ऐतिहासिक कृतज्ञतेचा वारसा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्लक्षित समाधीचा शोध घेऊन तिचे जतन करण्याचे महान कार्य महात्मा जोतिराव फुले यांनी केले. या लेखात शिवरायांविषयी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि इतर विचारवंतांनी व्यक्त केलेले विचार व त्यांचे ऐतिहासिक योगदान स्पष्ट केले आहे.

Story: चिंतन |
02nd May, 11:28 pm
ऐतिहासिक कृतज्ञतेचा वारसा

छ​त्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्लक्षित समाधीचा शोध घेऊन तिचे जतन करण्याचे महान कार्य महात्मा जोतिराव फुले यांनी केले. या लेखात शिवरायांविषयी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि इतर विचारवंतांनी व्यक्त केलेले विचार व त्यांचे ऐतिहासिक योगदान स्पष्ट केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कर्तृत्वाचा आणि कार्याचा प्रभाव इतका अफाट आहे की, आजही केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-विदेशात त्यांना प्रेरणास्थानी मानले जाते. मात्र, इतिहासाच्या प्रवासात एक काळ असा होता की, या युगपुरुषाची समाधी अत्यंत दुर्लक्षित आणि ओसाड अवस्थेत होती. या समाधीचा शोध घेऊन तिचे जतन करण्याचे महान कार्य क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांनी अत्यंत निष्ठेने केले.

शिवाजी महाराजांचे निधन १६८० साली रायगड किल्ल्यावर झाले आणि त्यानंतर त्यांची समाधीही त्याच पवित्र भूमीवर बांधण्यात आली. परंतु पुढील काळात मराठा साम्राज्याचा ऱ्हास, इंग्रजांची राजवट आणि प्रशासकीय दुर्लक्ष यामुळे ही समाधी हळूहळू लोप पावत गेली. लोकांच्या मनात शिवरायांविषयी अपार आदर होता, परंतु त्यांच्या प्रत्यक्ष समाधीबद्दल फारशी जागरूकता नव्हती. अशा प्रतिकूल परिस्थितीत, १८६९ साली महात्मा जोतिराव फुले रायगडावर गेले. तेथे त्यांनी मोठ्या परिश्रमानंतर शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. त्यावेळी समाधीची अवस्था अतिशय दयनीय होती. ती झाडाझुडपांनी वेढलेली होती आणि तिची देखभाल करणारे कोणीही नव्हते. हे दृश्य पाहून महात्मा फुले अत्यंत व्यथित झाले. त्यांनी तत्काळ समाधीची स्वच्छता करून तिचे जतन करण्याचा संकल्प केला आणि शिवरायांना ‘कुळवाडी भूषण’ ही सार्थ पदवी देऊन त्यांचा गौरव केला.

महात्मा फुले यांनी समाजातील सर्व घटकांना शिवाजी महाराजांच्या खऱ्या कार्याची जाणीव करून दिली. त्यांच्या मते, शिवाजी महाराज हे केवळ एक सत्ताधारी राजे नव्हते, तर ते शोषित, पीडित आणि कष्टकरी जनतेचे कैवारी होते. म्हणूनच महात्मा फुले यांनी शिवसमाधीचा शोध घेऊन तिचे जतन करणे हे केवळ वैयक्तिक कार्य न मानता, ते एक सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्य मानले. आज रायगड किल्ल्यावर असलेली ही समाधी एक महत्त्वाचे ऐतिहासिक आणि प्रेरणादायी स्थळ बनले आहे. दरवर्षी हजारो शिवभक्त तेथे नतमस्तक होतात. या सर्व परिवर्तनाचे श्रेय महात्मा जोतिराव फुले यांच्या दूरदृष्टीला जाते. त्यांनी केवळ समाधीचा शोध लावला नाही, तर समाजात स्वाभिमान आणि इतिहासाबद्दलची जाज्वल्य जागरूकता निर्माण केली.

महात्मा जोतिराव फुले यांनी १८६९ मध्ये ‘छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा’ लिहिला, जो शिवरायांवरील पहिला आधुनिक पोवाडा मानला जातो. शिवस्मारकाची संकल्पना प्रत्यक्षात फुल्यांचीच होती, पण हे आजही किती जणांना माहीत आहे? फुले स्वतः या अनुभवाबद्दल लिहितात की, "पुण्यास आलो व शिवछत्रपतींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी रायगडी जाण्यास निघालो. समाधीची जागा शोधण्यात दोन-तीन दिवस गेले. घाणेरी व इतर जंगली झुडपे कुऱ्हाडीने तोडीत रस्ता काढावा लागला. शिवजन्म उत्सव साजरा करावा, म्हणून समाधीवरील सर्व कचरा धुवून काढून त्यावर फुले वाहिली. त्यांचे स्मारक म्हणून मी अल्प काव्य केले आहे ते त्यांना समर्पण करतो..."

आज भारतात सर्व जाती-धर्माचे लोक शिवछत्रपतींना राष्ट्रपुरुष मानतात. उच्चवर्णीय त्यांना ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ म्हणतात, परंतु ज्यावेळी त्यांच्या स्मारकाची साधी कल्पनाही कोणाच्या मनात नव्हती, त्यावेळी फुल्यांनी तिला लोकचळवळीचे स्वरूप दिले. सावित्रीबाई फुले या सुद्धा जोतिरावांप्रमाणेच तत्त्वनिष्ठ विचारवंत आणि १९ व्या शतकातील एक प्रतिभासंपन्न कवयित्री होत्या. त्यांच्या ‘काव्यफुले’ (१८५४) या संग्रहातील ‘छत्रपती शिवाजी’ ही कविता शिवरायांची थोरवी अत्यंत सोप्या पण प्रभावी शब्दांत मांडते. त्यांनी शिवरायांना ‘शूद्रादी अतिशूद्रांचा प्रभू’ म्हणून गौरविले आहे.

महात्मा फुले यांनी पोवाड्यांमधून बाल शिवबाचे अतिशय सुंदर आणि लाघवी वर्णन केले आहे. शिवनेरीवरील जन्मापासून ते स्वराज्य निर्मितीपर्यंतचा इतिहास त्यांनी लोकभाषेत मांडला. त्यांच्या लेखणीतून शिवरायांची प्रतिमा महाराष्ट्रातील कष्टकरी शेतकरी आणि बहुजनांचा ‘खरा राजा’ म्हणून ठळकपणे उमटली. जोतिबांच्या सत्यशोधक चळवळीचे खंदे समर्थक दिनकरराव जवळकर यांनीही ‘छत्रपती पद्यसंग्रह’ रचून शिवरायांचा बाणा लोकांपर्यंत पोहोचवला.

सध्या महाराष्ट्रात रायगडावरील शिवसमाधीसमोर महात्मा फुले यांच्या नावाचा उल्लेख असावा, यासाठी चळवळ सुरू आहे. ऐतिहासिक सत्य हेच आहे की, जोतिरावांनीच हा वारसा पुन्हा उजेडात आणला. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने ही लोकभावना विचारात घेऊन त्यांच्या नावाचा यथोचित उल्लेख तिथे करायला हवा. केवळ जयजयकार करून चालणार नाही, तर शिवरायांच्या विचारांचा जागर होणे आवश्यक आहे. समाज घडवण्यासाठी पुस्तके आणि महापुरुषांची स्मारके हीच खरी प्रेरणास्थाने आहेत. नवीन पिढीला इतिहास समजून सांगण्यासाठी ही स्थळे जपणे आणि त्यांचा सन्मान करणे, हे आपले सांस्कृतिक कर्तव्य आहे.


- डॉ. प्रवीण बनसोड