विंचू आणि रात्र भटकंतीचे गूढ

विंचू हे जिवंत पिलांना जन्म देणारे प्राणी आहेत, ते अंडी घालत नाहीत. जन्मानंतर पिल्ले आईच्या पाठीवरून सर्वत्र फिरतात. आई पहिल्यावेळी कात टाकेपर्यंत पिल्लांना संरक्षण देते.

Story: साद निसर्गाची |
02nd May, 11:13 pm
विंचू आणि रात्र भटकंतीचे गूढ

जंगलात रात्र भटकंती करणे हे माझ्या मते निसर्गातील नव-नवीन रहस्य उलगडण्याचे एक सर्वोत्तम साधन आहे. हवामान बदल, बदलते ऋतू, बदलत्या परीसराप्रमाणे निसर्गातील घटक बदलत असतात. हे बदलते घटक अनेकदा आपल्याला भटकंती दरम्यान चकित करतात. रात्र भटकंती कधी-कधी निसर्गातील जुनी रहस्य नव्याने उलगडवतात. सतत आपल्या आजूबाजूला असणारा/दिसणारा, आपल्या परीचयाचा एखादा वन्यजीव देखील किती रहस्यमय असू शकतो हे आपल्याला रात्र भटकंतीत समजतं.  

आठ पाय, दोन नांग्या, एक शेपूट असलेला विषारी विंचू सर्वांच्याच परीचयाचा. 'विषारी तो, तेका फियार रावपाचो ना', असं म्हणत अनेकांनी याला काठीने ठार मारलेला देखील मी अनेकदा पाहिला आहे. संपूर्ण मनुष्यजातीला घाबरवणारा हा विषारी वन्यजीव चांदोबाच्या प्रकाशात चकाकण्याची क्षमता ठेवतो हे मात्र मला माहित नव्हतं. हे रहस्य रात्र भटकंतीनंतर उलगडलं. 

रात्र भटकंतीसाठी जाताना आपण सोबत टॉर्च घेतो, पायाला बूट घालतो. कटाक्षाने आपल्या पेहरावाकडे लक्ष देतो. रात्र भटकंतीसाठी जाताना आणखी एक लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे सोबतीला चांगला संयमी मार्गदर्शक घेऊन जाणे. आमच्या मागदर्शकाने भटकंती दरम्यान मोठ्या संयमाने आम्हाला शोधून दाखवलेला चकाकणारा विंचू हे ही गोष्ट सांगण्यामागचे कारण. चकाकणारा विंचू पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. यामागचं गुढ आम्हाला सांगण्यात आलं ते असं.

विंचू प्रामुख्याने रात्री बाहेर पडतात आणि शिकार करतात. दिवसा ते दगडाखाली, भेगांमध्ये किंवा मातीमध्ये लपून बसतात. हे जमिनीवरील अतिशय सूक्ष्म कंपने देखील ओळखू शकतात. त्यामुळे ते अंधारातही शिकार पकडतात. विंचूवर अल्ट्राव्हायोलेट (UV) प्रकाश टाकल्यानंतर तो निळसर-हिरव्या रंगात चमकतो. हे त्याच्या शरीरातील रसायनांमुळे होते. विंचूंच्या बाहेरील कवचामध्ये बीटा-कार्बोलिन, व कौमारिनच्या प्रकारची विशेष फ्लुरोसंट रसायने असतात. ही रसायने अल्ट्राव्हायोलेट प्रकाश शोषून त्याला निळसर-हिरव्या रंगाच्या प्रकाशात परावर्तित करतात. त्यामुळे अंधारात अल्ट्राव्हायोलेट टॉर्चचा उजेड टाकल्यानंतर विंचू फ्लुरोसंट रंगाने चमकू लागतो.

हे असं का घडतं याबाबत काही तर्क मांडले गेले आहेत. काही शास्त्रज्ञांच्या मते विंचू दिवस आणि रात्रीमधील फरक ओळखण्यासाठी किंवा रात्रप्रकाशाचा अंदाज घेण्यासाठी याचा उपयोग करत असावा. काही संशोधकांच्या मते विंचू जोडीदार शोधण्यासाठी किंवा जोडीदाराला स्वतःची उपस्थिती दाखवण्यासाठी UV प्रकाशाचा उपयोग करत असावा. अल्ट्राव्हायोलेट प्रकाश शोषून वेगळ्या तरंगलांबीचा प्रकाश सोडणारी विंचूंच्या बाह्य कवचातील रसायने कदाचित विंचूला या किरणांपासून संरक्षण देत असावी असं काहीजणांचं मत आहे. पण आजपर्यंत एकही तर्क पूर्णपणे सिद्ध झालेला नाही. बहुतेक शास्त्रज्ञांच्या मते विंचवामध्ये चकाकण्याची क्षमता एकापेक्षा जास्त कारणांसाठी (संरक्षण, संवेदना) विकसित झाली असावी.

विंचवाच्या शेपटीच्या टोकाला विषारी डंख असतो. काही प्रजातींचे विष इतके जटिल असते की ते माणसासाठी धोकादायक ठरू शकते. बहुतेक प्रजाती घातक नसतात. त्या हे  विष फक्त शिकार पकडण्यासाठी वापरतात. विष टोचून ते आधी शिकार बधिर करतात व नंतर ती पकडून खातात. झुरळ, झिंगूर, टोळ, कोळी यासारखे कीटक, भुंगा,अळ्या, पाल खाऊन विंचू स्वतःचा उदरनिर्वाह करतो. विंचू हा असा वन्यजीव आहे जो वाळवंटासारख्या कठीण वातावरणातही सहज जगू शकतो. हे अनेक दिवस अन्नाशिवाय देखील राहू शकतात. विंचू हा फुरशें सापाचे मुख्य खाद्य होय. 

विंचू हे जिवंत पिलांना जन्म देणारे प्राणी आहेत, ते अंडी घालत नाहीत. जन्मानंतर पिल्ले आईच्या पाठीवरून सर्वत्र फिरतात. आई पहिल्यावेळी कात टाकेपर्यंत पिल्लांना संरक्षण देते. प्रजनन काळात नर मादीला शोधतो. नर मादीचे पंजे पकडून एका विशिष्ट नृत्यासारख्या हालचाली करतो. नर आपले शुक्राणू जमिनीत ठेवतो आणि मादीला त्यावर मार्गदर्शित करतो. नंतर मादी हे शुक्राणू आपल्या शरीरात घेते. ६ ते १८ महिन्यांच्या गर्भधारणेनंतर मादी विंचू सरासरी २ ते १०० पिलांना जन्म देते.


- स्त्रिग्धरा नाईक, (लेखिका इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे)