करंझाळेतील प्रकार : एका संशयिताला अटक, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पणजी : करंझाळे येथील समुद्र किनाऱ्यावरून ताळगाव येथील एका तरुणाचे आणि त्याच्या मित्राचे दिवसाढवळ्या अपहरण करून त्यांना निर्जन स्थळी डांबून ठेवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. संशयितांनी या दोन्ही तरुणांना चाकू आणि बाटल्यांचा धाक दाखवत बेदम मारहाण केली आणि त्यांच्याकडून ४० हजार रुपयांची खंडणी उकळली. याप्रकरणी पणजी पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, शोएब बेग या मुख्य संशयिताला अटक केली आहे. या घटनेमुळे करंझाळे आणि पणजी परिसरात खळबळ उडाली आहे.
पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी ताळगाव येथील आयाज फराश यांनी अधिकृत तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार आयाज आणि त्यांचा मित्र उस्मान हे दोघे ३ जून रोजी सकाळी करंझाळे येथील समुद्र किनाऱ्यावर बसले होते. त्यावेळी पाच संशयितांनी तिथे येत त्यांना चाकू व काचेच्या बाटल्या दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आणि जबरदस्तीने कारमध्ये बसवून आगशीच्या दिशेने पळवून नेले.
संशयितांनी दोन्ही तरुणांना बांबोळी आणि शिरदोन येथील निर्जन स्थळी डांबून ठेवले होते. तेथे त्यांना लाथाबुक्क्यांनी, बेल्टने, लाकडी दांडके आणि प्लास्टिकच्या पाईपने अत्यंत निर्घृणपणे बेदम मारहाण करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता संशयितांनी त्यांचे मोबाईल फोन आणि सोन्याची कर्णफुले (कानातले दागिने) हिसकावून घेतली. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून जबरदस्तीने ४० हजार रुपये उकळल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पणजी पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी पाचही संशयितांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ताळगाव येथून शोएब बेग याला अटक केली असून, फरार असलेल्या इतर चार संशयितांच्या अटकेसाठी पोलिसांनी शोध मोहीत सुरू केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पणजी पोलीस करत आहेत.
संशयित गँगशी संबंधित असल्याचा संशय
या गुन्ह्यात सहभागी असलेल्या पाचही संशयितांची नावे पोलिसांनी जाहीर केली आहेत. यामध्ये शोएब बेग (ताळगाव), आकाश मुद्रस (बांबोळी), जावेद बल्लारी (करंझाळे), झाकीउल्ला खाझी (करंझाळे), कल्पेश (रायबंदर) यांचा समावेश आहे. प्राथमिक तपास आणि मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, हे संशयित गोव्यातील एका प्रसिद्ध आणि सक्रिय गुन्हेगारी टोळीशी (गँग) संबंधित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.