे मतदारसंघात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, ग्राहकांच्या तक्रारींना प्रतिसाद न देणारे कर्मचारी आणि स्मार्ट मीटर बसविण्याच्या सक्तीविरोधात पेडणे काँग्रेस गट समितीने स्थानिक वीज विभाग कार्यालयावर धडक देत तीव्र निषेध नोंदविला.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. जितेंद्र गावकर यांनी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. पेडणे तालुक्यातील अनेक भागांमध्ये दिवसभरात वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर ग्राहकांनी संबंधित लाईनमन किंवा कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांच्याकडून फोनला कोणताही प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे जनतेमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.
स्मार्ट मीटरबाबत बोलताना ॲड. गावकर यांनी, स्मार्ट मीटर बसविणे बंधनकारक असल्याचे सरकारचे कोणतेही अधिकृत परिपत्रक (जीआर) आहे का?" असा थेट सवाल अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला. तसेच स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची भीती व्यक्त करत, अनेक नागरिक या योजनेला विरोध करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचे गट अध्यक्ष कृष्णा नाईक यांनीही स्मार्ट मीटर योजनेवर कडाडून टीका केली. हणखणे, इब्रामपूर आणि परिसरातील काही वीज कर्मचारी मनमानी पद्धतीने काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांच्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते; त्यामुळे अशा कामचुकार कर्मचाऱ्यांची त्वरित बदली करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
या आंदोलनादरम्यान उपस्थित काँग्रेस कार्यकर्ते, समर्थक आणि स्थानिक नागरिकांनी आपल्या विविध समस्या व तक्रारी वीज विभागाचे साहाय्यक अभियंता वाटू सावंत यांच्यासमोर मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, तक्रारींना मिळणारा अपुरा प्रतिसाद आणि स्मार्ट मीटर संदर्भातील शंकांचा समावेश होता.
यावर साहाय्यक अभियंता वाटू सावंत यांनी नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या असून संबंधित समस्या सोडविण्यासाठी आवश्यक ती तातडीची कार्यवाही करण्यात येईल, तसेच पेडणेतील वीजपुरवठा अधिक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली. या आंदोलनाप्रसंगी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.