प्रवास 'रुमडफूल' पासून ते 'शांततेचे घण' पर्यंतचा..!

Story: पुस्तक |
16th May, 11:03 pm
प्रवास 'रुमडफूल' पासून ते 'शांततेचे घण' पर्यंतचा..!

स​​​​हस्त्र पैलू म्हणावी अशी व्यक्तीमत्वं आपल्या आजुबाजूला क्वचितच आढळतात.मात्र आपल्या गोव्याचं भाग्य म्हणावं लागेल की श्री.विष्णू सुर्या वाघ यांच्या रुपाने आपल्याला असं हे सहस्त्र पैलू व्यक्तिमत्त्व जवळून अनुभवता आलं.गोव्याच्या इतिहासात त्यांचं राजकारण, समाजकारण, पत्रकारिता, साहित्य, वक्तृत्व, विज्ञान अशा अनेकविध क्षेत्रातील मोलाचं योगदान अजरामर आहे आणि पुढेही राहील. अशा विष्णू सरांशी माझी प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून त्यांची ओळख,त्यांच्याशी संवाद होत गेला. त्यांच्या पुस्तकांची खासियत म्हणजे प्रत्येक पुस्तकाच्या मुखपृष्ठावर असलेलं त्यांचं स्वतःचं विशिष्ट मुद्रा असलेलं मोहक छायाचित्र,कधी भेदक डोळ्यांनी काळजाचा ठाव घेणारं तर कधी पेन पकडलेल्या हातावर अलगद हनुवटी टेकवून विचारमंथन करणाऱ्या मुद्रेचं त्यामुळेच की काय त्यांची पुस्तकं न राहवून चाळण्याचा मोह होतो. 

साहित्य म्हटलं की आठवतात त्या त्यांच्या कविता, नाटकं..झिंजीर झिंजीर सांज, फील गुड फेणी, ती बाई मीच आहे, बच्चुभायची वाडी, सूदिरसुक्त,ज्ञशिवगोमंतक, तुका अभंग अभंग, रक्तपर्जन्य, तीन पैशांचो तियात्र, पर्जन्यधून इत्यादी. या सगळ्यांमधून कवी विष्णू, नाटककार विष्णू म्हणून ते समोर आले पण आपल्या या आवडत्या लेखकाचं एखादं गद्य साहित्य (कथा, कादंबरी) वाचायला मिळालं असतं तर किती छान झालं असतं असा विचार मनात डोकावत असताना हातात 'शांततेचे घण' आलं आणि मी हरखून गेले. माझ्या आवडीचा प्रांत आवडत्या लेखकाच्या शब्दांत वाचायला अधीर झाले.त्यानंतर अलिकडे त्यांनी लिहिलेलं 'सळसळ पिंपळपानांची' हे चरित्र वाचण्याची ही संधी मिळाली आणि मी भरून पावले.

शांततेचे घण हा कोंकणीतून मराठीत अनुवादित केलेला कथासंग्रह आहे.याचं मुळ नाव 'रुमडफूल' असून मुळ लेखक 'दामोदर मावजो' आहेत.यात एकुण पाच दिर्घकथा आहेत.'मराठी आणि कोंकणी अलगद मिसळून लिहावं ते विष्णूनेच..!' अशी टिप्पणी त्यांचे जीवलग मित्र, स्नेही आजही करतात आणि ही साहित्यकृती वाचत असताना त्याचा पुरेपूर अनुभव येतो. अनुवाद हा शब्द ऐकल्यानंतर शब्दाला शब्द दिला म्हणजे झाला अनुवाद अशी सामान्यांची त्या विषयीची व्याख्या असते मात्र 'वरवर पाहणाऱ्याला कोंकणी व मराठी या दोन्ही भाषा-भगिनींत फारसा फरक जाणवत नसला तरी प्रत्यक्ष अनुवादाच्या पातळीवर आपण उतरतो तेव्हा कोंकणीचं मराठीत शब्दशः भाषांतर करणं किती कठीण आहे त्याची जाणीव होते.' हे वक्तव्य त्यांनी केलेल्या प्रस्तावनेत वाचल्यानंतर   अनुवादाचा आवाका लक्षात येतो.

 'कोंकणीची आपली स्वतःची अशी गोडी आहे. अनुवाद करताना ती कमी होणार नाही याची दक्षता घेण्याचा मी होता होईल तितका प्रयत्न केलाय. कथांच्या कलात्मक सौंदर्याला बाधा येऊ नये याचीही दक्षता घेतली आहे. हे काम कितपत जमलंय ते वाचकांनी ठरवावं.' अशी प्रांजळ कबुली ही त्यांनी पुढे पुस्तकाच्या प्रस्तावनेत दिली आहे.दुरून डोंगर साजरे असाच काहीसा 'शांततेचे घण' या कथेचा आशय आहे. जी गोष्ट आपल्याला दुरून चांगली वाटते, तिच्या खोलात गेल्यावर मात्र ती पचवणं कठीण होऊन बसतं अशाच प्रकारे शांततेच्या शोधात निघालेल्या नायकाला शांतता कोणत्या रुपात गवसते याचे चित्रण 'शांततेचे घण' या कथेत लेखकाने केले आहे.

न्यू केस या कथेतून मानवी मनात निर्माण होणारा हलकल्लोळ आणि वेळोवेळी भावनांना वाट मोकळी न केल्यास ओढावणारी फरफट मांडली आहे. 'तन उधाण वाऱ्याचे ' या कथेतून भुतकाळातील काही संदर्भ वर्तमानात कसे चुकीचे आणि त्रासदायक ठरू शकतात याचे चित्रण आले आहे.विशुती ही विज्ञानाची पार्श्वभूमी असलेली कथा असून त्यात परग्रह, तिथली माणसं अशा रोमांचक कल्पना आढळतात. तो खरंच गेला ? या कथेतून आईवडिलांच्या आंधळ्या प्रेमाचं विदारक फळ आणि त्यातून उद्भवलेला करूण अंत वाचकाला सुन्न करतो.

विशुती ही कथा वगळता इतर कथांना गोमंतकीय साज आहे.कोंकणीतील शब्द, संवाद आणि अस्सलपणा दाखवणाऱ्या शिव्या ही विष्णू सरांनी बेदरकारपणे वापरल्या आहेत. नावेली,वागातोर,आल्तीन ही गावं या कथांमध्ये डोकावतात.पेज, मासळी हे गोमंतकीय पदार्थ कथांची लज्जत वाढवतात. तर मीस केरकर,डॉ .क्रूझ,परेरा, कामील, कातारीन, फिलोमेन, पाडेली, आगुस्तीन अशी गोवेकरांमधली नावे, पादविगार,मांय,पाय ही संबोधने आपुलकी वाढवतात.असा हा गोमंतकीय गंध असलेला अस्सल मराठमोळ्या रंगात रंगलेला कथासंग्रह 'शांततेचे घण' सर्वांनी नक्कीच वाचावा..!

 ​मुळ कोंकणी कथासंग्रह : रुमडफूल

 ​मुळ लेखक : दामोदर मावजो 

 ​मराठी कथासंग्रह : शांततेचे घण 

 ​अनुवाद : विष्णू सुर्या वाघ 


अनु देसाई, हळर्ण पेडणे-गोवा