
अापल्यापैकी अनेकांकडे पाळीव प्राणी असतोच.मांजर,कुत्रा तरी काहीजण हौसेने पक्षी ही पाळतात. हळूहळू हे प्राणी आपल्या घराचा, दैनंदिन आयुष्याचा भाग बनून जातात.आजकाल पेंट पेरेंट ही संकल्पना आपल्याला सर्रास अनेक ठिकाणी पाहायला मिळते.मुक्या जनावरांना बोलता जरी येत नसलं तरी त्यांच्या कृतीतून ते आपल्या भावना आपल्या मालकांपर्यंत पोहचवतात.त्यांच्या खाण्या-पिण्याच्या ठराविक वेळा, खेळण्याच्या वेळा मालकांना ज्ञात असतात त्याचप्रमाणे अनेकवेळा हे मुके जीव आपल्या मालकांवर इतके अवलंबून असतात की ते काहीकाळ समोर नसले तर त्यांच्या दैनंदिन वागण्यावर,तब्येतीवर त्याचा परिणाम दिसून येतो अशा आशयाची मांडणी 'झोरो' मध्ये दिसून येते.
मुग्धा शेखर यांनी लिहिलेली अशाच एका गोजिऱ्या बोक्याची कहाणी म्हणजे झोरो..! नुकतीच वाचनाला सुरुवात करणाऱ्या,अक्षर ओळख असलेल्या मुलांसाठी हे पुस्तक सुंदर सुरुवात आहे.झोरोचं मुखपृष्ठावर दोन सुबक गोजिरवाणे बोके रेखाटले आहेत जे मुलांचं लक्ष वेधून घेतात.त्यात या पुस्तकाची आटोपती पुष्ट संख्या मुलांसाठी वाचन कंटाळवाणे न होऊ देता शेवटपर्यंत त्यांचं लक्ष केंद्रित ठेवण्यात यशस्वी होते.झोरोची गोष्ट 'झोरो' नावाच्या बोक्याच्या आत्मकथनाने सुरू होते जिथे तो हरवला आहे.तो कुठे नि कसा हरवला त्यापासून ते त्याची जन्मकथा थोडक्यात लेखिकेने वर्णिली आहे.
पाहुणी म्हणून आलेली चिमुकली चुकून झोरोला सोबत घेते.स्टेशनवर पोहचेपर्यंत तो घरून गायब झाल्याचे कोणाच्याही लक्षात येत नाही.शेवटी स्टेशनवर त्या मुलीला हे लक्षात येतं आणि ती घाबरून त्याला तिथेच सोडते.यामुळे बिचाऱ्या झोरोची फरफट होते.सतत इकडे तिकडे धावणाऱ्या लोकांमधून वाट काढत तो जीव मुठीत घेऊन बाकाखाली लपतो.आता आपल्याला आपली मालकीण दिसेल की नाही अशी शंका त्याच्या मनात येते आणि तो अधिक खचतो.बाकावर बसलेली व्यक्ती आपली मालकीण समजून तो वेड्या आशेने बाहेर धावतो मात्र ती आशा ही फोल ठरते अशावेळी मालकीण आणि झोरो यांच्यातलं नातं पुढील घटनेमुळे अधिक घट्ट होते आणि झोरो आपल्या मालकिणीच्या कुशीत अलगद विसावतो.
दुसऱ्या प्रकरणात त्याची मालकीण त्याला शोधतानाचा प्रसंग कथन करते.त्यातच ती तिच्या अंगणात खेळणाऱ्या भटक्या कुत्रीविषयी व तिच्या पिल्लांविषयी सांगते.झोरो आणि त्या पिल्लांच्या मैत्री विषयी लिहिताना त्यांच्या ताटातुटीच्या प्रसंगाचे वर्णन वाचकांना हळवे बनवते.तरीही तीन पिल्लांपैकी एका पिल्लाच्या सहवासात झोरो सावरतो.तो द्वाड तसाच भित्रा ही आहे.तो अंगणात येणाऱ्या कुत्रीला घाबरतो आणि शेजारच्यांच्या पत्र्याच्या शेडवर चढल्यावर पुन्हा खाली उतरायची वाट विसरतो नि मदतीसाठी म्याँव म्याॅंव करत बसतो.तो आपल्या जन्मदात्या आईला छोटी आई आणि मालकिणीला मोठी आई असे संबोधतो.
शेवटचे प्रकरण थोडेसे भिन्न वाटते कारण पहिली दोन प्रकरणे झोरो आणि त्याच्या मालकीणीच्या एकमेकांविषयीची आत्मकथने आहेत मात्र तिसरे प्रकरण एका अंड्यात असलेल्या पक्षाच्या पिल्लाचे आत्मकथन आहे जे पिल्लू अंड्यातून बाहेर पडण्यापूर्वीचा घटनाक्रम कथन करते.नर मादी (आई-बाबा) पक्षांचं घरटं बांधणं, पिल्लांना खाणं आणणं इत्यादी.या प्रकरणात हे पिल्लू आपल्या भोवती असलेल्या अंड्याच्या कवचाला खोली असे संबोधते.लेखिकेच्या या अभिनव कल्पनेचे कौतुक करावेसे वाटते.
या बालकथेची मांडणी लेखिकेने लहान मुलांना समोर ठेवून सोप्या सुटसुटीत शब्दांत केलेली आहे.छोटे छोटे संवाद, अगदीच आजुबाजुला असणाऱ्या परिसराचे वर्णन ज्यामुळे मुले त्यात रमू शकतील अशाच स्वरूपाची आहे मात्र वाचत असताना काही ठिकाणी थोडासा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.उदाहरणार्थ झोरो आपल्या छोट्या आईचा पाठलाग करताना हरवतो आणि त्याला एक छोटी मुलगी घरी नेते तेव्हा वाचकांना वाटते की तीच त्याची मोठी आई आहे पण लगेच त्याला दुसऱ्या कुणाकडे तरी दिल्याचा उल्लेख आढळतो; एक दोनदा वाचल्यानंतर तो संदर्भ लक्षात येतो.
या पुस्तकाच्या प्रत्येक पानाच्या कोपऱ्यात दोन छोट्या बोक्यांची चित्रे दिलेली आहेत.ती सुंदर आहेत पण वाचकांचा वयोगट लक्षात घेता गोष्टी नुसार काही रंगीत अथवा स्केच सदृश्य चित्रे अधेमधे घेतली असती तर पुस्तक अधिक आकर्षक झाले असते.या पुस्तकाची खासियत म्हणजे हे पुस्तक आडवे असल्याने इतर पुस्तकांपेक्षा मोठे आहे आणि यातील अक्षर आकाराने ठसठशीत असल्याने मुलांना वाचताना अडचण होत नाही.हे पुस्तक लहान मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणारे आणि मुक प्राण्यांविषयी त्यांच्या मनात संवेदना जागृत करणारे आहे त्यामुळे सगळ्या पालकांनी आपल्या मुलांना हे पुस्तक वाचावयास द्यावे..!
बालकथा: झोरो, लेखिका: मुग्धा शेखर

- अनु देसाई, हळर्ण पेडणे-गोवा