
अाजची रेसिपी थोडी खास आणि वेगळी आहे; कारण आज आम्ही आंब्यापासून बनणारे दोन पदार्थ बघणार आहोत. कारण दोन्ही पदार्थांची कृती साधारण एकसारखी आहे.
आंबा लस्सी
साहित्य:
१ कप पिकलेल्या आंब्याचा गर
१ कप दही
साखर गोडीनुसार
थोडी वेलची पूड (सुवासासाठी)
सजावटीसाठी ड्रायफ्रूट्स किंवा केशर
कृती:
मिक्सरमध्ये आंब्याचा गर, दही आणि साखर घाला. जर दही आणि आंबा गोड असेल, तर साखर नाही घातली तरीही चालेल. सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात छान गुळगुळीत होईपर्यंत फिरवा. वरून वेलची पूड घालून पुन्हा एकदा मिक्स करा. ग्लासमध्ये ओता आणि वरून केशर किंवा ड्रायफ्रूट्स घालून सर्व्ह करा. तुम्हाला आवडत असल्यास वरून व्हॅनिला आईस्क्रीम घाला.
आम्रखंड
साहित्य:
२ कप चक्का (घट्ट गाळलेले दही)
१ कप पिकलेल्या आंब्याचा गर
१ कप पिठीसाखर
वेलची पूड
थोडे केशर
बदाम-पिस्त्याचे काप सजावटीसाठी
कृती:
चक्का एका भांड्यात घेऊन छान फेटून गुळगुळीत करा. त्यात आंब्याचा गर आणि पिठीसाखर घाला. आंब्याचा गर मिक्सरमध्ये वाटून मगच घाला. वेलची पूड व केशर घालून मिश्रण एकजीव करा. हे मिश्रण ३० मिनिटे फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. सर्व्ह करताना वरून बदाम-पिस्ते घाला.

संचिता केळकर