गोवा पोलीस कॉन्स्टेबल मेगा भरती

गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे ७०० पदांची पोलीस मेगा भरती जाहीर झाली असून, लेखी परीक्षा व शारीरिक चाचणीच्या तयारीसाठी अभ्यासाचे अचूक नियोजन आणि महत्त्वाच्या टिप्स.

Story: यशस्वी भव: |
02nd May, 11:11 pm
गोवा पोलीस कॉन्स्टेबल  मेगा भरती

गो​वा स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे पुढील महिन्यात पोलीस कॉन्स्टेबल पुरुष आणि महिला अशा दोन्ही जागा मोठ्या संख्येने भरल्या जाणार आहेत. वेबसाइटवर यासंबंधीची अधिसूचना (नोटिफिकेशन) प्रसिद्ध करण्यात आली असून, १६ मे शनिवार, १७ मे रविवार, २४ मे रविवार, ३० मे शनिवार आणि ३१ मे रविवार या दिवशी परीक्षेची पहिली पातळी म्हणजेच 'सीबीटी-१' (CBT-1) घेतली जाईल.

​साधारणपणे ७०० च्या आसपास विविध पदे भरली जाणार आहेत. ज्यामध्ये प्लॅटून कमांडर - ४, राउंड फॉरेस्टर - २३, पोलीस कॉन्स्टेबल (पुरुष/स्त्री) - ३६०, आर्मड पोलीस - ११९, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर - ११९, कॉन्स्टेबल ग्रिझर, कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियन, फॉरेस्ट गार्ड - ९, असिस्टंट सुपरिटेंडंट - ४, वार्डन (पुरुष) - ६०, मॅट्रन (स्त्री) - १०, लास्कर (पुरुष) - ५ तर एस्कॉर्ट (स्त्री) - २ अशी पदे समाविष्ट आहेत.

​यासाठी अधिकृत संकेतस्थळ gssc.gov किंवा gssc.goa.gov.in हे आहे.

​निवड प्रक्रिया आणि शारीरिक निकष:

हा सर्व तपशील आता खुला करण्यात आला आहे. परीक्षा दोन टप्प्यांत घेतली जाईल. सीबीटी-१, फिजिकल टेस्ट, सीबीटी-२ आणि कागदपत्र पडताळणी (डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन) अशा क्रमाने ही प्रक्रिया पार पडेल. ही संपूर्ण प्रक्रिया पुढील २ ते अडीच महिने चालू राहणार आहे.

​पुरुष उमेदवारांसाठी उंची किमान १६८ सेंमी आणि छाती फुगवून ८५ सेंमी असणे आवश्यक आहे. शारीरिक चाचणीत १०० मीटर धावणे (किमान १४ सेकंदात), लांब उडी, उंच उडी आणि फास्ट स्प्रिंट रनिंग यांमध्ये यशस्वी होणे गरजेचे आहे. महिला उमेदवारांसाठी १०० मीटर धावणे १८.५ सेकंदात पूर्ण करायचे असून, त्यांनाही उंच उडी, लांब उडी व फास्ट स्प्रिंट रनिंगमध्ये निवडून यायचे आहे.

​परीक्षेचे स्वरूप:

सीबीटी-१ आणि सीबीटी-२ या दोन्ही परीक्षा ६० गुणांच्या असतील. सीबीटी-१ मध्ये ६० प्रश्न ७५ मिनिटांत सोडवायचे आहेत. यामध्ये इंग्रजी आणि गणित ३० गुणांसाठी, रिझनिंग १० गुणांसाठी आणि कोकणी १० गुणांसाठी अशी विभागणी आहे. विशेष म्हणजे कोकणी विषयात १० पैकी किमान ४ गुण मिळवणे अनिवार्य आहे.

​या परीक्षेतील 'कट ऑफ'नुसार गुणवत्ता यादी (मेरिट लिस्ट) तयार केली जाईल. यातून एका पदासाठी १० किंवा १५ या प्रमाणात विद्यार्थी सीबीटी-२ साठी पात्र ठरतील. सीबीटी-२ परीक्षेत गणित - १० गुण, रिझनिंग - १० गुण, इंग्रजी - २० गुण आणि गोव्याचा इतिहास - २० गुण असे स्वरूप असेल. ही परीक्षा सुद्धा ६० गुणांची असून त्यासाठी ७५ मिनिटांचा वेळ दिला जाईल.

​अभ्यासाचे नियोजन:

विद्यार्थ्यांनी सध्या सीबीटी-१ वर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. इंग्रजी आणि कोकणी या विषयांत जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करावा. रिझनिंग आणि गणित हे विषय तुलनेने अवघड वाटत असले, तरी योग्य मेहनत घेतल्यास त्यात चांगले गुण मिळू शकतात. अनेक विद्यार्थी फक्त गणित आणि रिझनिंगचेच दडपण घेतात आणि तिथेच वेळ घालवून इतर सोप्या विषयांकडे दुर्लक्ष करतात. यामुळे त्यांचे नुकसान होते.

​जर संतुलित अभ्यासाचे नियोजन केले, तर ४० ते ४५ पर्यंत स्कोअर आरामात येऊ शकतो. अभ्यासाचे प्लॅनिंग 'सोपे-मध्यम-कठीण' या क्रमाने करावे. उर्वरित २० दिवसांमध्येही नीट तयारी केली, तर खूप चांगला अभ्यास होऊ शकतो.


- अॅड. शैलेश कुलकर्णी, कुर्टी - फोंडा, (लेखक नामांकित वकील आणि करिअर समुपदेशक आहेत.)