असाही एक 'सहजीवन सोहळा'

आजच्या वेगवान युगात ढासळणारी कुटुंबव्यवस्था आणि नातेसंबंध जपण्यासाठी श्रीकांत मोरे, शोभा मोरे व काकडे दाम्पत्यांचे अर्थपूर्ण सहजीवन नव्या पिढीसाठी मूल्यांचा वारसा जपणारा आशेचा एक प्रेरणादायी किरण ठरत आहे.

Story: भवताल |
02nd May, 11:15 pm
असाही एक  'सहजीवन सोहळा'

अा​​पल्या संसाराबरोबरच समाजाशीही जोडलं गेलेलं 'सहजीवन कार्य' हे एक गोड चित्र असतं. नव्या धकाधकीच्या युगात कुटुंबसंस्था कोलमडत असताना तरुण-तरुणींच्या नजरेसमोर नाती टिकवणाऱ्या दाम्पत्यांचे व त्यांच्या सहजीवनातून फुललेल्या सामाजिक कार्यांचे आदर्श असण्याची नितांत गरज आहे. नुकत्याच गोव्यात संपन्न झालेल्या अभिनव अशा प्रकारच्या एका 'सहजीवन सोहळ्या'त गवसलेले हे 'सहजीवनाचे रंग!' सोलापूर येथील मनोरमा बँक परिवाराचे संचालक, ज्येष्ठ लेखक मा. श्रीकांत मोरे व त्यांच्या सुविद्य पत्नी उद्योजिका सौ. शोभा मोरे तसेच पुणे येथील उद्योजक मा. संभाजीराव काकडे व संजीवनी काकडे या दोन दाम्पत्यांच्या विवाहाच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त 'सहजीवन सोहळा' ही एक विशेष संकल्पना साकार करण्याचे भाग्य लाभले. संकल्पनेचा एक कार्यक्रमच मिरामार येथील पंचतारांकित मेरियट रिसॉर्टमध्ये साजरा करण्याचे या दाम्पत्यांनी ठरवले. गोव्यातील साहित्यिक मित्र-मैत्रिणींनी सहकार्य केले व एक समाजाभिमुख, सृजनशील सोहळा संपन्न झाला.

​गोव्यात कार्यक्रमांची रेलचेल असते व नेहमी गोव्याबाहेरील मान्यवरांना निमंत्रित केले जाते; पण हा कार्यक्रम इथूनच वेगळा होता तो असा की, मोरे दाम्पत्याने गेली अनेक वर्षे चालवलेल्या 'मनोरमा साहित्य मंडळी' व 'मसाप सोलापूर (पश्चिम) मनोरमा' या संस्थांनी गोव्यातील मान्यवरांनाच खास निमंत्रित केले व त्यांचा मानसन्मान केला. खरे तर पर्यटनमौजेच्या गोव्यात खाऊ-पिऊ चंगळपार्टी करून आनंद लुटणे सहज शक्य होते, पण यांनी चंद्रभागा तीरावरचे संचित मांडवीच्या तीरावर आणून, दिमाखदार स्वरूपात एका दर्जेदार 'साहित्यिक कार्यक्रमा'तून हा आनंद शतगुणित केला, हे अनोखे होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत होते. मुंबई येथील महासागर मीडिया ग्रुपचे प्रमुख, लेखक संदीप काळे व मी प्रमुख अतिथी होतो आणि कार्यक्रमाची खास निमंत्रित मंडळी होती. गोव्यातील ५ सेवाभावी, कलाप्रिय दाम्पत्ये व २० होतकरू कवी-कवयित्री!

​ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ता श्री. राजेंद्र केरकर व लोकसंस्कृती, शिक्षण, साहित्यक्षेत्रांत कार्यरत प्रा. सौ. पौर्णिमा केरकर या केरी, सत्तरीच्या सुप्रसिद्ध दाम्पत्याचे सहजीवन कार्य या कार्यक्रमात गौरविले गेले. सावईवेरे येथे वैद्यकीय व सामाजिक सेवेत असलेले लोकप्रिय डॉ. दत्ताराम देसाई व 'चतुरंग'सारख्या अनेक संस्थांत काम करणाऱ्या सौ. ऊर्मिला देसाई यांच्या सहजीवन कार्याचा गौरव केला गेला. 'संभवामि युगे युगे'सारख्या महानाट्यांचे पुढारपण तसेच नाट्य, कला, पर्यावरण क्षेत्रात कार्यरत 'सार्थक' ही संस्था चालवणारे म्हार्दोळचे श्री. राजेंद्र देसाई व शिक्षण क्षेत्रात कार्यरत ज्येष्ठ शिक्षिका सौ. आरती देसाई यांचे सहजीवन कार्य सन्मानित केले गेले. सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात विविध संस्थात्मक कामे करणारे शिरोड्याचे प्रसिद्ध उद्योजक श्री. जयंत मिरिंगकर व कला, संस्कृती, साहित्य क्षेत्रात कार्यरत कवयित्री सौ. दीपा मिरिंगकर यांच्या कार्याला सन्मान-प्रेरणा मिळाली. सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात सेवारत ज्येष्ठ पत्रकार, गझलकार श्री. प्रकाश क्षीरसागर व महिला स्वयंसेवी संस्था व 'साहित्यलेणी ताळगाव'चे धडाडीचे काम करणाऱ्या कवयित्री सौ. चित्रा क्षीरसागर हे जोडपे सन्मानित झाले. या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, 'मनोरमा शाल', विठ्ठल-रखुमाईची मूर्ती व पुस्तकभेट देऊन यथोचित सन्मान केला गेला.

​नंतरचे कवीसंमेलनही नेहमीपेक्षा वेगळे योजले होते. 'सहजीवन’ या विषयावर आधारित नात्यांचे ताणे-बाणे, गोडवा, प्रेम, विरह, नात्याचे विनोदी अंग अशा विविधरंगी कवितांची निवड केली होती. गोव्यातील नामवंत तसेच युवा कवी-कवयित्रींनी अशा दर्जेदार कविता सादर केल्या व 'रंग सहजीवनाचे' हे कवीसंमेलन बहारदार झाले. मोरे व काकडे दाम्पत्याने सर्व कवींचा 'मनोरमा शाल', मानधन, विठ्ठलाची प्रतिमा व पुस्तकभेट देऊन सुयोग्य सन्मान केला. कवीसंमेलनात दया मित्रगोत्री, कविता बोरकर, अंजली चितळे, चंद्रशेखर गावस, डॉ. विनय बापट, मेघना कुरुंदवाडकर, डॉ. नीता तोरणे, लक्ष्मण पित्रे, पौर्णिमा देसाई, अपूर्वा ग्रामोपाध्ये, कालिका बापट, प्रमोद कारापूरकर, विश्वनाथ जोशी, गौरी कुलकर्णी, नितीन कोरगावकर, मंजिरी वाटवे, यतीन फाटक हे कवी सहभागी होते. सूत्रसंचालक सौ. श्रुती हजारे यांनी कार्यक्रमाची सुरेख गुंफण केली. अध्यक्षपद श्रीकांत मोरे व शोभा मोरे यांनी भूषविले. श्रीकांत मोरेंनी अतिशय खुमासदार शैलीत कवितांवर भाष्य केले. शोभा मोरे यांचे अगत्याचे मनोगतही सर्वांनाच खूप भावले. 'आम्ही तुमच्यामुळे आहोत' ही दोघांचीही विनम्र भावना सर्वांच्याच मनात पाझरत गेली.

​चार वर्षांपूर्वी 'मनोरमा साहित्य पुरस्कार' मिळाला व त्या सोहळ्याला गेले असता त्यांच्या चौफेर 'सहजीवन' कार्याचा जवळून परिचय झाला. पुढे आणखीही काही गोमंतकीय साहित्यिक 'मनोरमा पुरस्कारा'ने गौरवित झाले व मनोरमा परिवाराचे गोव्याशी एक सर्जनशील नातेच निर्माण झाले. सोलापूर येथील त्यांच्या साध्याशा बंगल्यात विराजमान असणारी 'सरस्वतीची देखणी मूर्ती' ही त्यांच्या कार्याच्या वेगळेपणाची मुद्रा आहे, असे मला तेव्हाच जाणवले होते. परवाच्या सोहळ्यात त्याचे अधोरेखन झाले. या मनमिळावू, प्रेमळ जोडप्याने महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेले आहे. महाराष्ट्रभर शंभराच्या वर मनोरमा बँकेच्या शाखा, पतपेढ्या, 'मनोरमा सखी मंच' हा महिला सक्षमीकरणाचा प्रकल्प, रोजगार निर्मिती, अनेक सामाजिक उपक्रम, मनोरमा साहित्य संस्था, मनोरमा पुरस्कार, साहित्य संमेलने, मेळावे असे असंख्य प्रकल्प, हा त्यांच्या सहजीवन कार्याचा आवाका केवळ थक्क करणारा आहे; पण हा प्रवास केवळ वैयक्तिक यशाचा नाही, तर समाजाभिमुख कार्याचा आदर्श आहे हे महत्त्वाचे. श्रीकांत मोरे हे स्वतः एक उत्तम लेखक व कवी असून त्यांची दर्जेदार पुस्तके प्रकाशित आहेत. शोभाताई उत्तम वाचक, अभिवाचक, लेखक आणि रसिक आहेत. ‘उद्योगातून समाजाला परत देणे’ व सहजीवनातून ‘एकत्रित प्रगती’ ही त्यांची कृतज्ञ भूमिका आहे. उद्योग व साहित्य अशा दोन भिन्न क्षेत्रांचे हे सुंदर सहजीवन म्हणजे साक्षात लक्ष्मी व सरस्वतीचा सुंदर 

मिलाफ आहे!

​आजच्या वेगवान युगात स्त्री-पुरुष नातेसंबंध ही मुळातली गोड गोष्ट हरवत चालली आहे. तडजोड, समजूत, विश्वास ही मूल्ये ढासळताहेत. नवी कोवळी पिढी प्रेमासाठी तहानली आहे. कुटुंबव्यवस्था हा भारतीय समाजाचा कणाच पोखरतो आहे. अशा भयावह काळात आशेचा एक छोटासा दीप आपल्या प्रयत्नांच्या हाती घेऊन श्रीकांत मोरे-शोभा मोरे तसेच श्री. व सौ. काकडे यांच्यासारखे अर्थपूर्ण व सुंदर सहजीवन सहप्रवाशांसह धीराने वाट चालते आहे. त्यांना भावी काळातील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देताना 'सहजीवन' या मूल्याचा असा सर्व बाजूंनी छान जागर झाल्याचे सर्वांना जाणवले. साहित्य, कला, संस्कृती व सहजीवनाच्या मूल्यांना उजाळा देणारा हा अभिनव संकल्पनेचा सोहळा खरेच संस्मरणीय ठरला.


- डॉ. अनुजा जोशी