जुने गोवा पोलिसांनी पणजी कदंब बस स्टँडवर केली अटक

पणजी : खोर्ली-तिसवाडी येथील एका सुपरमार्केटमधून मोबाईल, रोख रक्कम आणि घरगुती वस्तू मिळून २५ हजार रुपयांचा एेवज लंपास करण्यात आला. मूळगावी पळ काढण्याचा प्रयत्नात असलेल्या ओडिसा येथील ओम साई राहुल (२१) आणि काजोल कुमारी (१९) या ‘बंटी-बबली’ला जुने गोवा पोलिसांनी पणजी कदंब बस स्टँडवर बुधवारी मध्यरात्री अटक केली.
जुने गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार ८ रोजी रात्री ८ वाजता खोर्ली - तिसवाडी येथील एका सुपरमार्केटमध्ये चोरी झाल्याची माहिती जुने गोवा पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलीस निरीक्षक गौरेश मळीक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोहर धुळापकर व इतर पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानुसार, सुपरमार्केटच्या मालकाने तक्रार दाखल केली. एक मोबाईल, ५ हजार रोख रक्कम आणि घरगुती वस्तू मिळून २५ हजार रुपयांचा एेवज लंपास केल्याचे म्हटले. तसेच या प्रकरणी तिथे काम करणाऱ्या महिलेवर संशय असल्याचे पोलिसांना सांगितले. याच दरम्यान पोलिसांनी सदर महिलेची माहिती घेऊन तपास सुरू केला. याच दरम्यान पोलिसांनी मध्यरात्री पणजी कदंब बसस्टँडवरून ओडिसा येथे मूळगावी जाण्याच्या प्रयत्नान असलेल्या ओम साई राहुल (२१) आणि काजोल कुमारी (१९) या बंटी - बबलीला अटक केली.