भरधाव कारने युवतीचा जीव घेतल्यानंतर दोनापावल येथे रम्बलर्स बसवण्याची अधिसूचना

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th April, 11:53 pm
भरधाव कारने युवतीचा जीव घेतल्यानंतर दोनापावल येथे रम्बलर्स बसवण्याची अधिसूचना

पणजी : दोनापावला येथे झालेल्या भीषण अपघातात एका निष्पाप मुलीचा मृत्यू झाल्यानंतर सरकार अखेर जागे झाले आहे. वाहनांचा वेग कमी करण्यासाठी अपघातग्रस्त ठिकाणी रम्बलर्स बसवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, जिल्हाधिकारी तसेच जिल्हा दंडाधिकारी यांनी यास मान्यता देत अधिसूचना जारी केली आहे.

रविवारी रात्री दोनापावला येथील सिदाद दी गोवा हॉटेलजवळ एका भरधाव मिनी कूपर कारने मोटारसायकलला धडक दिली. कारने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत एका २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.

या घटनेची गंभीर दखल घेत सरकारने भविष्यात अशा अपघातांना आळा घालण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ११२ तसेच संबंधित नियमांच्या आधारे, तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंते आणि वाहतूक पोलीस उपअधीक्षक (आल्तीन-पणजी) यांच्या शिफारशींनुसार उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकारी अंकित यादव यांनी आदेश जारी केले आहेत.

ताळगाव पंचायत हद्दीत ताज सिदाद दी गोवा हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळ चार ठिकाणी रंबलर्स बसवण्यात येणार आहेत. त्यानुसार,

दोनापावला दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर, हॉटेलच्या प्रवेशद्वारापासून १५ मीटर आधी आणि ५ मीटर नंतर रम्बलर्स बसवण्यात येतील.

बांबोळी दिशेने जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावरील जंक्शनच्या ५ मीटर आधी रम्बलर्स बसवण्यात येतील.

नागाळी हिल्सकडे जाणाऱ्या ‘टी’ जंक्शनपासून १० मीटर अंतरावरही रम्बलर्स बसवण्यात येणार आहेत.

काम ३० दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश

रम्बलर्स पांढऱ्या रंगाचा थर्मोप्लास्टिक फ्लुरोसंट पेंट लावण्यात येईल, तसेच त्या अधिक स्पष्ट दिसाव्यात यासाठी ब्लिंकर्सही बसवले जाणार आहेत. याशिवाय, वाहनचालकांना पूर्वसूचना मिळावी म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुमारे ४० मीटर आधी ‘रम्बलर्स  स्ट्रिप्स’ दर्शवणारे सूचना फलक आणि संबंधित वाहतूक चिन्हे लावली जाणार आहेत. हे सर्व काम ३० दिवसांच्या आत पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.





हेही वाचा