नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन

फिलिपिन्स : सोमवारी सकाळी फिलिपिन्सच्या दक्षिणेकडील मिंडानाओ बेटाजवळ ७.८ रिश्टर तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. (A Powerful earthquake strikes Philippines). त्यानंतर त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. या भूकंपामुळे फिलिपिन्ससह इंडोनेशिया आणि आशियातील अनेक किनारी भागांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेस (GFZ) नुसार, हा भूकंप जमिनीपासून अवघ्या १० किलोमीटर खोलीवर झाला, त्यामुळे तीव्र हादरे जाणवले. सुरुवातीला भूकंपाची तीव्रता वेगवेगळी नोंदवण्यात आली असली तरी नंतर ती ७.८ रिश्टर निश्चित करण्यात आली.
फिलिपिन्सच्या ज्वालामुखी आणि भूकंपशास्त्र संस्थेने (PHIVOLCS) किनारी भागातील नागरिकांना तातडीने उंच भागात किंवा सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे. काही भागांत समुद्राच्या पाण्याची पातळी अचानक मागे गेल्याचेही वृत्त आहे. ज्यामुळे त्सुनामीची भीती वाढली आहे.
दक्षिण फिलिपिन्समधील अनेक किनारी गावांमध्ये नागरिकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले असून, काही ठिकाणी पूलांना तडे गेल्याचे आणि धार्मिक स्थळांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. जनरल सॅंटोस शहराजवळील भागांमध्ये घरातील फर्निचर, टीव्ही आणि इतर वस्तूंचे नुकसान झाल्याच वृत्त आहे.
सारंगानी प्रांतात वीज आणि दूरसंचार सेवा खंडित झाल्या असून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. स्थानिक प्रशासनाकडून नुकसान आणि जखमींचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी तातडीच्या मदत आणि बचाव कार्याचे आदेश दिले असून प्रभावित भागांमधील शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भूकंपानंतर अनेक आफ्टरशॉक्स जाणवत असून, पुढील काही तास आणि दिवस सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.