स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी: यूपीएससी, जीपीएससी आणि एनसीईआरटी (NCERT) पुस्तकांचे महत्त्व

स्पर्धा परीक्षांची तयारी करताना 'एनसीईआरटी' पुस्तकांचा पाया कसा मजबूत करावा? यूपीएससी, जीपीएससी, बँकिंग व रेल्वे परीक्षांच्या अचूक नियोजनासाठी आणि यशासाठी वाचा हा खास अभ्यासपूर्ण आणि मार्गदर्शक लेख!

Story: यशस्वी भव: |
16th May, 10:45 pm
स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी:  यूपीएससी, जीपीएससी आणि एनसीईआरटी (NCERT) पुस्तकांचे महत्त्व

सि​व्हिल सर्व्हिसेस अर्थात नागरी सेवा परीक्षांची (UPSC) तयारी करताना 'फाउंडेशन' (पायाभूत) अभ्यास नेमका कसा करावा आणि काय वाचावे, असा गोंधळ अनेकदा उडतो. कोणत्याही वयोगटातील किंवा इयत्तेतील विद्यार्थी घरच्या घरी ४ महिन्यांचा 'फाउंडेशन कोर्स' स्वतःसाठी सुरू करू शकतात. या ४ महिन्यांमध्ये आपण शाळेत आतापर्यंत काय शिकलो, याचेच पुनःस्मरण करून ते सखोल समजून घ्यायचे असते.

अभ्यासाचे नियोजन: १६ आठवड्यांचा आराखडा

या ४ महिन्यांचे नियोजन आठवड्यांमध्ये विभागून करावे, जेणेकरून आपल्याला एकूण १६ आठवडे मिळतात. आता प्रत्येक आठवड्यानुसार पुस्तक वाचनाचे नियोजन करायचे आहे. यामध्ये प्रामुख्याने इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या शालेय पुस्तकांचा समावेश असावा.

  पहिले ४ आठवडे (इयत्ता ५ वी व ६ वी): पहिल्या ४ आठवड्यांमध्ये इयत्ता ५ वी व ६ वी ची 'एनसीईआरटी' (NCERT) प्रमाणित पुस्तके वाचायला घ्यावीत. यात इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान, अंकगणित, इंग्रजी आणि भाषा अशा विषयांचा समावेश करावा. दररोज एक विषय घेऊन त्याचे वाचन, मनन आणि आकलन करावे. सुरुवातीला ही पद्धत जरा वेगळी वाटेल; पण आजवर यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या किंवा टॉप आलेल्या विद्यार्थ्यांनी याच मार्गाने सुरुवात केलेली आहे. जसे आठवडे पुढे सरकतील, तशी अभ्यासाची काठिण्यपातळी आणि इयत्ता वाढवत न्यावी.

  पुढील १२ आठवडे (इयत्ता ८ वी ते १० वी): इयत्ता ५ वी आणि ६ वी चा अभ्यासक्रम सोपा असल्याने तो पटकन संपवून वेळ वाचवावा. या वाचलेल्या वेळेचा उपयोग पुढील १२ आठवड्यांत ८ वी, ९ वी आणि १० वी च्या पुस्तकांच्या अभ्यासासाठी करावा. कारण या इयत्तांची पुस्तके ५ वी-६ वी च्या तुलनेने अधिक विस्तृत (Comprehensive) असतात आणि ती नीट समजून घेण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. यात प्रकाशसंश्लेषण (Photosynthesis), आरशातील प्रतिमा (Mirror Image), व्याकरण (Grammar), भारतीय स्वातंत्र्यलढा (Indian Freedom Fight), भूगोल (Geography), हवामान (Weather) आणि संसदीय कामकाज (Parliamentary Affairs) यांसारख्या महत्त्वाच्या संकल्पनांचा सखोल अभ्यास करावा.

 जीपीएससी (GPSC) आणि इतर परीक्षांसाठी उपयुक्तता

गोवा पब्लिक सर्विस कमिशनतर्फे (GPSC) ज्या नागरी सेवा परीक्षा घेतल्या जातात, त्यांच्यासाठीही यूपीएससीचा ७५% अभ्यासक्रम अत्यंत उपयोगी पडतो. सध्या 'गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन'तर्फेही अनेक शासकीय पदे भरली जात आहेत. त्या परीक्षांमध्ये प्रामुख्याने बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning), अंकगणित (Numerical), इंग्रजी आणि कोकणी भाषा या विषयांचा समावेश असतो.

परंतु, मुख्य जीपीएससी परीक्षांचा विचार केल्यास विद्यार्थ्यांना इंडियन पॉलिटी (भारतीय राज्यव्यवस्था), इतिहास, भूगोल, पर्यावरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामान्य ज्ञान (General Knowledge) आणि चालू घडामोडी (Current Affairs) या विषयांचाही सखोल अभ्यास करावा लागतो. या सर्वच परीक्षांसाठी एनसीईआरटी (NCERT) ची पुस्तके वाचणे अनिवार्य आहे.

 'जेएएसओ' (JASO) आणि स्क्रीनिंग परीक्षांचे स्वरूप

पुढील महिन्यात जीपीएससी 'जेएएसओ' (JASO) पदासाठी परीक्षा घेत आहे. या परीक्षेत प्री-स्क्रीनिंग, स्क्रीनिंग, लेखी परीक्षा आणि मुलाखत (तोंडी परीक्षा) असे टप्पे आहेत. यातील प्री-स्क्रीनिंग परीक्षेसाठी प्रामुख्याने रिझनिंग, न्यूमरिकल आणि इंग्रजी हे विषय विचारले जातात.

या परीक्षेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 'नेगेटिव्ह मार्किंग सिस्टीम' (नकारात्मक गुण पद्धती) नसते. त्यामुळे गोमंतकीय विद्यार्थ्यांवर कोणताही मानसिक दबाव नसतो, कारण उत्तर चुकले तरी गुण वजा होत नाहीत.

यशाचा मंत्र आणि काही महत्त्वाच्या टिप्स

  वेळेचे व्यवस्थापन: अनेकदा परीक्षेत वेळेचे नियोजन न जमल्यामुळे विद्यार्थ्यांना शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचताच येत नाही. त्यामुळे हातची चांगली संधी हुकते. यासाठी वेळेचा पुरेसा सराव असणे आवश्यक आहे.

  योग्य मार्गदर्शन: स्वतः अभ्यास करताना अडचणी येत असल्यास, योग्य तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली न्यूमरिकल आणि रिझनिंगचे धडे नीट समजून घ्यावेत.

  सातत्य: अभ्यासाचे अचूक नियोजन, पुरेसा सराव आणि योग्य रणनीती आखल्यास परीक्षेत यश नक्कीच मिळते.

पुढील काळात यूपीएससी, जीपीएससी, बँकिंग, रेल्वे यांसारख्या अनेक महत्त्वाच्या परीक्षा येऊ घातल्या आहेत. जीपीएससीच्या स्क्रीनिंग परीक्षांसाठीही एनसीईआरटीची पुस्तके पायाभूत ठरणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आतापासूनच या परीक्षांवर आपले लक्ष केंद्रित करणे अत्यंत आवश्यक आहे.


अॅड. शैलेश कुलकर्णी, कुर्टी - फोंडा, ९८७५४४५३९९

(लेखक नामांकित वकील आणि करिअर समुपदेशक आहेत.)