‘सुखांशी भांडतो आम्ही’ मधून मानवीय मूलभूत प्रेरणांतून उद्भवणाऱ्या सुखाशी निगडित मनातील संवेदना आणि भावना यांचा अर्थपूर्ण शोध घेण्यात आला आहे.

हल्लीच कला अकादमीच्या नाट्य महाविद्यालयाचा ‘सुखांशी भांडतो आम्ही’ या नाटकाचा प्रयोग पाहण्याचा योग आला. महाविद्यालयाच्या अंतिम तुकडीच्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून सदर नाटकाची निर्मिती करण्यात आलेली आहे.
सर्वप्रथम मी या प्रयोगाच्या यशस्वीतेबद्दल यातील सर्व विद्यार्थी कलाकार, दिग्दर्शक अविनाश च्यारी, प्रभारी प्राचार्य श्रीकांत गावडे, त्याचप्रमाणे इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन करतो.
प्रयोग पाहण्याची उत्सुकता होती, कारण पहिल्या वर्षापासून शेवटच्या वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख एखाद्याला बांधता येतो. या नाटकातील सर्व ऑन स्टेज आणि ऑफ स्टेज विद्यार्थी कलाकारांनी समरसून कामे केली; पण मला जास्त प्रभावित केले ते तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या विद्यार्थी कलाकारांनी. बी.पी.ए. (BPA) ही पदवी संपादित करत असताना नाट्यकलेच्या सर्व अंगांचा अभ्यास करण्याची प्रात्यक्षिक रूपाने विद्यार्थ्यांना अशा प्रयोगाच्या निमित्ताने संधी मिळत असते.
‘सुखांशी भांडतो आम्ही’ हे अभिराम भडकमकर यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकाने लिहिलेले नाटक आहे. या नाटकाचे व्यावसायिक स्तरावर अनेक यशस्वी प्रयोग झालेले आहेत. या नाटकाचा विषय आणि आशय खरं तर वास्तववादी शैलीने जाणारा असून, त्याच्यात भौतिकता आणि मानसिकता, त्याचप्रमाणे शरीर आणि मन यांचे द्वंद्व आपल्याला अनुभवायला मिळते. सुख आणि दुःख या मानवाच्या जीवनातल्या नाण्याच्या दोन बाजू. माणूस सतत सुख मिळवण्यासाठी धडपडत असतो. खरं तर भौतिक सुख या संकल्पनेला तशी काहीही मर्यादा नसते. आजच्या या आधुनिक जगात वावरताना सुख मिळवण्यासाठी प्रत्येकाची फरफट होत असते. या सुखाच्या मागे धावताना आपण आपले मनही काबूत राखू शकत नाही. सुख शोधत असताना मनाविरुद्ध चाललेला संघर्ष असा या नाटकाचा गाभा आहे.
‘सुखांशी भांडतो आम्ही’ मधून मानवीय मूलभूत प्रेरणांतून उद्भवणाऱ्या सुखाशी निगडित मनातील संवेदना आणि भावना यांचा अर्थपूर्ण शोध घेण्यात आला आहे.
सदर नाटकाच्या सादरीकरणात डॉक्टर श्रीधर हे पात्र एक नामवंत मानसोपचारतज्ज्ञ आहेत. मोठे हॉस्पिटल उभारण्याचे स्वप्न त्यांच्या डोळ्यांत आहे. त्यासाठी मिसेस प्रधान यांच्यासारखे गर्भश्रीमंतांचे प्रतिनिधित्व करणारे मनोरुग्ण किंवा पेशंट्स लाखो रुपये देऊन उपचार घेत असतात; पण खरं म्हणजे प्रत्यक्षात त्यांना काहीही रोग नसतो, तर बऱ्याच वेळा त्यांच्या मनाचा तो भ्रम असतो. पण पर्यायाने डॉक्टर श्रीधर यांच्या स्वप्नांनाही हीच लोक पैशाच्या रूपाने हातभार लावत असतात.
डॉक्टर श्रीधर यांची पत्नी ही अतिमहत्त्वाकांक्षी आहे. स्वतःला नवश्रीमंत म्हणवून घेण्यात त्यांना धन्यता वाटते. तर त्यांचा मुलगा आपली सुखे शोधण्यात आपल्याच जगात रमणारा आणि त्यासाठी शेवटी सर्व सोडून परदेशगमन स्वीकारणारा दाखवला आहे.
डॉक्टर श्रीधर यांच्या क्लिनिकमध्ये पेशंट म्हणून आलेला सदाशिव हा मनोरुग्ण म्हणजे 'सिझोफ्रेनिया' (Schizophrenia) या मानसिक रोगाचा रुग्ण, पण परिस्थितीनुरूप वेडा म्हणून गणला गेलेला. सदाशिव हे एक सरळमार्गी व्यक्तिमत्त्व, पण समाजातील अन्यायाविरुद्ध लढताना स्वतःच व्यवस्थेचा बळी ठरलेला. स्वतःची बायको व मुलांचा खूनी म्हणून वावरणारा. सदाशिव आपल्या तर्कशुद्ध बुद्धिमत्तेने डॉक्टर श्रीधर यांचे मनपरिवर्तन होण्यास कारणीभूत होतो. अंतिमतः स्वतःच्या स्वार्थासाठी भव्य हॉस्पिटल उभारण्याचे सोडून देऊन डॉक्टर श्रीधर त्या जागी सर्व मुलांना खेळण्यासाठी मोठे गार्डन बनवतात.
संपूर्ण नाटकाचे कथानक जरी वास्तवातले असले, तरी सदर प्रयोग ‘मन’ हे केंद्रबिंदू ठेवून सादर करण्यात आल्याचे जाणवत राहते; कदाचित त्यामुळेच असेल, नेपथ्य योजना ‘विसंगत’ रंगभूमीशी (Absurd Theatre) साधर्म्य सांगणारी वाटली.
रंगमंचावरची उजवी बाजू क्लिनिक तर डावी बाजू घर म्हणून वापरली गेली. घर आणि क्लिनिकमधल्या एकाच कॉमन दरवाज्याचा बेमालूमपणे उपयोग करण्यात आला. बॉक्स सेट नसल्यामुळे हे स्वातंत्र्य घेता आले; पण क्लिनिकमधल्या कलाकारांच्या हालचाली थोड्याशा अवघडलेल्या वाटल्या, इतकेच.
विशेष कौतुक प्रकाशयोजना करणारी मीना वेळीप या विद्यार्थिनीचे. नाटकातील प्रसंगांत परिणाम साधण्याचा तिने उत्तम प्रयत्न केला. पार्श्वसंगीत काही ठिकाणी परिणामकारक वाटले, पण सर्वसाधारणपणे हाताळणीत आणखी सहजता हवी. काही अपवाद वगळता रंगभूषा आणि वेशभूषा ठीक वाटली.
अभिनय करणाऱ्या सर्व कलाकारांची मेहनत दिसत होती. नाट्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात ते यशस्वी ठरले. संभाषणातील चढ-उतार, स्पष्टोच्चार यावर थोडं अधिक लक्ष हवे, बाकी उत्तम.
एकूणच दिग्दर्शक अविनाश च्यारी यांनी विद्यार्थ्यांकडून एक शिस्तबद्ध आणि दर्जेदार नाट्यकृती सादर करून घेण्याची किमया साधली आहे.
या तुकडीतील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील नाट्यमय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

व्यंकटेश नाईक, पर्वरी, गोवा.