आंबं...!

पूर्वसूत्र : आजोबांनी लावलेल्या डेरेदार आंब्याच्या झाडाशी मारुतीच्या कुटुंबाचे जिव्हाळ्याचे नाते आहे. यंदा झाड मोहोरल्याने, उत्पन्नाच्या आशेने मारुती आनंदाने आणि जबाबदारीने त्या पारंपरिक वैभवाची राखण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Story: कथा |
02nd May, 11:24 pm
आंबं...!

एका रात्री कुत्र्याच्या भुंकण्याने मारुती जागा झाला... बघतो तर काय? झाडाखाली तीन-चार मानवी सावल्या हलताना दिसल्या. हातात काठ्या असाव्यात आणि उजेडासाठी एखादी बॅटरी. जाग आली तसा मारुती ओरडलाच, तोपर्यंत कुत्रा झाडाखाली पोहोचला. कुत्र्याच्या भीतीने आंबे चोरणारे घाबरले, मारुतीच्या आवाजासरशी सगळं सामान टाकून ती माणसं पसार झाली. मारुतीही झाडाखाली आला. हातात धार लावलेला कोयता होताच. खाली थोडी आंबे पडलेली दिसली आणि काठ्यांनी आंबे झोडताना पडलेला पाला. एक-दोन लांब काठ्या आणि काहीशी रिकामी पोती दिसली. सगळं सामान गुंडाळून मारुती खोपीकडे परतला आणि बाटली-खिळ्याच्या आवाजात झोपी गेला.

रात्री वारा शांतपणे वाहत होता, वटवाघळांचा आवाज, त्यांची फडफड चालूच होती. रात्री शिकारीला कुणीतरी गेलं असावं, रानात बार काढल्याचा आवाज झाला. कुठतरी सुकलेल्या पाल्यात सळसळ जाणवायची, घुबडाचा घुमणारा आवाज अधेमधे यायचा. मारुती त्या खोपीत अंगावर गोधडी गुंडाळून झोपी गेला होता, पण काही आवाज झाला की मात्र ताडकन उठायचा आणि तिकडे बॅटरी मारून बघायचा. खरं तर आंबे झाडावर आहेत तोवर त्याला गाढ झोप लागणार नव्हती.

एक आठवडा गेला असेल, मारुतीने वाडीवरची पोरं जमवली आणि आंबे उतरायला जोडणी घातली. काठीला आंबे काढायला बैलांची मुसकी बांधली, दोन लहान तिरपी बेळं बांधली; म्हणजे आंबे त्या मुसक्यात (जाळ्यात) आले की त्या बेळ्यांनी त्यांचा देठ अलगद तुटेल. चार-पाच रिकामी पोती घेतली, कोयता, खुरपी, पोती बांधायला बांधणी (सुतळीचे तुकडे) आणि पाणी प्यायला एक तांब्या-कळशी घेतली.

प्रत्येकाने एक-एक फांदी धरली. दिवसभर आंबे काढायचं काम सुरू होतं. दोरी बांधलेली पोती वरून खाली येत. मारुतीचा बाबा ती पोती रिकामी करून देई. एखाद-दुसरा पिकलेला आंबा पोरं वरच खात. बाजूला उसाची लावण बरीच मोठी झालेली. पिकलेले आंबे पोरं त्या लावणीत टाकायचे, म्हणजे जाताना घरी न्यायला मिळायचे. पण पुन्हा कामाला लागत. दुपारी आई डोक्यावर बुट्टी घेऊन भाकरी घेऊन आली. एक-दोन वाडीतली लहान पोरं आंबे खायच्या आशेनं आलेली. ती पोरं सारखी खाली ओतलेल्या आंब्यांना रापायची (स्पर्श करायची). आई पोरांवर खेकसलीच.

"आरं आंबं रापलं की पिकत न्हाईत रं..! व्हा बाजूला!" असं म्हणत तिने हातात काठीच घेतली.

सगळे खाली उतरले आणि हात धुऊन बसले. आईने भाकरी दिल्या. भाकरीवर हिरव्या मिरचीचा ठेचा दिला आणि वांग्याची भाजी दिली. एका पोराने चार पिकलेले आंबे कापले. एका हातात भाकरी आणि दुसऱ्या हातात आंब्याची फोड. गोड-तिखट चव चाखत पोरांनी भाकरी संपवली. संध्याकाळी उतरलेल्या आंब्यांची गठली बांधली आणि प्रत्येकाने डोक्यावर घेऊन मारुतीच्या घरात पोहोचती केली. दोन दिवस हे काम सुरू होतं. कुठेतरी वळांबीचे म्हणजे फांदीच्या शेंड्याचे आंबे फक्त झाडाला राहिले. बाकी सारे आंबे घरात आले.

घरात आईने आंबे पिकत घालायला एक मोठी कणगी, दोन मोठी डालं ठेवली होती. रात्री जेवायच्या आधी मारुती परड्यात गेला आणि गवताच्या व्हळीतून दोन कवळे मारून गवत घेऊन आला. थरावर थर लावत कणगी आणि डालं भरून गेली. त्यांना व्यवस्थित झाकून ठेवून दिले. आता कुठं मारुती निवांत झाला.

आता आठवडाभर तरी या आंब्याच्या आडीकडे बघायचे नाही. आज मारुती निवांत झोपला. रोजच्याप्रमाणे कामे सुरू झाली.

जसे आंबे पिकतील तसे बाहेर काढून मारुती बुट्टी भरू लागला आणि त्या दिवशी कडगाव गाठायचे. तिघंही डोक्यावरून बुट्टी घेऊन सकाळच्या उन्हाच्या आधी चालत कडगावची वाट धरायचे. आई गावात फिरून आंबे विकत तर मारुती एसटी स्टँडवर थांबे आणि बाबा खालच्या नाक्यावर. बऱ्यापैकी पैसे मिळत होते. संध्याकाळी काहीतरी बाजार करून तिघंही घरी येत.

उद्या शुक्रवारचा बाजार, कडगावात बरीच गर्दी असते. उरलं-सुरलं सगळं आंबं विकावं असा विचार मारुतीच्या मनात डोकावला. सकाळी लवकर उठून सारी आडी रिकामी केली. बुट्टी भरताना होणारा आनंद मारुतीच्या चेहऱ्यावर दिसत होता. एखाद-दुसरा कुजका आंबा बाजूला सारून बुट्टीत पक्के आंबे अलगद ठेवत होता. पिवळ्या रंगावर आलेले आंबे पाहून आईचं मन भरून येत होतं. घरात पिकल्या आंब्यांचा वास दरवळत होता. घाईघाईत चार घास खाऊन सगळ्यांनी वाट धरली. शुक्रवारचा बाजार फक्त डोळ्यांपुढे दिसत होता. लगबगीनं पावलं टाकत वाट मागे सरत होती. डोक्यावरचं ओझं जरा आज जास्तच जाणवत होतं. केसातून घामाचे थेंब खाली ओघळायला लागले. आईच्या कपाळावरचं कुंकू तर ओघळून पार नाकाच्या दांडीवर आले होते. बाबाही घामेजून गेलेला. पायाखालची तांबडी माती पावलापावलाला उडत होती. कपड्यावर तिचा राप चढत होता. अधेमधे रस्त्यावरच्या दगडांवरून पाय सरकत होते. आईच्या पायातल्या चपल्या चटक-चटक करत वाजत होत्या. घाईघाईत बाजार गाठला. ​(क्रमश:)


- प्रा. सागर डवरी