‌‘आनंदी’ देश व्हायचेय तर मोबाईल द्या फेकून!

फिनलंड सतत आनंदी देश ठरत आहे. चांगली आर्थिक स्थिती, संसाधनांचे समान वाटप, मजबूत कल्याणकारी व्यवस्था आणि उत्तम जीवनमान हे आनंदी देशांचे निकष आहेत. भारताला आनंदी देश व्हायचेय तर तरुणांच्या हातातील मोबाईल काढून घ्यायला हवा.

Story: विशेष |
16th May, 11:12 pm
‌‘आनंदी’ देश व्हायचेय तर मोबाईल द्या फेकून!

जा​गतिक आनंद निर्देशांक २०२६ नुसार 'फिनलंड' सलग नवव्यांदा जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. चांगली आर्थिक स्थिती, संसाधनांचे समान वाटप, मजबूत कल्याणकारी व्यवस्था आणि उत्तम जीवनमान हे आनंदी देशांचे प्रमुख निकष आहेत. या यादीत भारताचे स्थान ११६ वे असून महासत्ता बनू इच्छिणारा भारत या निर्देशांकात इतका मागे का, हा एक मोठा प्रश्न आहे. भारतात आनंदाची व्याख्या जेवढी भौतिक साधनांशी निगडित आहे, तेवढीच ती आत्मिक आणि नैतिकसुद्धा आहे. परंतु, वाढती आर्थिक विषमता, आरोग्य व शिक्षणाच्या दर्जेदार सुविधांचा अभाव, करिअरचा ताण आणि शहरांमधील प्रदूषण यांमुळे भारताचा आनंद निर्देशांक कमी आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेला आणि लष्करी वर्चस्वाखाली जगणारा शेजारील पाकिस्तान या यादीत १०४ व्या स्थानावर म्हणजे भारतापेक्षा १२ अंकांनी पुढे आहे. भारतात मजबूत मध्यमवर्ग आणि सुविधांची रेलचेल असतानाही आपण मागे असणे हे आपल्यासाठी आत्मचिंतनाचा विषय आहे.

पाकिस्तानच्या तुलनेत भारताची आर्थिक स्थिती उत्तम असली, तरी आपल्याकडे संसाधनांचे समान वाटप नाही. शहरात सधन उच्च मध्यमवर्ग तयार होत असताना, ग्रामीण भागात नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी वर्ग नाडला गेला आहे. पूर्वी असलेला शहरी व ग्रामीण भागातील कौटुंबिक कनेक्ट आता पूर्णपणे तुटला आहे. याशिवाय, आपल्याकडे शिक्षण, आरोग्य आणि दळणवळणाची मजबूत कल्याणकारी व्यवस्था नाही. 'राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय' (NSSO) च्या अहवालानुसार, गेल्या एका देशात कुटुंबांचा मासिक खर्च दुपटीने वाढला आहे, तर महाराष्ट्रात आरोग्यावरील सर्वसामान्य नागरिकांचा खर्च ४६ टक्क्यांनी वाढला आहे. देशात एकूण केंद्रीय विद्यापीठांपेक्षा तुरुंगांची संख्या तिप्पट आहे, ही भीषण वस्तुस्थिती शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधांमधील वानवा स्पष्टपणे दर्शवते.

या जागतिक अहवालातील सर्वात डोळ्यात अंजन घालणारा निष्कर्ष म्हणजे, सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे तरुणांच्या आनंद आणि मानसिक स्थितीवर झालेला विपरीत परिणाम होय. भारतातील आजची तरुण पिढी इन्स्टाग्राम, फेसबुक आणि एक्स (ट्विटर) सारख्या आभासी जगात पूर्णपणे गुरफटली आहे. सतत दिवसभर 'रील्स' पाहिल्यामुळे माणसाच्या बौद्धिक आणि मानसिक क्षमतेवर वाईट परिणाम होतो, हे आता संशोधनानेही सिद्ध केले आहे. तरुण पिढीच्या या मानसिक फरफटीमुळे आणि सोशल मीडियाच्या आहारी गेल्यामुळेच आपला देश आनंदाच्या यादीत मागे पडत आहे. स्वीडनसारख्या प्रगत देशाने विद्यार्थ्यांना या आभासी जगातून बाहेर काढण्यासाठी आधीच विविध उपक्रम सुरू केले असून, भारतालाही आता अशा मोहिमांची तातडीने गरज आहे.

देशाच्या खऱ्या प्रगतीसाठी केवळ आर्थिक विकास पुरेसा नसून नागरिकांचे समाधान आणि मानसिक स्वास्थ्यही तितकेच महत्त्वाचे असते. तरुण पिढी आनंदी आणि आशावादी असेल, तर त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण समाजावर होतो. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ स्पर्धा करण्यापेक्षा एकमेकांना सहकार्य करणे, निसर्गाचे रक्षण करणे आणि मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढवणे गरजेचे आहे. प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि शिस्त या गुणांचा अंगीकार केल्यास समाजात विश्वास आणि सुरक्षितता निर्माण होईल, जी खऱ्या आनंदासाठी अत्यंत आवश्यक आहे. भारतात शिक्षण आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये सकारात्मक बदल झाले आणि तरुणांच्या हातातील मोबाईलचे व्यसन सुटले, तरच आपण खऱ्या अर्थाने एक 'आनंदी देश' म्हणून जगात पुढे येऊ शकू.


 डॉ. प्रवीण बनसोड