कुण्या कुस्कुड्याची काणी

गरीब वडिलांनी रानात सोडून दिल्यावर सात बहिणी मुंग्यांचा मागोवा घेत एका मोठ्या घराजवळ पोहोचल्या. तिथे संकटाची चाहूल असूनही, थोरल्या बहिणीच्या धैर्याने आणि धाकटीच्या हुशारीने त्यांनी आडोसा शोधण्याचा प्रयत्न केला.

Story: भरजरी |
16th May, 10:52 pm
कुण्या  कुस्कुड्याची काणी

​​सातही मुली मुंग्यांचा माग काढत काढत मोठ्या घराजवळ पोहोचल्या. मुलींना वाटले या घरामध्ये आपल्याला आधार मिळेल. पण त्यांना कुठे माहीत होतं की त्या घरामध्ये त्यांच्यासाठी एक वेगळे संकट ‘आ’ वासून उभे होते.

मुली घराच्या अंगणात पोहोचल्या. घराच्या आजूबाजूला सगळीकडे गवत वाढले होते. कोणत्याही तऱ्हेची साफसफाई नव्हती. आतून मात्र घोरण्याचा भला मोठा आवाज येत होता. घर बाहेरून पडीक वाटले तरी आतमध्ये नक्की कोणीतरी माणूस आहे, हे घोरण्याच्या आवाजावरून मुलींनी ओळखले. मुली भीत भीतच घराच्या आत गेल्या. बघतात तर काय, एक अक्राळविक्राळ राक्षस स्वयंपाकाच्या खोलीत झोपला होता! जवळच एक मोठी चूल होती. त्यावर भला मोठा हंडा ठेवला होता. त्यामध्ये कसले तरी मटण रटरटत शिजत होते. राक्षसाच्या त्या अक्राळविक्राळ रूपाला बघून मुली घाबरल्या. ‘हा राक्षस उठला तर आपल्याला जिवंत ठेवणार नाही; किड्या-मुंग्यांसारखे चिरडून मारेल. तो उठायच्या अगोदर एक तर आपल्याला इथून पळावे लागेल किंवा त्याला मारावे लागेल. पण एवढ्या मोठ्या राक्षसाला आम्ही मारणार तरी कशा?’ मुलींनी विचार केला आणि हंड्याला बघून त्यांना उपाय सुचला.

सगळ्या मुली हळूच चुलीजवळ गेल्या. ते भले मोठे मटणाचे हंडे आपण राक्षसाच्या तोंडावर पालथे केले, तर राक्षस भाजून मरू शकेल. ‘नाहीतरी आपण मरणाच्या दारात उभ्या आहोतच, तेव्हा हा प्रयत्न करून बघण्यास हरकत नाही,’ असा विचार करून सर्व मुलींनी शक्ती एकवटली आणि ते हंडे राक्षसाच्या तोंडावर उपडे केले. अचानक उकळत्या मटणाचा सगळा रस्सा अंगावर पडल्यामुळे राक्षस धडपडत उठला आणि घराबाहेर धावला. खूप दूरवर ओरडत ओरडत पळून गेला.

राक्षस पळाला आणि मुलींच्या जिवात जीव आला. त्या मोठ्या धैर्याने संकटाला सामोरे गेल्यामुळेच त्यांना एवढ्या मोठ्या घराचा आसरा मिळाला होता. सर्व मुली दिवसभराच्या दगदगीमुळे थकल्या होत्या; मिळेल त्या ठिकाणी आडव्या होत सगळ्याजणी झोपी गेल्या. भल्या पहाटे सगळ्यांना जाग आली. काल संध्याकाळच्या वेळी घरात पोहोचल्यामुळे त्यांना घराचा अंदाज आला नव्हता. पण आता त्यांनी घराला बारकाईने बघितले. तो एक भला मोठा वाडा होता. त्या वाड्याला सात लहान-मोठ्या खोल्या होत्या. त्या खोल्या मौल्यवान वस्तूंनी भरल्या होत्या. पहिली खोली सोन्याच्या दागिन्यांनी भरली होती; मोठी बहीण त्या खोलीत गेली. दुसरी खोली मौल्यवान रत्नांनी भरली होती; दुसऱ्या बहिणीने ती खोली निवडली. तिसरी खोली चांदीच्या भांड्यांनी भरली होती, तिसरी त्या खोलीत गेली. चौथी खोली नाण्यांनी भरली होती, चौथी बहीण त्या खोलीत गेली. पाचवी खोली मौल्यवान कापडांनी भरली होती, पाचव्या बहिणीने त्या खोलीत आपला बस्ता मांडला. सहावी खोली धनधान्याने भरली होती, जी सहाव्या बहिणीने घेतली. आता उरली सातवी खोली आणि सगळ्यात छोटी सातवी बहीण. सातवी खोली मात्र कुण्याने (धान्याचा कोंडा) भरली होती. बिचाऱ्या सातव्या मुलीला नाइलाजाने त्या खोलीत राहावे लागले.

या नव्या घरात मुली नव्याने वावरू लागल्या. सगळीकडे आनंदी आनंद होता. धन-धान्य, सोने-नाणे, कपडे-दागदागिने कशा कशाची कमी नव्हती. बघता बघता सहा बहिणी अतिशय श्रीमंत जीवन जगू लागल्या. आपल्याकडची वस्तू दुसरीला देऊन, आपल्याला गरजेच्या हव्या त्या गोष्टी त्या एकमेकींकडून घेऊ लागल्या. पण सातव्या बहिणीच्या नशिबात मात्र कुण्याची खोली आल्यामुळे मोठ्या सहाही बहिणी तिची खिल्ली उडवू लागल्या. शेवटी म्हणतात ना, 'पैसा दिसला की सगळ्यांची नियत फिरते'. या बहिणींच्या बाबतीतही असेच झाले. सहाही बहिणी आपापल्या जवळ असलेल्या मौल्यवान वस्तूंमुळे अहंकारी झाल्या आणि त्यांनी सातव्या बहिणीला पार किरकोळ लेखले. आपल्या मोठ्या बहिणी ऐषआरामात जगत असताना सातव्या मुलीला मात्र खूप कष्ट करावे लागले. आपल्या खोलीत असलेला कुणा आसडून (साफ करून) त्यातून जे काही छोटे-मोठे धान्याचे कण मिळतील, ते शिजवून ती खाऊ लागली. त्यामुळे मोठ्या सगळ्या बहिणी तिला ‘कुण्या कुस्कुड्या’ म्हणू लागल्या.

त्या रोज तिची खिल्ली उडवत तिला विचारायच्या, “ए कुण्या कुस्कुड्या, काय गो करतय?”

ती म्हणायची, “काय ना, कुणो कुस्कुडतय.”

बहिणी म्हणायच्या, “कुस्कड बाये, आम्ही वयतूय भोवाक (फिरायला). तिया येतंय?”

“ना गे बाये, माका कुणो कुस्कडचो आसा,” ती उत्तर द्यायची. सगळ्या बहिणी मग तिच्यावर फिदीफिदी हसत फिरायला जात असायच्या.

असेच दिवस गेले. ती आपली कुणो कुस्कडत राहिली. एके दिवशी कुणो कुस्कुडत असताना तिला त्यामध्ये एक नवरत्नांचा हार सापडला. ती मनात म्हणाली, “अरे, त्या सातही खोल्यांत सापडणार नाही, त्यापेक्षा मौल्यवान असा हा नवरत्नांचा हार मला ह्या कुणाच्या खोलीत सापडला! याचा अर्थ या खोलीत अनेक अशाच मौल्यवान वस्तू असतील.” सातव्या बहिणीच्या अंगात नवा उत्साह संचारला. बघता बघता तिला कुणाच्या खोलीमध्ये एक-एक अतिमौल्यवान वस्तू सापडू लागल्या. एके दिवशी अशीच ती कुणा कुस्कुडत बसली असता, त्यातून एक जादुई मोर निघाला. हा मोर दिसायला छोटासा खेळण्यातला मोर वाटत होता, पण जमिनीवर ठेवताच तो जिवंत व्हायचा. त्या मोरावर बसून तिला कुठेही फिरता यायचे. हा जादुई मोर बघून लहान बहीण अचंबित आणि आनंदित झाली.

एके दिवशी सातही मुलींना समजले की शेजारच्या एका गावामध्ये जत्रा आहे. ‘या जत्रेला जावे आणि मनमुराद मनोरंजन करून घ्यावे’ या हेतूने आता गर्विष्ठ झालेल्या सहाही बहिणी जत्रेला जाण्याचा बेत करू लागल्या. पण त्यांनी आपल्या ह्या बेताची जरासुद्धा खबरबात सातव्या मुलीला दिली नाही. ‘ती गरीब, कुणा कुस्कुडणारी मुलगी आपल्यासोबत आली तर आमची मान कमी होईल,’ असे त्यांना वाटत होते. सगळ्याजणी जत्रेची जय्यत तयारी करू लागल्या.

जत्रेचा दिवस उजाडला. सहाही बहिणींनी महागडे कपडे घातले, दागदागिने घातले. नटल्या-सजल्या आणि घराबाहेर पडता पडता सातव्या बहिणीच्या खोलीत डोकावल्या. ती बिचारी मन लावून आपला कुणा कुस्कुडत होती.

बहिणी म्हणाल्या, “ए कुण्या कुस्कुड्या, काय गो करतय?”

“काय ना, कुणो कुस्कुडतय.”

“कुस्कड बाये, आम्ही वयतूय जत्रेक. तिया येतंय?”

“ना गे बाये, माका कुणो कुस्कडचो आसा. तुम्ही जाया.”

सगळ्या बहिणी हसत-खिळत घराबाहेर पडल्या. सातव्या बहिणीला खूप वाईट वाटले. “खरंच आहे, जग आज पैशाला ओळखते, नात्याला नाही,” याची जाणीव तिला झाली. कारण गेल्या काही दिवसांपासून ती आपल्या बहिणींचा बदललेला स्वभाव बघत होती. त्यांच्या याच स्वभावामुळे आपल्याला मिळत असलेल्या मौल्यवान वस्तूंच्या बाबतीत तिने त्यांना कोणतीही खबर लागू दिली नव्हती. पण प्रत्येकाची वेळ येते. अशीच या सातव्या बहिणीचीही वेळ येणार होती. तिला मिळालेल्या दिव्य आणि जादुई वस्तूंमुळे या सातव्या मुलीचे नशीब बदलणार होते... आणि तेही फार लवकर!

कसे, ते पुढच्या भागात बघू.

(क्रमशः)


गाैतमी चाेर्लेकर गावस