छत्रपती शिवाजी महाराजांवर होणाऱ्या वादग्रस्त विधानांवरून निर्माण होणारा संभ्रम, राजकारण्यांचे दुटप्पी धोरण आणि रात्रीच्या अंधारात पुतळे उभारण्याच्या गोव्यातील चढाओढीवर प्रकाश टाकणारा परखड लेख.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदुस्थानात स्वराज्याची संकल्पना मांडली. मुघल, आदिलशाह, ब्रिटिश आणि पोर्तुगीजांसारख्या परकीय राजवटींतून जनतेला मुक्त करण्याच्या दूरदृष्टीने शिवरायांनी मराठा साम्राज्य उभे केले. हिंदुस्थानातील बहुतेक भाग शत्रूंच्या तावडीतून जिंकण्याचा पराक्रम या छत्रपतींच्या मराठा साम्राज्याकडे जातो. मुघल, आदिलशाह आणि ब्रिटिशांशी दोन हात करत शिवरायांच्या मावळ्यांनी ही किमया केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा हा दैदीप्यमान इतिहास अजरामर आहे. अशा या शिवरायांप्रती वादग्रस्त असे विधान धिरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी केले. या विधानाचा सर्व स्तरांतून आक्षेप आणि विरोध झाल्यानंतर शिवप्रेमींची जाहीररीत्या माफीही बागेश्वर बाबाने मागितली.
बुद्धिमान, पराक्रमी असलेल्या राजा शिवरायांचे कार्य, कौशल्य आणि नेतृत्वावर शंका-कुशंका करणारे आणि लोकांमध्ये छत्रपतींविषयी संभ्रम निर्माण करणारी व्यक्ती विद्यमान काळात तसेच भविष्यात जन्माला येणे कठीण; तरीही काही व्यक्ती स्वतःची पाठ थोपटण्यासाठी आणि प्रसिद्धीच्या झोतात उतरण्याच्या उद्देशाने शिवरायांवर वादग्रस्त विधाने करत आहेत. काही विशिष्ट लोकांकडूनही लोकांमध्ये संभ्रम तसेच संतापाचे वातावरण पसरवण्याची परंपरा सुरूच आहे. तो काळच असा होता, जिथे शत्रूला नेस्तनाबूत करून प्रांत काबीज करणे, त्यातून कापून शीर धडापासून वेगळे करणे, वेदनादायी कठोर शिक्षा देणे, अशा गोष्टी या लढाईचा किंवा युद्धाचा भाग होत्या. त्यामुळे शत्रूच्या गोटात पराभवाची नाचक्की आणि मानहानीचा क्रोध पसरणे हा याच लढाईचा भाग होता. त्या काळाचा संदर्भ घेऊन आता त्या महापुरुषांवर आरोप करणे आणि त्यांना दोषी ठरवून जनतेमध्ये दुफळी निर्माण करणे अयोग्य आहे.
धिरेंद्र शास्त्री यांनी जे वक्तव्य छत्रपतींविषयी केले होते, त्याला कोणतीही ऐतिहासिक बाजू नव्हती. शास्त्री यांच्याकडून झालेली ही घोडचूक होती. त्यांच्या तोंडून जे शब्द पडले, ते चुकून आले होते की त्यांच्याकडून ते मुद्दामहून वदवून घेतले होते, हा मुद्दा संशोधनाचा जरी असला, तरीही एकनिष्ठ असलेल्या शिवप्रेमींना यामागचा बोलविता धनी हा दुसराच असल्याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही.
गोव्यात शिवरायांना आपले दैवत मानणारे अनेक शिवप्रेमी आहेत. गेल्या काही वर्षांत तर छत्रपतींचे गल्लीबोळात पुतळे उभारण्याची गोवेकरांमध्ये चढाओढच लागलेली दिसत आहे. जिथे मोकळी जागा दिसेल, मग ती सरकारी असो किंवा खाजगी, तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा गुपचूपरीत्या उभा करण्याची कर्तबगारी गोमंतकीयांमध्ये उफाळून आलेली आहे. असे रातोरात छुप्या मार्गाने पुतळे उभे करावेत, असे या राष्ट्रपुरुषाचे व्यक्तिमत्त्व नाही; तर शत्रूंना त्यांच्याच छावणीत घुसून सळो की पळो करणारे असे धाडसी आणि पराक्रमी व्यक्तिमत्त्व म्हणजेच छत्रपती! त्यामुळे रात्रीच्या अंधारात शिवरायांचा पुतळा उभारण्याच्या विचारवृत्तीची कीव, छत्रपतींना दैवत मानणाऱ्या गोमंतकीयांना आल्याशिवाय राहत नाही.
राज्यात शिवजयंतीवेळी काही संस्थांकडून मोठमोठे कार्यक्रम राबवले जातात. या कार्यक्रमांमध्ये स्वतःला शिवअभ्यासक संबोधणारे काहीजण शिवरायांच्या इतिहासावर मोठमोठी भाषणे देतात. मात्र, शिवाजी महाराजांच्या शूरवीरतेवर शिंतोडे उडवणारे भाषण करणाऱ्या धिरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याला आक्षेप घ्यायला किंवा त्यांचा निषेध नोंदवायला यांपैकी एकही व्यक्ती समोर आली नाही. याला हा शिवरायांच्या प्रती असलेला बोगसपणा म्हणावा लागेल.
ज्या संस्था शिवजयंतीला मोठमोठ्या रॅली काढतात, तशी रॅली धिरेंद्र शास्त्री यांचा निषेध करण्यासाठी एकाही शिवप्रेमी संस्थेला काढता आली नाही, हे गोमंतकीयांचे दुर्दैव! राजकारणी लोक हे दुटप्पी धोरणाचे असतात. सत्तेत असताना आणि विरोधी पक्षाच्या वेळी त्यांच्यातील हा दुटप्पीपणा दिसून येतो. त्यामुळे शिवरायांची बदनामी करणाऱ्या वक्तव्यावर या लोकांनी मतप्रदर्शित करावे, अशी सर्वसामान्य जनतेचीही अपेक्षा नसते; परंतु शिवरायांच्या नावे गाजाबाजा करणारे तरी जाहीररीत्या मत मांडतील, अशी गोव्यातील विशेषतः हिंदू जनतेला आशा होती.
छत्रपती हे पळपुटे नव्हते, तर शूरवीर, निर्भीड आणि न्यायी होते. त्यामुळेच त्यांनी स्वराज्याची बीजे जनमानसात रुजवली, असे जाहीररीत्या ठणकावून सांगण्याची धमक गोव्यातील एकाही शिवप्रेमीमध्ये झाली नाही. पुतळे उभारण्यापेक्षा या राष्ट्रपुरुषाचे व्यक्तिमत्त्व, त्यांची कर्तबगारी, त्यांची न्यायप्रणाली आणि जनतेला जाचातून मुक्त करणारी समाजाप्रती असलेली त्यांची महानता आत्मसात करणे गरजेचे आहे.

- उमेश झर्मेकर, (लेखक गोवन वार्ताचे उत्तर गोवा ब्युरो चीफ आहेत.)