गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी

एकेकाळी मार्च-एप्रिलच्या महिन्यात रस्ते, बांधावरील पायवाटा निळ्या-जांभळ्या रंगांनी रंगलेल्या दिसायच्या. भातात, माळरानावर, शेतात, रस्त्याच्या कडेला जांभळीची कित्येक झाडे दिसायची. पण आजकाल रानफळांची, विशेषतः जांभळीची झाडे दिसणे कठीण झाले आहे.

Story: साद निसर्गाची |
16th May, 10:50 pm
गेले ते दिवस,  राहिल्या फक्त आठवणी

शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीची मी आवर्जून वाट पाहत असे. कधी सुट्टी पडते आणि कधी मला अण्णांच्या घरी जायला मिळते असे होई. अण्णांच्या घराच्या चोहोबाजूंनी जंगल असल्याने करवंदे, चुरणे, आसाळे, चारे यासारखा रानमेवा भरपूर प्रमाणात खायला मिळायचा. जांभूळ, भेडसे, रातांबा यासारख्या रानफळांची देखील पुष्कळ झाडे होती. अण्णांनी परसबागेत फणस, आंब्याची झाडे लावून बागायत तयार केलेली. घराच्या मागच्या बाजूने उपनदी वाहत असल्याने नदीवर पोहायला मिळायचे. उन्हाळ्याची सुट्टी पडली रे पडली की, या सगळ्या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी मी थेट अण्णांच्या घरी जायचे.

एकदा अण्णांकडे पोहोचले की जणू आमची प्रत्येक दिवसाची ‘टू-डू-लिस्ट’ तयार व्हायची. पहिला दिवस रानमेव्यासाठी. इकडे भटकायचं, तिकडे भटकायचं; उन्हा-तान्हात नुसतं हुंडरायचं. ही करवंदे तोड, त्या आसाळ्यांवर दगड मार; अंगाला कुठे काटे टोचत आहेत का, कुठे खरचटत आहे का याची जरादेखील पर्वा न करता मनसोक्त मजा करायची. आमच्या मातोश्री शिक्षिका, त्यामुळे घरी असताना आम्हाला कधीच उनाडक्या करायला मिळत नसत. घरी फक्त अभ्यास एके अभ्यास; म्हणून कदाचित अण्णांचे घर आम्हाला मोकळे मैदान वाटत असे.

दुसरा दिवस जांभळे काढण्यासाठी ठरलेला असायचा. ज्या दिवसाची मी सगळ्यात जास्त वाट पाहायचे, तो हाच दिवस. सकाळी उठून चहा, चटणी-घावणे खाऊन मस्त पोट भरले की बांबूची सगळ्यात लांब काठी घेऊन जांभळे काढायला नदीकाठी जायचे. झाडाच्या पायथ्याशी जांभळे गोळा करण्यासाठी सोबत एखादी साडी किंवा स्वच्छ चादर घेऊन जायची. झाडाच्या पायथ्याशी हे कापड नीट पसरवायचे. ते उडू नये म्हणून कापडाच्या कडेवर छोटे छोटे दगड ठेवायचे. काठीच्या साहाय्याने जांभळे पाडून ती कंटाळा येईल तोवर खायची व नंतर ‘कोणाची जीभ किती जांभळी झाली आहे ते बघू’ असे म्हणत एकमेकांना जीभ दाखवत, चिडवत नदीकाठी पोहायला जायचे. जांभळीचे झाड आणि झाडाच्या सानिध्यातील सुट्टी यामागच्या अशा कितीतरी आठवणी अजूनही ताज्या आहेत.

मागच्या वर्षी रस्ता रुंदीकरणासाठी हे जांभळीचे झाड कापले. आम्ही खात होतो त्या रानफळांची कित्येक झुडपे भुईसपाट केली. एकेकाळी मार्च-एप्रिलच्या महिन्यात रस्ते, बांधावरील पायवाटा निळ्या-जांभळ्या रंगांनी रंगलेल्या दिसायच्या. भातात, माळरानावर, शेतात, रस्त्याच्या कडेला जांभळीची कित्येक झाडे दिसायची. पण आजकाल रानफळांची, विशेषतः जांभळीची झाडे दिसणे कठीण झाले आहे. घर बांधण्यासाठी, रस्ते रुंदीकरण यांसारख्या विकासकामांसाठी कित्येक झाडे कापली जातात; त्यात जांभळासारखी बहुउपयोगी झाडे देखील सर्रास कापली जातात. रानमेव्याची झुडपे भुईसपाट केली जातात.

झाड हे माणसाला जगण्यासाठी अनिवार्य असलेल्या प्राणवायूचा एकमेव स्रोत आहे. झाडे फक्त प्राणवायू देण्यापुरतीच मर्यादित नसतात; ती वन्यजीवांना अन्न व आसरा देखील देतात. जांभळीसारखी झाडे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात. मधुमेह नियंत्रणासाठी जांभूळ उपयुक्त मानले जाते. पचन सुधारण्यास व रक्त शुद्ध करण्यासही जांभूळ मदत करते. जांभळाच्या बिया, पाने व सालींचा पारंपरिक औषधांमध्ये उपयोग केला जातो.

जंगलाची जंगले उद्ध्वस्त केल्यास एखादे अत्यंत उपयोगी झाड नामशेष होण्याची भीती वाढते. एकविसाव्या शतकातील माणूस जरी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या शिखरावर पोहोचलेला असला, तरी संशोधकांना एड्स, कॅन्सरसारख्या भयंकर आजारांवर ठोस औषध अजूनही सापडलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. संशोधन अजून सुरू आहे. अशा परिस्थितीत जर उद्या या आजारांवर मात करण्यासाठी झाडापासून बनणारे ठोस औषध संशोधकांनी शोधून काढले, पण माणसाच्या लालसेपोटी (झाडांची कत्तल, जंगलतोड) ते झाड आधीच नामशेष झालेले असेल तर? म्हणूनच विकासकामे अन् पर्यावरणाची सांगड घालणारा विकास गरजेचा आहे.

अण्णांच्या घरी गेले की आंबाडीचे सांसव, फणसाची भाजी, तळलेले फणसाचे गरे, आंब्याची वडी, आंब्या-फणसाचे साठ, रातांब्याची वडी, यांसारख्या हंगामी पदार्थांची मेजवानी असायची. अण्णा गेले, पाठोपाठ जंगलही संपले अन् रानफळांच्या बागायतीही. नदीच्या पाण्याची पातळी इतकी कमी झाली आहे की कधीकाळी उन्हाळ्यात ओसंडून वाहणारी उपनदी आज ओसाड पडेल की काय अशी भीती वाटते.

‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’.


स्त्रिग्धरा नाईक, (लेखिका इलेक्ट्रिकल आणि  इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे)