आईची मृत्यूशी झुंज. कर्नाटकातील घटना.

डिजिटल युगातील ऑनलाईन गेमिंगचे व्यसन तरुण पिढीला किती भयानक विळख्यात ओढत आहे, याचा एक अत्यंत सुन्न करणारा आणि काळीज हेलावून टाकणारा प्रकार कर्नाटकातून समोर आला आहे. मोबाईल गेमसाठी पैसे देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून, एका मुलाने आपल्याच कुटुंबावर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केला. या थरारक घटनेत मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांची आणि सख्ख्या बहिणीची निर्घृण हत्या केली, तर आईला गंभीर जखमी केले.
ही धक्कादायक घटना कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यात घडली आहे. येथे साई नाडू (वय १८) याने वडील यंकन्ना नाडू (वय ४८), आई सौजन्या आणि बहीण प्रगती (वय २०) यांच्यावर चाकूने हल्ला केला. यंकन्ना हे एका खाजगी शाळेत सुपरवायझर म्हणून कार्यरत होते. शनिवारी रात्री ९ वाजता संपूर्ण कुटुंबाने एकत्र जेवण केले होते. मात्र, रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक एका खोलीतून किंचाळण्याचे आवाज आल्याने शेजाऱ्यांनी तिथे धाव घेतली. खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याने तो तोडण्यात आला. आत जाताच कुटुंबातील चारही सदस्य रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दृश्य समोर आले.
पोलीस तपासातून समोर आलेली प्राथमिक माहिती अत्यंत धक्कादायक आहे. आरोपी मुलगा मोबाईल गेमिंगच्या प्रचंड आहारी गेला होता. गेम खेळताना त्याला कोणी टोकलेले अजिबात आवडत नव्हते. शनिवारी रात्री गेममधील काही गोष्टी खरेदी करण्यासाठी तो वडिलांकडे पैशांची मागणी करत होता. मात्र, वडिलांनी पैसे देण्यास आणि गेम खेळण्यास स्पष्ट नकार दिला. याच वादातून संतप्त झालेल्या मुलाने घरातील धारदार चाकूने संपूर्ण कुटुंबावरच हल्ला चढवला.
आरोपीने आधी वडील आणि बहीण यांच्यावर चाकूने वार केले, ज्यामध्ये त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने मध्यस्थी करणाऱ्या आईवरही वार केले. आई कोसळल्यानंतर, त्याने स्वतःच्या पोटावर वार केला. सध्या गंभीर जखमी आई आणि आरोपी मुलगा या दोघांवरही बेळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून आईची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.